वाशी टोलनाक्यावर हिंदी भाषिक कामगारासोबत वाद, मनसे कार्यकर्त्यांनी केली धुलाई
वाशी टोलनाक्यावरील एका मराठी कामगाराला मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात नेवून मारहाण केली. एका कामगाराला मराठी बोलता न आल्यामुळे कार चालकाने वाद घातला होता. त्यावेळी मराठी तरुणाने हिंदी कामगाराची बाजू घेत राज साहेबांना सांग जा असे वक्तव्य केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्याची धुलाई केली.
एका कार चालकाचा वाशी टोलनाक्यावरील एका हिंदी भाषिक कामगारासोबत वाद झाला. महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आली पाहिजे अशी तंबी कार चलकांकडून टोलनाक्यावरील हिंदी भाषिक कामगाराला दिली जात होती. त्यावेळी तिथल्या एका मराठी कामगाराने हिंदी भाषिक कामगाराची बाजू घेत याठिकाणी मराठी माणसं काम करत नसल्याचे सांगितले. मात्र, कार चालकाने त्याला देखील तू मराठी असून हिंदी भाषिकाची बाजू का घेतली यावरुन त्यांच्यात वाद झाला.
यावेळी कार चालकाने मराठीचा मुद्दा पुढे करत वाद घालत असताना या कामगाराने, जा, राज साहेबांना सांग, जा, असे वक्तव्य केले. याचा राग आल्याने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या मराठी कामगाराला कार्यालयात आणून मारहाण केली. तसेच त्याला माफी मागायला लावून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.