गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (18:16 IST)

विधान परिषद निवडणूक: 5 जागांवर संपूर्ण राज्याचे लक्ष, का होईल ही निवडणूक रंजक?

प्राजक्ता पोळ
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला (शुक्रवारी) निवडणूक होत आहे. मुंबईच्या दोन, धुळे-नंदुरबार, वाशिम - बुलढाणा - अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही निवडणूक आहे.
 
14 डिसेंबरला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपच्या या लढ्यात काही ठिकाणी राजकीय दृष्ट्या नवे चेहरे समोर आले तर काही ठिकाणच्या दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. या लढती कोणाच्या आहेत? त्यामागच्या राजकीय घडामोडी काय आहेत? यासंदर्भातला हा आढावा...
 
कोणाचा कार्यकाळ संपणार?
मुंबईमधल्या 2 जागांची मुदत संपत आहे. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या जागांचा कार्यकाळ संपत आहे.
अकोला - बुलढाणा - वाशिममधून शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपणार आहे. नागपूरमधून भाजपचे गिरीश व्यास यांचा कार्यकाळ संपणार आहे. धुळे-नंदुरबारमधल्या भाजपच्या अमरिश पटेल यांचा कार्यकाळ संपत आहे.
कोल्हापूरमधले कॉंग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कार्यकाळ संपत आहे.
 
मुंबईत दोन्ही 'भाई' मैदानाबाहेर?
मुंबईतल्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री रामदास कदम यांना डच्चू देऊन सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.
 
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या विरोधातील काही रसद रामदास कदम यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचे आरोप झाले.
 
त्यासंदर्भातल्या ऑडियो क्लिपस् ही व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचंही बोललं जात होतं. हेच प्रकरण रामदास कदम यांना भोवलं असून यामुळे कदमांना उमेदवारी नाकारल्याच्या चर्चा आहेत.
 
सुनील शिंदे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं.
 
त्यावेळी विद्यमान आमदार असलेल्या सुनील शिंदेंना आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडावी लागली होती. त्यादरम्यान सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.
 
आदित्य ठाकरेंच्या बऱ्याचशा कामात सचिन अहिर यांचा सहभाग असल्यामुळे कोणाचं राजकीय पुर्नवसन होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण सुनील शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षाने किंमत ठेवली अशा प्रतिक्रिया वरळीमधल्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी 103 जागा या शिवसेनेच्या आहेत. 83 जागा या भाजपच्या आहेत. एका उमेदवारासाठी साधारण 75-77 मतांचा कोटा असू शकतो.
 
त्यामुळे कॉंग्रेसकडे तितकी मतं नसल्यामुळे कॉंग्रेसने ही जागा न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाई जगताप यांना काही काळ तरी विधीमंडळातून दूर राहून मुंबई अध्यक्षपद सांभाळावं लागेल.
 
भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजहंस सिंह हे कॉंग्रेसचे माजी आमदार होते. 2017 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजहंस सिंह या उत्तर भारतीय चेहर्‍याला संधी दिली असल्याचं बोललं जातंय. मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणारी ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
 
कोल्हापूरमध्ये पाटील आणि महाडिक आमने - सामने?
 
कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी महादेव महाडिक यांना सतेज पाटील यांनी विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव केला होता. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती.
 
त्याचबरोबर शिवसेनेनेही महाडिक यांना पाठिंबा दिला होता. पण सतेज पाटील हे निवडून आले होते. विनय कोरे आणि आवाडे गट आता भाजपसोबत आहे. त्यामुळे समीकरणं बदलणार की कायम राहणार हे बघणं महत्त्वाचं असेल.
 
नागपूरमध्ये कॉंग्रेसने आयात केला भाजप उमेदवार?
नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस सरकारच्या काळात मंत्री होते. पण त्यानंतर 2019ला त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.
बावनकुळे यांच्याविरुद्ध कॉंग्रेसकडून डॉ. रविंद्र भोयार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. रविंद्र भोयार हे भाजपचे चार वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत.
 
त्यांनी 22 नोव्हेंबरला अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 23 नोव्हेंबरला कॉंग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.
 
धुळे नंदुरबारमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवाराचे वडील भाजपमध्ये?
 
धुळे नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसकडून नंदूरबार जिल्हापरिषद सदस्य अभिजीत पाटील हे उमेदवार आहेत. पण कॉंग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांचे वडील मोतीलाल पाटील हे भाजपमध्ये आहेत. ते शहराचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे मोतीलाल पाटील हे कॉंग्रेसला मदत करणार की भाजपला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
वाशिम- बुलढाणा - अकोल्यात भाजपसमोर मोठं आव्हान?
वाशिम - बुलढाणा - अकोला हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे सलग तीन वेळा म्हणजे 2004 पासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.
 
चौथ्यांदाही गोपीकिशन बाजोरिया यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरी समर्थक आहेत. भाजपसमोर शिवसेनेचा हा बालेकिल्ला भेदण्याचं मोठं आव्हान आहे.