शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (12:10 IST)

मध्य प्रदेशात पोलिस स्टेशनमध्ये पत्रकारांचे कपडे उतरवले, नेमकं काय घडलं?

journalist
- दिलनवाज पाशा
मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमधला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत काही अर्धनग्न पुरूष उभे आहेत. पोलीस स्टेशनमध्ये अर्धनग्न उभे असलेले हे लोक स्थानिक पत्रकार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.
 
बीबीसीने या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.
 
प्रकरण नेमकं काय आहे?
हा फोटो 2 एप्रिलच्या रात्री 8.30 च्या सुमारास सीधी कोतवालीत काढला आहे. फोटोत दिसणाऱ्या आठ अर्धनग्न लोकांपैकी दोन स्थानिक पत्रकार आहेत तर बाकीचे नाट्यकर्मी आहेत.
 
या लोकांचा आरोप आहे की, हे लोक स्थानिक थिएटर कलाकाराच्या अटकेचा निषेध करत होते. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडून त्यांचे कपडे उतरवले आणि पोलिस ठाण्यात त्यांची परेड घेतली.
 
मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
या फोटोत दिसणारे पत्रकार कनिष्क तिवारी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या फोटोत दिसणारा एक मी आणि माझा कॅमेरामन असे आम्ही दोघे पत्रकार आहोत. बाकीचे स्थानिक नाट्यकर्मी आणि आरटीआय कार्यकर्ते आहेत. हे सर्व थिएटर कलाकार नीरज कुंदेर यांच्या अटकेला विरोध करत होते."
 
घडलेल्या घटनेची माहिती देताना कनिष्क सांगतात, "स्थानिक आमदार केदारनाथ शुक्ला यांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाइल बनवून अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपात पोलिसांनी नीरज कुंदेर यांना अटक केली होती. नाट्यकर्मी याला विरोध करत होते. त्याठिकाणी कव्हरेज करण्यासाठी मी माझ्या कॅमेरामनसह गेलो होतो."
 
कनिष्क यांचा आरोप आहे की, ते स्थानिक भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांच्या विरोधात बातम्या देतात म्हणून आमदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी नाट्यकर्मींसहित त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं. तसंच त्यांना मारहाणसुद्धा केली.
 
कनिष्क यांचा आरोप आहे की, "नाट्यकर्मी आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा मी त्याचं कव्हरेज करत होतो. पोलिसांनी मला माझ्या कॅमेरामनसह पकडलं. आम्हा सगळ्यांना अर्धनग्न करून पोलीस स्टेशनमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एसएचओंच्या खोलीत हा फोटो काढण्यात आला."
 
कनिष्क सांगतात की, या घटनेनंतर त्यांनी पोलिसांच्या गैरवर्तणुकीबाबत अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची दखल घेतली गेली नाही.
 
याबाबतचा घटनाक्रम सांगताना, सिधी जिल्ह्याचे एसएसपी मुकेश कुमार म्हणाले, "नीरज कुंदेर हा थिएटर कलाकार आहे. त्याच्या अटकेनंतर काही लोक निषेध नोंदवण्यासाठी आले. पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांनी काही ऐकल नाही. शेवटी रात्री उशिरा आंदोलकांनाही ताब्यात घेऊन 151 अंतर्गत रीतसर अटक करण्यात आली."
 
मुकेश कुमार सांगतात, "या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
 
'कोणत्या नियमांनुसार हे घडलं याची चौकशी सुरू आहे'
ताब्यात घेतलेल्या लोकांना अर्धनग्न करून फोटो काढण्यात आल्याच्या प्रश्नावर पोलीस अधीक्षक म्हणतात, "हे फोटो माझ्या माहितीत आहेत. हे फोटो कोणत्या परिस्थितीमुळे काढलेत, याचा तपास सुरू आहे. डीएसपी याची चौकशी करीत आहेत. चौकशी अहवालानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल."
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये पत्रकार आणि इतर लोक अर्धनग्न दिसत आहेत. हे फोटो मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहेत. मात्र, 'कोणत्या नियमांतर्गत' हा प्रकार घडला, याचा तपास सीधी पोलिसांकडून सुरू आहे.
 
पोलीस अधीक्षक मुकेश कुमार म्हणतात, "हे कोणत्या परिस्थितीत घडलं, कोणत्या नियमांतर्गत घडलं, आम्ही त्याची चौकशी करत आहोत. जर हे नियमांच्या विरोधात असेल तर आम्ही स्टेशन प्रभारींसह इतर पोलिसांवर कारवाई करू."
 
पोलीस अधीक्षक म्हणतात, "मी तपास अहवालाची वाट पाहतोय. अहवालात पोलीस दोषी आढळल्यास आम्ही कठोर कारवाई करू."
 
कनिष्क यांना पत्रकार मानण्यास पोलिसांचा नकार
 
फोटोमध्ये दिसणारे हे पत्रकार आहेत का, या प्रश्नावर पोलीस अधीक्षक म्हणतात, "ते नेहमी बाइट्स घेताना दिसतात मात्र ते कोणत्याही माध्यमाचे अधिकृत प्रतिनिधी नाहीत. माझ्या माहितीनुसार ते स्थानिक युट्युबर आहेत जे युट्युबवर बातम्या टाकतात."
 
स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी हे कृत्य केल्याचा आरोप कनिष्क तिवारी यांनी केला आहे.
 
पोलिसांनी ही कारवाई कोणत्या दबावाखाली केली आहे का, या प्रश्नावर पोलीस अधीक्षक म्हणतात, "हे आरोप निराधार आहेत. कनिष्क तिवारींवर यापूर्वीच गुन्हा दाखल असून त्यांची चौकशी सुरू आहे. 2021 मध्ये ते एका वसतिगृहात घुसले होते. आयपीसी 452 नुसार यासंदर्भात गुन्हानोंद करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र त्यांना कोणत्याही प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही."
 
कनिष्क तिवारी यांनी स्थानिक भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केलाय. कनिष्क यांनी आरोप केला आहे की, ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून आमदाराविरोधात बातम्या देतात, त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आलंय.
 
मात्र, केदारनाथ शुक्ला यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. बीबीसीशी बोलताना आमदार शुक्ला म्हणाले, "पत्रकारांविरोधात कोणतीही घटना घडलेली नाही, कोणत्याही पत्रकाराने असे आरोप केलेले नाहीत, ती व्यक्ती पत्रकार नाही, तुम्ही त्याला पत्रकार म्हणू नका. याउपर मी या प्रकरणात काहीही बोलणार नाही."
 
पोलीस स्टेशनमध्ये अशी घटना घडली आहे का, या बीबीसीच्या प्रश्नावर आमदार म्हणतात, ही घटना घडली आहे मात्र कोणत्याही पत्रकारासोबत घडलेली नाही.
 
दुसरीकडे, कनिष्क दावा करतात की ते 'एमपी संदेश न्यूज' नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात. त्यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. कनिष्क यांचा दावा आहे की ते राष्ट्रीय माध्यमांशी ही निगडित होते.