शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (12:12 IST)

नोकरी-शिक्षणानिमित्त आलेल्या मराठी तरुणांची वाढती चिंता

कोरोनाचे आकडे बघण्यासाठी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची वेबसाईट उघडली, की त्यात लालबुंद झालेला अमेरिकेचा नकाशा दिसतो. वेबसाईटवरच्या जगाच्या नकाशावर लाल रंगाचे ठिपके कोरोना झालेला भाग दर्शवतात.
 
मात्र, अमेरिकेच्या नकाशावर हे ठिपके शोधावे लागतात, कारण संपूर्ण अमेरिकेचा नकाशाच लाल रंगात दिसत असून इथली कोरोनाची गंभीर समस्या आपलं लक्ष वेधून घेते.
 
ही बातमी लिहीत असताना अमेरिकेतला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आठ लाखांवर गेला होता आणि मृतांचा आकडा 43 हजारांवर पोहोचला होता. हे आकडे इतर कुठल्याही देशापेक्षा किमान तिपटीने जास्त आहेत आणि दिवसागणिक वाढतच आहेत.
 
उशीरा घोषित केलेलं अंशतः लॉकडाऊन, तपासण्यांना झालेला उशीर आणि मुख्य म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याप्रकरणी सुरुवातीला न दाखवलेलं गांभीर्य, या मुद्द्यांवरून अमेरिकन सरकारवर सध्या कडाडून टीका होत आहे.
 
मात्र, या सगळ्याचा अमेरिकन नागरिकांवर आणि मुख्यत्वे इथल्या भारतीयांवर चांगलाच परिणाम झालाय. नोकरी वा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या मराठी तरुणांशी बीबीसी मराठीने चर्चा केली.
 
न्यूजर्सी, ऱ्होड आयलंड, मॅसेच्युसेट्स, बोस्टन या ठिकाणी राहणाऱ्या मराठी तरुणांनी अमेरिकेतल्या सध्याच्या वातावरणाचं वर्णन यावेळी केलं.
'अमेरिकेतली सध्याची परिस्थिती भीषण'
अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातल्या प्रोव्हिडेंस शहरात उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी गेलेल्या सायली गोरे या 17 मार्चपासून आपल्या घरातच बसून आहेत. ऱ्होड आयलंड राज्याच्या गव्हर्नरनी सध्या 8 मेपर्यंत सगळ्यांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
सायली तिथली माहिती देताना सांगतात, "अमेरिकेतली परिस्थिती सध्या भीषण झाली आहे. येत्या दोन आठवड्यांत अमेरिकेतला मृतांचा आकडा आणि रुग्णांची संख्या वाढणार असल्याचं इथल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही शक्य ती सगळी काळजी घेतोय."
 
सायली किराणा मालांच्या दुकानांमध्ये घेतल्या जाणाऱ्या काळजीबद्दल सांगतात, "ग्रोसरी स्टोअर्समध्ये सामान घ्यायच्या ट्रॉलीसोबत डिसिन्फेक्टंट वाईप्स मिळतात. त्याने प्रथम ट्रॉली स्वच्छ केल्यानंतर आम्ही आत जातो.
 
"आत गेल्यावर प्रत्येक ग्राहकाला ग्लोव्ह्ज घालावे लागतात, जेणेकरून वस्तू घेताना हाताला तिचा थेट स्पर्श होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचीच्या नियमावलीमुळे मोठ्या दुकानांबाहेर रांगा लागलेल्या असतात. हे वातावरण खूपच भयावह आहे."
 
कोरोनावर लस मिळाल्याखेरीज अमेरिकेतली परिस्थिती पूर्ववत होणार नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगची नियमावली पाळली तरंच परिस्थिती काहीशी आटोक्यात येईल, असं सायली यांना वाटतं.
'पाच मित्रांच्या नोकऱ्या गेल्या'
मॅसेच्युसेट्स राज्यांत राहणाऱ्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दीपेश पाटील यांचीही अवस्था काहीशी अशीच आहे. दीपेश गेल्या तीन आठवड्यांपासून आपल्या घरातच बसले आहेत. कंपनीचं काम ते घरातूनच करतात.
 
