शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (09:42 IST)

जालना विनयभंग प्रकरण: ‘त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं?’

अनघा पाठक
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
 
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
 
भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की !
 
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?
 
मंगेश पाडगावकरांच्या या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला एक व्हीडिओ. तो व्हीडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल, जालन्यातला. त्यात एक तरुण मुलगा आणि मुलगी होते. आणि त्यांना मारहाण करणारे स्वयंघोषित संस्कृतिरक्षक होते.
 
व्हायरल झाला म्हटल्यावर अनेकांच्या मोबाईलमध्ये असेल, फॅमिली ग्रुपवरही आला असेल. मला काही महिला कार्यकर्त्यांनी पाठवला आणि एका अशाच जुन्या कॉलेज का शाळेच्या ग्रुपवर आला.
 
ग्रुपवर आलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मुलीचा विनयभंग झाला हे चुकीचंच, पण मुलीने मुळात अशा ठिकाणी जावंच कशाला, मुलांसोबत बसावंच कशाला? ही वाक्यं तुम्हाला ऐकल्यासारखी वाटत असतील.
 
निर्भयाच्या बलात्काऱ्यांनी तिच्यावर केलेल्या बलात्काराचं समर्थन करताना असंच काहीसं म्हटलं होतं. 'मुळात चांगल्या घरच्या मुली रात्री 9 वाजता बाहेर फिरत नाहीत आणि परक्या पुरुषाबरोबर तर नाहीच,' असं त्यातल्या एकाने बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
 
जालन्यात झालेल्या घटनेतही काही मुलं एका जोडप्याला त्रास देत आहेत. 'काढ रे व्हीडिओ, काढ' म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत. मुलीचा सर्रास विनयभंग केला जातोय, तर मुलगा 'दादा दादा' म्हणत त्यांच्या हातापाया पडतोय.
 
पण त्या व्हीडिओतलं एक वाक्य मनात पक्कं बसलंय, "दादा, दादा माफ करा, आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो". कायदा हातात घेणाऱ्या, तरुणीचा विनयभंग करणाऱ्या गुंडांना ते दोघं सांगतं होते, आम्ही काही चुकीचं करत नव्हतो. म्हणजे भररस्त्यात बाईचा विनयभंग केलेला चालतो, पण प्रेम व्यक्त करणं पचनी पडत नाही.
 
पण त्या हटकण्याची तीव्रता वाढून जालन्यासारखे प्रकारही घडू शकतात, किंवा एकटी मुलगी मुलाबरोबर आहे म्हणजे आपल्याला अर्थातच 'अव्हेलेबल' आहे म्हणून बलात्कारही घडू शकतात.
 
मुळात कोणत्याही मुलाने मुलीसोबत आणि मुलीने मुलासोबत काय करायचं हा त्यांचा मामला नाही का? त्यात लोकांनी नाक खुपसायची काय गरज? त्या मुलीवर तुमची मालकी आहे का? त्यांनी काय करायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? आणि जर ते काही बेकायदेशीर करत असतील, तर कायदा हातात घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
 
कायदा काय म्हणतो?
भारतीय दंड संहितेच्या कलम 294 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील हालचाली करणं, बोलणं किंवा गाणी गाणं गुन्हा आहे. सहसा हा कायदा महिलांची छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात वापरला जातो. पण मग एखादं जोडपं किस करत असेल तर तो गुन्हा ठरतो का? या कायद्यात अश्लीलतेची व्याख्या केलेली नाही. त्यामुळे काळानुरूप काय अश्लील ठरतं यावर गुन्हा दाखल होणार की नाही.
 
बॉम्बे पोलीस अॅक्टच्या कलम 151 अंतर्गतही कधी कधी अशा जोडप्यांवर खटला दाखल केला जातो.
 
याबाबत अधिक माहिती देताना अॅड पल्लवी रेणके सांगतात, "एखादं जोडपं एकांतात बसलं असेल आणि कायद्याने सज्ञान असतील तर तो गुन्हा नाही. बऱ्याचदा लोक नैतिक आणि कायदेशीर या दोन बाबींमध्ये गल्लत करतात. मुळात सज्ञान स्त्री-पुरुषांनी एकमेकांसोबत वेळ घालवणं, प्रेम करणं हे अनैतिकही नाहीच. दुर्दैवाने पुरुषप्रधान संस्कृती महिलांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे असे प्रसंग घडतात."
 
पोलीसच दटावतात तेव्हा...
शिल्पा भामरे आज पुण्यात एका मल्टिनॅशनल कंपनीत HR मॅनेजर आहे. कॉलेजमध्ये असताना तिचा एक क्रश होता. "तो मुलगा मला आवडायचा आणि कॉलेजचे दिवसही तसे रोमँटिक होते. एक दिवस त्याच्या बाईकवर आम्ही पावसात फिरायला गेलो. येताना आम्हाला पोलिसांनी पकडलं. का ते अजून कळलं नाही."
 
ती पुढे सांगते, "आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथे गुन्हेगारांसोबत बसवून ठेवलं. आम्ही विचारतोय आमचा गुन्हा काय तर म्हणे लाज नाही वाटत का फिरताना? का वाटावी? घरच्यांचे नंबर द्या म्हणे. त्याशिवाय सोडणार नाही. माझा मित्र घाबरला, गयावया करायला लागला. मी म्हटलं, बोला माझ्या आईशी. त्यांना वडिलांचाच नंबर हवा होता. म्हटलं आमच्या घरात सगळे निर्णय आई घेते, आईशीच बोलावं लागेल. कदाचित आईच्या अखत्यारीतला हा विषय असेल असं त्यांना वाटलं नाही, मुलीने तोंड 'काळं' तर 'बापाची' इज्जत पणाला लागते ना," ती हसत हसत सांगते.
 
