कोरोना व्हायरसचा सामना करण्यात "आपण कमी पडलो" अशी कबुली चिनी सरकारने प्रथमच दिली आहे.
चीनचं आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्याची गरज असल्याचं पॉलिब्युरो स्टँडिंग कमिटीने या सत्ताधारी पक्षाच्या संसदीय समितीने म्हटलं आहे.
एकट्या सोमवारीच रुग्णांचा आकडा तीन हजारांनी तर मृतांचा 64नी वाढला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत या व्हायरसमुळे चीनमध्ये 425 लोक मृत्युमुखी तर 20 हजारहून अधिक लोक आजारी असल्याचं सांगण्यात आलं.
यापूर्वी 2002-03 मध्ये आलेल्या सार्स व्हायरसमुळे 349 लोकांचा मृत्यू झाला होता.
चीनशिवाय अनेक देशांमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळत असून त्यांना तातडीने स्वतंत्र वॉर्डांमध्ये अलिप्त ठेवलं जात आहे. चीनबाहेर फिलिपीन्समध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर भारतात केरळमध्ये तीन रुग्ण आढळल्यामुळे सरकारने आता आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
पॉलिटब्युरोने नेमकं काय म्हटलं?
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पॉलिटब्युरो बैठकीचा तपशील शिनुआ वृत्तसंस्थेने प्रकाशित केला आहे. त्यात चीनची या घडीला ही "मोठी परीक्षा" असल्याचं म्हटलं आहे.
"या साथीमुळे निदर्शनास आलेल्या कमतरता आणि उणिवांमुळे असं लक्षात येतं की आपल्याला राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे, जेणेकरून अशी धोकादायक आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची आपली ताकद वाढेल," असं या वृत्तात म्हटलं आहे.
एक मोठं पाऊल म्हणजे आपण बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या वन्यप्राण्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी त्यावर "तातडीने बंदी घालावी" आणि बाजारपेठांवर जास्त काटेकोरपणे लक्ष द्यावं, असं सुचवण्यात आलंय. त्यामुळे जिथून या व्हायरसचा उगम झाल्याचं सांगितलं जात आहे, त्या प्राणी मांसाच्या बाजारपेठांवर धाडी टाकण्याचे आदेश आता सरकारने जारी केले आहेत.
सद्यस्थितीत वुहानचं संकट हाताळणं आपली सर्वांत महत्त्वाची जबाबदारी असल्याचंही पॉलिटब्युरोने म्हटलं. अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्य बजावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावा आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असंही या बैठकीत सांगण्यात आलं.
हुआजिआहे गावात व्यक्तीला कोरोना व्हायरसच्या एका संशयित रुग्णाला त्याच्या मुलापासून वेगळं करून एका अलिप्त वॉर्डात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा गतिमंद मुलगा दगावल्याचं वृत्त आहे. यामुळे दोन अधिकाऱ्यांना बरखास्तही करण्यात आलं आहे.
इतर देश या संकटाला कसे हाताळतायत?
आतापर्यंत किमान 20 देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना चीनमधून मायदेशी परत आणण्याची तसंच त्यांना स्वतंत्रपणे देखरेखीत ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचं केंद्रस्थान असलेल्या चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या 647 भारतीयांना दोन विशेष विमानांनी भारतात आणण्यात आलं. या विमानात मालदिव्ह्सच्या सात नागरिकांनाही परत आणण्यात आलं.
सोमवारी अमेरिका, जर्मनी, जपान, युके, कॅनडा, फ्रान्स आणि इटली या G7 देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी एका कॉन्फरन्स कॉलवर परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्यविषयक सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे.
जर्मनीचे आरेग्य मंत्री जेन्स स्पाह्न यांनी प्रवाशांचं अधिनियमन आणि व्हायरसवरील संशोधनासाठी जागितक आरोग्य संघटना तसंच चीनला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.
अनेक राष्ट्रांनी चीनमधून आलेल्या प्रवाशांना तसंच चिनी नागरिकांवर प्रवासबंदी लादली आहे. मात्र WHOनुसार यामुळे या व्हायरसचा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेक लोक या निर्बंधांमुळे अवैधरीत्या प्रवास करण्याचा प्रयत्न करू शकतात.
कोरोना विषाणू आहे काय?
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.
सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.