1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मोहम्मद शमी: स्टारडम, 'घरगुती हिंसाचार' आणि वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक

2015 साली एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातला एक महत्त्वाचा सामना होळीच्या दिवशी होता. ठिकाण होतं ऑस्ट्रेलियातलं पर्थ शहर आणि त्यावेळचा जगज्जेता संघ असलेल्या भारताचा मुकाबला होता वेस्ट इंडिजशी.
 
सामन्याच्या दोन दिवस आधी पर्थच्या प्रसिद्ध वाका मैदानात दोन्ही संघ वेगवेगळ्या वेळी नेट प्रॅक्टिससाठी पोहोचले.
 
टीम इंडियाच्या बसमधून आधी उतरणाऱ्यांमध्ये होते सुरेश रैना, शिखर धवन आणि रविंद्र जडेजा. त्यांच्या हातात गुलालाचे पॅकेट्स होते.
 
सर्वांत शेवटी उतरला मोहम्मद शमी. त्याच्या कपाळावर पांढरा गुलाल आणि अबीर लागलेला होता. तो खुशीत होता आणि नेटवर येऊन त्याने बॉलिंगची प्रॅक्टिस सुरू केली.
 
भारताचा आधीचा सामना UAEशी होता. या सामन्यात मोहम्मद शमी खेळू शकला नव्हता आणि यावेळी स्वतःला सिद्ध करण्याची त्याला घाई झाली होती.
 
नेट प्रॅक्टिसदरम्यान मी विचारलं, "शमी भाई, फिट वाटतंय का?"
 
तिथे धोनी बॅटिंग करत होता. शमीने पूर्ण रनअप घेऊन धोनीला एक यॉर्कर टाकला. तो थेट धोनीच्या पॅडला खाली लागला. मागे उभ्या असलेल्या रवी शास्त्रींनी मान हलवून प्रशंसा केली.
 
नेट प्रॅक्टिस संपण्यापूर्वी शमी म्हणाला, "होळीचा दिवस आहे. मॅचमध्ये मजा येईल."
 
स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरला
शमीला प्रश्न विचारण्यामागे कारण होतं. त्या वर्ल्ड कपच्या आधी 2014मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या वन डे सीरिजमध्ये शमीने 10 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यानंतरच्या श्रीलंका सीरिजसाठी त्याची निवडही झाली होती.
 
मात्र शमीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने अचानक त्याच्या जागी संघात धवल कुलकर्णीला घेण्यात आलं.
 
तर 6 मार्च 2014 रोजी वाकामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 44 षटकांत केवळ 182 धावांवर ऑल आऊट केलं. भारतीय फलंदाजांनी चार विकेट्स राखत 40 षटकांमध्येच बाजी मारली.
 
मॅन ऑफ द मॅच ठरला मोहम्मद शमी. त्याने टाकलेल्या 8 षटकांमध्ये 2 मेडन होते आणि त्याने 3 विकेट्सही घेतल्या होत्या. स्मिथ, क्रिस गेल आणि कॅप्टन डॅरेन सॅमी या तिघांच्या विकेट्स शमीने घेतल्या.
 
त्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातही शमीने पाकिस्तान संघाच्या बाबतीत असंच काहीसं केलं होतं. सर डॉन ब्रॅडमन यांचं शहर असलेल्या अॅडलेडमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात शमीने ज्या चार पाकिस्तानी फलंदाजांना पॅवेलियनमध्ये पाठवलं त्यात होते युनूस खान, मिसबाह उल-हक, शाहिद आफ्रिदी आणि वहाब रियाज.
 
त्या स्पर्धेत शमी जणू स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरला होता.
 
सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही असंच चित्र दिसलं. भारताच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शमीला प्लेईंग-11मध्ये स्थान मिळालं नाही.
 
मात्र, अफगाणिस्तानच्या विरोधात झालेल्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकात हॅट्रिक घेत भारताला विजय मिळवून दिला. इतकंच नाही तर भारतावर ओढवणाऱ्या नामुष्कीतूनही त्यानं संघाला वाचवलं.
 
AFPचे माजी क्रिकेट एडिटर कुलदीप लाल सांगतात, "भारतासाठी वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने या शेवटच्याच ओव्हरमध्ये सुरू झालंय. पुढे आणखी रंगत येणार आहे."
 
याआधी विश्व चषकात भारताकडून एकमेव हॅट्रिक चेतन शर्माने घेतली होती. शमीच्या कामगिरीवर स्वतः चेतनने त्याचं अभिनंदन केलं होतं.
 
