शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:40 IST)

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या 'त्या' ट्वीटची चौकशी होणार- अनिल देशमुख

शेतकरी आंदोलनाप्रकरणी बॉलीवूड सेलिब्रिटी आणि नॅशनल हिरोंवर ट्विट करण्यासाठी दवाब टाकण्यात आला होता का, याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे.
 
सेलिब्रिटींवर ट्वीट करण्यासाठी दवाब होता का, याची गुप्तचर विभागाकडून चौकशी केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
 
कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी (8 फेब्रुवारी) अनिल देशमुख यांच्याशी झूमवरून चर्चा केली. यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले.
 
कॉंग्रेसच्या तक्रारीबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं, "शेतकरी आंदोलनावर आंततराष्ट्रीय ख्यातीच्या लोकांनी ट्वीट केलं. त्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारं ट्वीट केलं. हे सर्व ट्वीट एकाच वेळी कसे आले? ट्वीटचे शब्द सारखेच कसे? एकाच वेळी हे ठरवून करण्यात आलं का, हे पाहण्याचा प्रश्न आहे."
 
"सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचे ट्वीट एकसारखेच कसे? एकही शब्द खालीवर नाही," असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
 
कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान अनिल देशमुख यांनी म्हटलं, "या ट्वीटचं टायमिंग एक आहे. या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. गुप्तचर विभाग याची चौकशी करेल. चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील."
 
गेल्या 70 दिवसांपासून लाखोच्या संख्येने शेतकरी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला.
 
पॉपस्टॉर रिहानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट केलं. सीएनएनच्या एका बातमीची लिंक शेअर करत ती लिहिते, "आपण या विषयावर का बोलत नाही?" या ट्वीटमध्ये त्यांनी #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.
 
रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलं.
 
त्यानंतर भारताचे अनेक सेलिब्रिटी रिहानाविरोधात एकवटले. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने ट्वीट करून म्हटले आहे की बाहेरच्या देशातील व्यक्तीला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
 
अजय देवगण, कंगना राणावत, अक्षय कुमार या सेलिब्रिटींनी देखील रिहानावर निशाणा साधला आहे.
 
काँग्रेसकडून या ट्वीटच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
 
"शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षानं त्यांना प्रवृत्त केलं होतं का? भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का?" असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
 
सचिन सावंत यांनी सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दोघांच्या ट्वीटमधील सारखेपणाकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर सुनील शेट्टी यांनी आपल्या ट्वीटमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याला टॅग का केलं होतं, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
"देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजप कनेक्शनची चौकशी व्हावी" अशी सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
 
'शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांची चौकशी कळणार'
सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याच्या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
 
आपल्या देशांतर्गत विषयात नाहक नाक खुपसणाऱ्या परदेशी पॉप स्टारला रोखठोक उत्तर दिले म्हणून महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचं वृत्त समजलं, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.
 
आशिष शेलार यांनी या ट्वीटमध्ये पुढे म्हटलं की, कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या आणि याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यानंतर आझाद काश्मिरची मागणी करणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार.
 
देवेंद्र फडणवीसांची टीका
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका करताना तुमचा महाराष्ट्र धर्म, मराठी बाणा आता कुठे आहे असा प्रश्न विचारला आहे.
 
भारतरत्नांची चौकशी करण्याचे आदेश देणारी 'रत्नं' संपूर्ण देशात सापडणार नाहीत, असा टोलाही फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये लगावला आहे.