शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (11:55 IST)

नरेंद्र मोदींची तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, विरोधक म्हणाले...

गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो नाही, ही आमचीच चूक आहे, असं मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषि कायदे देशात आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठीच हा प्रयत्न होता. गेल्या कित्येक दिवसांपासून यासंदर्भात मागणी होती. अनेक संघटनांची ती मागणी होती.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या हिताच्या दृष्टीने हे कायदे असले तरी काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजवू शकलो नाही.
आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. सातत्याने चर्चा होत राहिली. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली, त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही.
आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी आता घरी निघून जावं. आता आपण पुन्हा नवी सुरुवात करू, असं मोदी म्हणाले.
 
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
आज देवदिपावलीचा पावन पर्व तसंच गुरुनानक जयंतीचा पवित्र दिवस
दीड वर्षांच्या अंतरानंतर करतारपूर कॉरिडोर नुकताच उघडला, हे सुखावह आहे.
केंद्र सरकार नागरिकांचं जीवन सहज बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
गुरुनानक साहेब यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
गेल्या 50 वर्षांत मी शेतकऱ्यांच्या समस्या खूप जवळून पाहिल्या. त्यामुळेच सत्तेत आल्यापासून कृषि कल्याणाला प्रथम प्राधान्य दिलं.
देशातील 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक. त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांच्या संख्या 10 कोटींच्या आसपास आहे.
या छोट्या जमिनीच्या साहाय्यानेच ते त्यांची शेती करतात. पीढी-दरपीढी कुटुंब वाढेल तसं त्यांची शेती आणखी कमी होत जाते.
केंद्र सरकारने 22 कोटी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिले.
गेल्या चार वर्षांत 1 लाख कोटींपेक्षाही अधिक मदत शेतकरी बांधवांना मिळाली.
या सरकारच्या काळात गेल्या कित्येक वर्षांचा उत्पादनाचा विक्रम मोडला.
आज केंद्र सरकारचा कृषि बजेट आधीपेक्षा पाच पटींनी वाढला आहे. दरवर्षी सव्वा लाख कोटींपेक्षाही जास्त रुपये कृषि क्षेत्रावर खर्च केले जात आहेत.
तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते.
अल्पभूधारकांसाठी हे कायदे फायदेशीर होते.
पण शेतकऱ्यांचा एक वर्ग या कायद्यांबाबत सुरुवातीपासून असमाधानी होता.
त्यांची समजून काढण्यात आम्ही कमी पडलो.
सातत्याने खुलेपणाने चर्चा केली, पण आमच्या प्रयत्नांमध्ये कसर राहिली.
देशवासीयांची आम्ही माफी मागतो.
तीन कृषी कायदे मागे घेत आहोत.
आंदोलन अजून थांबवणार नाही - राकेश टिकैत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर देशातील सर्वच स्तरातून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.
 
दरम्यान, गेल्या एका वर्षापासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी हे आंदोलन अजूनही थांबवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
शेतकरी आंदोलन तत्काळ मागे घेतलं जाणार नाही. हे कृषी कायदे संसदेत मागे घेण्यात येतील, त्या दिवसाची आम्ही प्रतीक्षा करू. सरकारने MSP सोबतच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी, असं टिकैत म्हणाले.
 
कोण काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली.
 
देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकाराचं डोकं खाली झुकवलं. अन्यायाविरुद्धच्या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन, जय हिंद, जय हिंद का किसान, असं राहुल गांधी म्हणाले.
भाजपच्या क्रूरतेसमोर ठाम शेतकऱ्यांचा विजय - ममता बॅनर्जी
भाजपच्या क्रूरतेसमोर ठामपणे उभे राहणाऱ्या हा शेतकऱ्यांचा विजय आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
 
या लढ्यात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांबाबत संवेदनाही बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
 
हे सरकारला सुचलेलं शहाणपण - संजय राऊत
 
उशीरा का होईना नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांची मन की बात आपल्या मुखात आणली. हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
 
ते म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत होते. अखेर सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल.
 
सरकारची भूमिका सुरुवातीपासून आडमुठेपणाची होती. शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं.
 
या कालावधीत सुमारे 450 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा बळी जाताना सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत होतं. आंदोलनात दहशतवादी, खलिस्तानी घुसले, असा आरोप केला जात होता. पण अखेर त्यांना झुकावं लागलं.
 
पण शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका कणखर आणि ठाम होती. त्यामुळे सरकारला अखेर झुकावं लागलं. सरकारने एका वर्षाआधीच हा निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते.
 
तीन कृषी कायदे राजकारणासाठी त्यांनी मागे घेतले असले तरी मी त्याचं स्वागत करतो. पंजाब आणि उत्तर प्रदेशात पराभवाची भीती असल्यामुळे कायदे मागे घेण्यात आले आहेत, हे स्पष्ट आहे, असं राऊत म्हणाले.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फक्त जय किसान असं म्हणत मोजक्या शब्दातच आपली प्रतिक्रिया दिली.