त्यांच्या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. या राज्यात पहिला रुग्ण 1 फेब्रुवारीला आढळला होता. हा रुग्ण दिपेश यांच्या अपार्टमेंटपासून अवघ्या काही फूट अंतरावरच राहत असल्याने तेव्हापासूनच इथे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
दीपेश पुढे सांगतात, "1 फेब्रुवारीला इथे रुग्ण आढळला आणि आमच्यातली भीती वाढू लागली. आज या घटनेला दोन महिने होऊन गेले आहेत. या दोन महिन्यांत चित्र खूपच भीतीदायक झालंय. रुग्ण वाढतच चालले आहेत. लोक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत."
 
मॅसेच्युसेट्समधल्या प्रशासनाबद्दल बोलताना दीपेश सांगतात, "पूर्णतः लॉकडाऊन इथे नाहीये. तसंच आमच्या राज्यांत इतर राज्यांच्या तुलनेत चीनच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इथल्या मृत्यूंची संख्या वाढल्याने गव्हर्नरने रात्रीही संचारबंदी लागू केली. पण, हे पुरेसं नाही. इथलं प्रशासन नियमांची कठोर अंमलबजावणी करत नाहीयेत."
 
घरी राहण्याचे आदेश मिळाल्यानंतर दीपेशनी जीवनावश्यक वस्तूंचं खूप सामान घरी आणून ठेवलं आहे. ते सांगतात, "भारतीय दुकानांसह इतर दुकानांमध्ये ग्राहकांना मास्क लावणं, ग्लोव्हज वापरणं बंधनकारक आहे. हे सगळं भीतीदायक आहे. दुकानांमध्ये गेल्यावरच कोरोनाच्या भयानकतेची जाणीव होते."
 
दीपेश यांच्या बोलण्यात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची चिंता जाणवत होती. दीपेश यांच्या पाच मित्रांच्या याच काळात नोकऱ्याही गेल्या. दिपेश दिवसातून दोनदा आपल्या पालकांशी बोलून काळजी करू नका असं सांगतात.
 
'भारतीय दूतावासाने तारलंय'
न्यू जर्सी हा सुद्धा अमेरिकेतला कोरोनामुळे सर्वाधिक बाधित झालेला भाग. कारण, न्यूयॉर्क इथून अगदी जवळ असून जॉन हॉपकिन्सच्या वेबसाईटनुसार, न्यू जर्सीमधला आकडा 88 हजारांवर पोहोचला आहे.
इथे शिक्षणासाठी गेलेले योगेश चव्हाण गेल्या 4 मार्चपासून घरातच आहेत. ते आता कॉलेजमधली लेक्चर्स ऑनलाईन पाहतात. न्यूजर्सीमधली परिस्थिती खूपंच बिघडल्याने योगेश यांनी तब्बल एक महिन्याचं सामान घरात भरून ठेवलंय.
 
योगेश सांगतात, "माझ्या घराजवळच्या एका भारतीय दुकानात मी सकाळीच गेलो आणि महिन्याभराचं सामान घेऊन आलोय. आता इथले लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं कडक पालन करत आहेत.
 
"भारतीय दूतावासाकडून आम्हाला चांगली माहिती मिळतेय. ज्यांना गरज आहे त्यांना दूतावासातून मदत केली जात आहे. 4 एप्रिलपासून आमच्याकडची परिस्थिती काहीशी सुधारत आहे."
 
"अमेरिकन सरकार काही भाग सुरू करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्हाला इथल्या सरकारकडून चांगली मदत मिळते आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढल्याने आता इथे चांगलं लक्ष पुरवलं जात आहे."
 
अमेरिकेतल्या टेक्सास, पेनसिलव्हेनिया इथे राहणाऱ्या काही मराठी तरुणांशी आम्ही बोललो. मात्र, त्यांनी त्यांचं नाव छापण्यास नकार दिला. एकाने तर असंही सांगितलं की व्हिसामध्ये हल्ली सोशल मीडियावर काही लेख प्रकाशित झाले असतील तर त्याच्या लिंक्स देणं ट्रंप प्रशासनानं बंधनकारक केलंय, त्यामुळे माझं नाव नका देऊ.
 
मात्र, या सगळ्यांच्याच बोलण्यातून भीती जाणवत होती. आर्थिकदृष्ट्या फटका बसल्याने नोकऱ्या जाण्याचं भयही त्यांच्यामध्ये कोरोना एवढंच होतं.