कारकीर्दीची सुरुवात
 
पश्चिम उत्तर प्रदेशातला मोहम्मद शमी आपल्या भावंडांप्रमाणेच आमरोहमधल्या शेतात क्रिकेट खेळायचा. त्याची क्रिकेटची सुरुवात अलीनगर सरसपूरच्या गावातल्या त्यांच्या शेतात बनलेल्या सिमेंट पीचवरून झाली.
 
त्याचे वडील तौसिफ अहमद शेतकरी आहेत. त्यांनाही क्रिकेटची आवड होती आणि त्यांना आपल्या मुलांचं क्रिकेटमधलं कौशल्यही दिसायचं. त्यांनीच मोहम्मद शमीला मुरादाबादचे क्रिकेट कोच बदरुद्दीन यांच्या क्रिकेट अकादमीत पाठवण्याचा आग्रह केला होता.
 
यानंतर मोहम्मद शमी याने मागे वळून तेव्हाच पाहिलं जेव्हा स्टेशनवर उभे असलेले त्याचे वडील आणि भाऊ त्याला कोलकत्याला जाण्यासाठी निरोप देत होते.
 
शमीला उत्तर प्रदेशच्या ज्युनिअर क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हा कोच बदरुद्दीन यांनी त्याला कोलकातामधून खेळवायचा निर्णय घेतला.
 
अनेक वर्षं डलहौसी आणि टाऊन क्लबसाठी क्रिकेट खेळल्यानंतर शमीला बंगालच्या अंडर-22 संघात स्थान मिळालं.
 
कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की त्या संघासाठी खेळल्यानंतर शमी अमरोहाला आला होता. थंडीचे दिवस होते. एका संध्याकाळी चहा घेताना शमी म्हणाला, "भारतीय सिलेक्टर्सनी मला उद्या किमान नेटवर जरी प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली तर माझं आयुष्य सार्थकी लागेल."
 
खरं म्हणजे मोहम्मद शमीलाही माहिती नव्हतं की त्याचं आयुष्य बदलणार आहे.
 
2010 साली रणजी खेळल्यानंतर 2013 ला त्याची टीम इंडियात निवड झाली. या विषयी स्वतः शमी म्हणाला होता, "कोलकातामधल्या ईडन गार्डनमध्ये सौरव गांगुलीसारख्या दिग्गजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि बरंच काही शिकायला मिळालं. तो आयपीएलचा सुरुवातीचा काळ होता आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजी करण्याची संधी मिळू लागली होती."
 
यादरम्यान आधी एकदिवसीय आणि नंतर कसोटी संघात येताच त्याने विकेट्स घ्यायला सुरुवात केली. 2015च्या वर्ल्ड कपआधी झालेल्या कसोटी दौऱ्यांमध्ये शमीची कामगिरी सर्वोत्तम होती.
 
मात्र, वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर त्याने सांगितलं की त्याच्या पायाला थोडी दुखापत झाली होती. टीम इंडिया कव्हर करणाऱ्या पत्रकारांनाही ही बाब लक्षात येऊ लागली होती.
 
सिडनीमध्ये भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमिफायनलचा सामना रंगणार होता. एक दिवसापूर्वी SCGमध्ये नेट प्रॅक्टिस करताना मोहम्मद शमीने जवळपास एक डझन बॉल टाकले. तेवढ्यात भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण त्याच्याजवळ गेले. त्यांच्यात जवळपास पाच मिनिटं बातचीत झाली. यानंतर शमीने आपला रनअप कमी केला आणि गोलंदाजी केल्यानंतर फिल्डिंग ड्रिलमध्ये भागही घेतला नाही.
 
'द वीक' मॅगझीनच्या क्रिकेट प्रतिनिधी नीरू भाटिया वर्ल्ड कप दरम्यान तिथे उपस्थित होत्या. नेट प्रॅक्टिस सुरू असताना मी त्यांच्याशी शमी आणि अरुण यांच्यात झालेल्या संवादाविषयी चर्चा केली.
 
नीरू भाटिया यांचं म्हणणं होतं, "शमीला गेल्या वर्षी झालेली दुखापत पूर्णपणे बरीही होऊ शकली नव्हती आणि वर्ल्ड कप आला. त्याला खेळवणं एक कॅलक्युलेटेड रिस्क होती. ही रिस्क आतापर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, तो कधीपर्यंत अशीच उत्तम कामगिरी करेल, हे स्वतः शमीलाही माहिती नसेल."
 
दुसऱ्या दिवशी झालेल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आधी गोलंदाजी करत 300 धावा काढल्या आणि मोहम्मद शमीला 10 षटकांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. त्या सामन्यात त्याने 68 धावा दिल्या होत्या.
 
