मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (18:31 IST)

उत्तराखंड हिमस्खलन: 'पाण्याचा वेग इतका होता की मृतदेहांवरील कपडेसुद्धा सापडत नाहीयेत'

शाहबाझ अन्वर
बीबीसी हिंदीसाठी
 
 
"पाण्याचा वेग इतका होता की, नदीत सापडणाऱ्या मृतदेहांवरील कपडेसुद्धा सापडत नाहीयेत."
 
उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानंतर त्यातल्या पीडितांविषयीची माहिती देताना मदतकार्यात सहभागी झालेले डॉ. प्रदीप भारद्वाज सांगत होते.
 
डॉ. भारद्वाज सिक्स सिग्मा स्टार हेल्थ केअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि रविवारी (7 फेब्रुवारी) ते आपल्या टीमसहित चमोलीला पोहोचले होते.
 
रविवारी रात्री जेव्हा ते चमोलीतल्या रेणी भागात पोहोचले, तेव्हा समोरचं दृश्य थरकाप उडवणारं होतं.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं, "रेणी गावात मी माझ्या टीमसोबत रविवारी 9 वाजता पोहोचलो. NDRF, SDRF, ITBPसहित इतर अनेक टीम बचावकार्य करत होत्या. ज्यापद्धतीनं मोठमोठ्या दगडांचे तुकडे, चिखल आणि पाणी समोर दिसत होतं, त्यामुळे केदारनाथमधल्या महाप्रलयाची आठवण येत होती."
 
त्यांनी पुढे सांगितलं, "मी 11 असे मृतदेह पाहिले, जे चिखलात फसलेले होते. बहुतेक मृतदेहांवरील कपडे गायब होते. पाण्याच्या दबावामुळे कदाचित असं झालं असेल. मृतदेहांकडे पाहूसुद्धा शकत नव्हतो. त्यांची ओळख पटवणं आव्हानात्मक झालं आहे. मजुरांजवळ कोणतंही ओळखपत्र नसल्यामुळे त्यांची ओळख पटकवणं अवघड जाणार आहे. यासाठी कदाचित डीएनची गरज पडेल."
 
भीतीचं वातावरण
चमोलीत हिमस्खलानाची घटना दुपारच्या सुमारास घडली. पुरानं रौद्र रूप धारण केलं तेव्हा अनेकांनी ते अनुभवलं. पाण्याचा आवाज आणि त्यानंतरच्या गरम हवेमुळे वातावरणात भीतीचं वातावरण तयार झालं होतं.
 
घटनास्थळापासून जवळपास 17 गावांना या पुराचा फटका बसल्याचं डॉ. भारद्वाज सांगतात.
 
"जवळपास 17 गावांच्या लोकांनी पुराचं रौद्र रूप बघितलं. लोकांमध्ये भीती आहे. ज्यांनी ते दृश्य बघितलं, त्यांच्यापैकी अनेक जण आजही ट्रॉमामध्ये आहेत आणि त्यांना उपचाराची गरज आहे."
 
पीडितांविषयी ते सांगतात, "या घटनेचा अनुभव घेणाऱ्या एका महिलेला लोक माझ्याकडे घेऊन आले, ही महिला इतकी घाबरलीय की ती बोलतसुद्धा नाहीये. या महिलेचा रक्तदाब वाढला आहे. ही महिला सध्या व्यवस्थितपणे जेवण करत आहे. अशापद्धतीनं सगळ्या रुग्णांचं समुपदेशन केलं जात आहे."
 
याशिवाय, जिथून संपूर्ण नदी क्षेत्रावर नजर ठेवली, अशा ठिकाणी गावागावातील ज्येष्ठ नागरिक बसून आहेत. याप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास मदतकार्य करणाऱ्यांना वाचवलं जावं, हा यामागचा उद्देश आहे. रविवारी आणि सोमवारी रात्री गावातल्या लोकांनी शिफ्ट्समध्ये इथल्या नद्यांवर लक्ष ठेवलं.
 
गावागावात कॅम्प
पुराची भीती असल्यामुळे अनेक जण आजारी पडले आहेत. अशा लोकांच्या उपचारासाठी डॉ. भारद्वाज यांनी गावागावत कॅम्प लावले आहेत आणि रुग्णांवर उपचार सुरू केला आहे.
 
डॉ. भारद्वाज सांगतात, "आम्ही आज (सोमवार, 8 फेब्रुवारी) आजूबाजूच्या गावांमध्ये कॅम्प उभारले आहेत. भीती आणि डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांवर उपचार सुरू आहे."
 
नदीतून काढलेल्या 11 जखमींवर रविवारी (7 फेब्रुवारी) उपचार करण्यात आले. पण, आता त्या भागात चिखल साचला आहे आणि तिथं फक्त मृतदेह अडकल्याची शक्यता आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
प्रदीप पुढे सांगतात की, "ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मदत करणं गरेजचं आहे. खूपच वाईट परिस्थिती आहे."