मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (12:15 IST)

आरेतील कारशेडविना मुंबईतील 'मेट्रो 3' अशक्य : अश्विनी भिडे

मुंबईतील 'मेट्रो 3' प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणं सोयीचं असून, कारशेड हलवावी लागल्यास प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही, असं मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय. भिडे या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालक आहेत. 
 
या पार्श्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठनं मुंबईतील सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणाच्या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अश्विनी भिडे बोलत होत्या.
 
'मेट्रो 3'च्या कारशेडवरून मुंबईतील वातावरण तापलंय. कारशेडसाठी 2 हजार 646 झाडे हटवावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरणानं ही झाडं हटवण्यासाठी परवानगी दिली असली तरी पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे.
 
कांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून, तिथं कारशेड उभारणं किचकट प्रक्रिया आहे. शिवाय, आरेतली झाडं तोडली, तरी त्या बदल्यात 23 हजार 846 झाडं लावली जातील, असेही भिडे यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे.
 
"पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला गेलाच पाहिजे. मात्र, विकासासाठी झाडे तोडणं गरजेचं असल्यास हरकत घेऊ नये. मेट्रो कारशेडला विरोध हे मुंबईकरांचे नुकसान ठरेल." असं गडकरी म्हणाले.