मोहम्मद शमी आणि वाद
2018च्या सुरुवातीपर्यंत मोहम्मद शमी, क्रिकेट आणि यश यांच्यात दुखापत ही एकमेव अडचण होती. शमीने यातून सावरायला सुरुवातही केली होती. मात्र, अचानक त्याच्या खाजगी आयुष्यात वादळ उठलं.
 
मार्च 2018 ला त्याची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर घरगुती हिंसाचार, खुनाचा प्रयत्न आणि बलात्काराचे आरोप केले आणि कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात FIR दाखल केली.
 
मोहम्मद शमीने हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत ट्वीट केलं होतं, "माझ्याविषयी ज्या बातम्या सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत आणि मला बदनाम करण्याचा आणि माझा खेळ खराब करण्याचा हा कट आहे."
 
या काळात शमीच्या पत्नीने आणखी एक गंभीर आरोप केला होता. मॅच फिक्सिंगचा. परिणामी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने खेळाडूंसोबत करण्यात येणाऱ्या करारातून मोहम्मद शमीला बाहेर काढलं आणि चौकशी सुरू केली.
 
BCCIच्या अँन्टी करप्शन युनीटने शमी मॅच फिक्सिंगच्या आरोपात निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर BCCIने त्याच्याशी नव्याने करार केला.
 
मात्र दरम्यानच्या काळात ही बातमी वणव्यासारखी पसरली होती.
 
अमरोहामध्ये मोहम्मद शमीच्या गावातल्या मंडळींना या बातमीने तेव्हाही धक्का बसला होता आणि अजूनही ते या धक्क्यातून सावरले नाहीत.
 
नातेवाईक असलेल्या मुमताज (नाव बदललं आहे) म्हणतात, "कळत नाही गोष्टी इतक्या हाताबाहेर कशा गेल्या. दोघंही इथे नेहमी यायचे आणि हसतमुखाने परतायचे. मुलगीही खूप गोड आहे. शमीने आपल्या पत्नीच्या नावे एक शेतही घेतलं होतं. बघूया, पुढे काय घडतंय?"
 
शमी आणि त्याच्या पत्नीमधला वाद अजून मिटलेला नाही.
 
शमीच्या अडचणी इथेच संपल्या नाही. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो नावाची एक फिटनेस टेस्ट द्यावी लागते.
 
घरगुती वादाच्या तीन महिन्यांनंतर झालेल्या या टेस्टमध्ये शमी अपयशी ठरला. त्यामुळे शमीला अफगाणिस्तानविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यांना मुकावं लागलं.
 
शमीच्या जवळच्या मंडळींचं म्हणणं आहे की, "हा शेवटचा धक्का होता आणि शमीने आता ठरवलं आहे की नव्याने तशीच प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची जशी संघात स्थान मिळवण्यासाठी 2013 मध्ये तो करायचा."
 
शमीने त्याचे सुरुवातीचे कोच बदरुद्दीन यांचीही मदत घेतली आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे.
 
ऑक्टोबर 2018मध्ये त्याने संघात जोरदार पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चांगल्या गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला याचवर्षी जानेवारीत झालेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यांमध्ये टीम इंडियात स्थान मिळालं.
 
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आलं नसलं तरी संघ कव्हर करणारे एक ज्येष्ठ पत्रकार सांगतात, "नेट प्रॅक्टिसमध्ये शमीच्या वेगवान गोलंदाजीला इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याची संधी मिळाली नाही तर भारतीय फलंदाजांना चांगली प्रॅक्टीस करता येणार नाही."
 
नुकतंच शमीने सांगितलं की फिट रहाण्यासाठी त्याने ब्रेड आणि गोड खाणंही बंद केलंय. त्यामुळे त्याचं वजनही कमी झालंय.
 
शमीला मुघलाई जेवण आवडतं. काही वर्षांपूर्वी अॅडलेडमध्ये टीम इंडिया थांबली होती, त्या हॉटेलमध्ये तो मला म्हणाला होता, "आपला खेळ सुधारण्यासाठी परदेश दौरे चांगली संधी असतात. फक्त खाण्या-पिण्याची थोडी अबाळ होते. इंग्रजी जेवण फार काळ खाणंही होत नाही."
 
तेव्हापासून आतापर्यंत शमीच्या आयुष्यात बरंच काही बदललं आहे. मात्र, एक गोष्ट आहे जी तेव्हाही होती आणि आजही कायम आहे.
 
धोनी, कोहली, रोहित शर्मा यासारख्या त्या सात भारतीय क्रिकेट खेळाडूंमध्ये शमीचाही समावेश आहे जे 2015चा वर्ल्ड कप खेळले होते आणि 2019चाही खेळत आहेत.