पोलिसांनी शिल्पाच्या घरी फोन केला आणि पहिलंच वाक्य उच्चारलं, 'तुमची मुलगी बाहेर काय दिवे लावतेय तुम्हाला माहितेय का?'
 
शिल्पा म्हणते, "त्या पोलिसाची इच्छा असावी की घडला प्रकार सांगितल्यानंतर आई त्यांचे आभार मानेल. पण झालं भलतंच. आई म्हणाली असा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? माझ्या मुलीला पोलीस स्टेशनला कोणत्या गुन्ह्याखाली नेलं? आता रीतसर त्यांना घरी सोडा नाहीतर तुमच्या वरिष्ठांशी मला बोलावं लागेल. माझी आई एक मोकळ्या विचारांची होती, पण प्रत्येकाच्या घरात असे आईवडील नसतात आणि म्हणूनच अशा मनोवृत्तीचं फावतं."
 
शिल्पाच्या आईने अपेक्षित प्रतिक्रिया दिली नाही म्हणून 'उद्या तुमच्या मुलीवर जबरदस्ती झाली, काही बरंवाईट झालं तर आमच्याकडे तक्रार करायला येऊ नका,' असं उत्तर त्या पोलिसांनी दिल्याचं शिल्पा सांगते.
 
मयुरी जोशी पुण्यात 'राईट टू लव्ह' या संस्थेसाठी काम करतात. त्यांनीही अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत. "एकदा एक जोडपं कारमध्ये बसलं होतं, बोलत असतील किंवा काय करत असतील, त्यांचा प्रश्न. पण पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले."
"मुला-मुलींना व्यक्त व्हायला, एकमेकांसोबत वेळ घालवायला आपल्याकडे जागाच नाहीये. पोलिसांकडून असा बचाव केला जातो की मुलींची सुरक्षा करण्यासाठी ते अशी पावलं उचलतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की महिलांवर कोणीतरी अत्याचार करणं आणि एखाद्या महिलेने आपल्या मर्जीने पुरुषासोबत वेळ घालवणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे."
 
'तुम्ही विचारणार पोलीस काय करत होते?'
नाशिकच्या डीसीपी शर्मिष्ठा वालवलकर मान्य करतात, की सज्ञान मुला-मुलींना व्यक्तीस्वातंत्र्य आहे.
 
"पण त्या व्यक्ती स्वातंत्र्याचे काय परिणाम होतात. एखादं जोडपं एकाकी ठिकाणी बसलं असेल तर पोलीस हटकतात हे खरं. पण का? तर पुढे काही वाईट घडू नये म्हणून. अंधारात, रानावनात, झुडूपांच्या मागे दोघंच असतील तर त्यांना मारहाण करण्याच्या, चोरीच्या, मुलीच्या विनयभंगाच्या, क्वचित बलात्काराच्या घटना घडू शकतात. अशी घटना घडली तर सर्वसामान्य लोकच विचारणार पोलीस काय करत होते?"
 
शर्मिष्ठा यांचं मत आहे, की आजकालच्या मुलामुलींच्या स्वातंत्र्याच्या कल्पना बदलल्या असल्या तरी समाज अजून तेवढा पुढारलेला नाही. "आम्ही बऱ्याचदा अशा जोडप्यांना पकडून समज देऊन सोडून देतो. प्रीव्हेंटिव्ह अॅक्शन म्हणून आम्हाला असं करावं लागतं, म्हणजे पुढे मोठा गुन्हा घडणार नाही. तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे ना, मग गर्दीच्या ठिकाणी बसा, कॅफेमध्ये बसा, पण एकटे-दुकटे कुठे भटकू नका."
 
मग यावर उपाय काय?
अशा घटना घडतात कारण पितृसत्तेचा प्रभाव अजूनही मनावर आहे, मयुरी सांगतात. "आम्ही कपल गार्डनची मागणी केली आहे. इथे फक्त जोडपी असतील बाकी कोणी नाही, अर्थात यासाठी एक आचारसंहिता लागू करू. दुसरं म्हणजे पालकांनी मुलांशी बोलणं. तिसरं म्हणजे पितृसत्तेचा विरोध. अशा घटना घडतात कारण अजूनही आपल्याला हे मान्य नाही की बाई स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. आणि म्हणूनच जालन्यात घडले तसे प्रकार घडतात किंवा मागच्या वर्षी हैदराबादमध्ये जोडप्याचं जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रकार घडला होता."
 
जालन्याची घटना जुनी झाली, आता त्यावर लेखनप्रपंच कशाला, असं वाटत असेल तर 'व्हॅलेन्टाईन डे' येतोच आहे. तथाकथित संस्कृतिरक्षक बाह्या सरसावून तयार असतील, मुलगा-मुलगी एकत्र दिसले तर त्यांना धमकी द्यायला, मारहाण करायला किंवा जबरदस्तीने लग्न लावून देण्याचं सोंग आणायला. तेव्हा आपण म्हणणार का?
 
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं?
 
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
 
करु दे की !
 
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?