गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मिस्टर बीस्ट: एक्सवर एक व्हीडिओ टाकून त्याने 2.79 कोटी रु. कसे कमावले?

केवळ एक व्हीडिओ युट्युब किंवा ट्विटरवर (एक्स) टाकून कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळाले तर? कुणीतरी आपली थट्टाच करतंय असं तुम्हाला वाटेल ना? पण ही गोष्ट खरी ठरली आहे?
 
जगातले सगळ्यांत प्रसिद्ध यु-ट्युबर असा नावलौकिक असलेल्या मिस्टर बीस्ट यांनी सांगितलं की त्यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर एक व्हीडिओ पोस्ट करून 2.79 कोटी रुपये कमावले आहेत.
 
याआधी, ते एकदा म्हणाले होते की एक्सवर कोणत्याही प्रकारचा कंटेट टाकून काही हाती लागत नाही. कारण ही कंपनी जाहिरातीतील उत्पन्नाचा अगदी अल्पसा भाग कंटेट क्रिएटर्सला देते.
 
मात्र गेल्या आठवड्यात त्यांचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी एक पोस्ट केली. ही पोस्ट कोट्यवधी लोकांनी पाहिली आणि जाहिरातदारांच्या माध्यमातून त्यांनी अडीच कोटी रुपयाहून अधिक कमाई केली.
 
मिस्टर बीस्ट यांनी एक्सवर कारची पोस्ट टाकून कोट्यवधी रुपये कमावले.
 
एलॉन मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर ट्विटरच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यात लोकांना आपल्या व्यवसाय वाढीसाठी आणि कंटेट क्रिएशनच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना मानली जात आहे.
 
एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये एक कंपनी विकत घेतली. त्यानंतर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक मार्ग आजमावून पाहिले.
 
त्यात हाय प्रोफाईल क्रिएटर्स लोकांबरोबर जाहिरातींबरोबर रेव्हेन्यू शेअर करण्याचाही समावेश आहे. युट्यूब सारखे प्लॅटफॉर्म ते आधीपासूनच हे करत आहेत.
 
मात्र मस्क यांची ही योजना सफल होताना दिसत नाहीये, कारण एक्सवर ट्रॅफिक कमी होताना दिसत आहे.
 
एक्सच्या जाहिरातींच्या उत्पन्नात घट दिसत आहे. कारण मस्क फेक न्यूज आणि हेट स्पीचच्या मुद्दावर जाहिरात देणाऱ्यांशी कायम पंगा घेताना दिसतात.
 
मिस्टर बीस्ट कोण आहे?
मिस्टर बीस्ट यांचं खरं नाव जिमी डोनाल्डसन आहे. त्यांचे जगभरात चाहते आहेत.
 
युट्यूबवर लाखो डॉलर कमावणारे मिस्टर बीस्ट त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग दान करतात.
 
'मिस्टर बीस्ट' यांच्या याच नावाने असलेल्या चॅनेलला 23 कोटी 40 लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्यांचे आणखी 4 युट्यूब चॅनेल आहेत.
 
‘मिस्टर बीस्ट - 2’चे तीन कोटी 63 लाख, ‘बीस्ट रिअॅक्टस’ चे 3 कोटी 19 लाख, ‘मिस्टर बीस्ट गेमिंग’ चे चार कोटी 14 लाख आणि ‘बीस्ट फिलॅन्थ्रॉपी’चे 2 कोटी 12 लाख सबस्क्रायबर्स आहेत.
 
इन्स्टाग्रामवर मिस्टर बीस्टचे 4 कोटी 93 लाख आणि एक्सवर 2 कोटी 71 लाख फॉलोअर्स आहेत.
 
ते म्हणाले की 'एक्सवर 100 कोटी व्ह्युज मिळाले तरी त्यांची चांगली कमाई होणार नाही. पण, एक्सवर एक व्हीडिओ किती कमाई करू शकतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'
 
एक्सवरुन मिळालेल्या उत्पन्नावर आश्चर्य व्यक्त करत मिस्टर बीस्ट यांनी म्हटले की हे 'आकडे खोटे वाटत आहेत.'
 
एका पोस्टमध्ये ते लिहितात, “जाहिरातदारांनी हे पाहिलं की हा व्हीडिओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. म्हणून माझी कमाई चांगली झाली आहे."
 
या कमाईतील काही भाग दहा अनोळखी व्यक्तींमध्ये वाटणार आहेत. असं ते नेहमी करतात.
 
विश्लेषकांच्या मते मिस्टर बीस्ट यांच्याऐवजी दुसरं कोणी असतं तर इतकी कमाई झाली नसती.
 
डब्ल्यू मीडिया कार्स्टन वाईड म्हणतात, “त्यांचा दावा आहे की त्यांनी 2.79 कोटी रुपये कमावले आहेत. एका व्हीडिओसाठी ही कमाई खूप आहे. मात्र इतकी कमाई करण्यासाठी तुमच्या पोस्टवर प्रचंड ट्रॅफिक येण्याची गरज आहे."
 
इंटरनेटवरील इन्फ्लुएन्सर्स बराच पैसा कमावतात. मात्र ते त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहे. सगळे लोक एकसारखा पैसा कमावत नाही.
 
त्यासंबंधी जाहीररित्या काही सांगितलं जात नाही. त्यांच्या कंटेटवर इंटरनेट कंपन्या स्पेशल रेटही देतात.
 
फोर्ब्ज मॅगझिनने नोव्हेंबर 2022 मध्ये लिहिलं होतं की मिस्टर बीस्ट यांनी एका वर्षांत 54 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी कमाई केली आहे.
 
त्यानंतर मिस्टर बीस्टच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आता अंदाज आहे की त्यांचं वर्षभराचं उत्पन्न 233 अमेरिकन डॉलर आहे.
 
मिस्टर बीस्ट यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्याशी टाय अप केलं आहे. मिस्टर बीस्ट सांगतात की व्हीडिओ तयार करण्यासाठी ते कोट्यवधी रुपये खर्च करतात.
 
सध्या ते एका मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म बरोबर एक मोठा करार करणार आहेत.
 
त्यांनी एक्सवर जो व्हीडिओ टाकला आहे तो त्यांनी सप्टेंबर 2023 मध्येच टाकला आहे. या व्हीडिओत वेगवेगळ्या कारच्या किमतीबाबत बोलताना दिसतात.
 
सध्या युट्यूबवर हा व्हीडिओ 22 कोटी लोकांनी पाहिला आहे. त्यांची बहुतांश कमाई अशाच व्हीडिओच्या माध्यमातून होते.
 
इन्फ्लुएन्सर्सच्या कमाईवर लक्ष ठेवून असणाऱ्या प्लॅटफॉर्म वेअरिझमच्या अंदाजानुसार मिस्टर बीस्टचा एक व्हीडिओ युट्यूबवर जवळजवळ एक कोटी अमेरिकन डॉलर कमावतो.
 
मात्र एक्सवर ताज्या कंटेटमुळेच कमाई करणं शक्य आहे.
 
वेअरिझमचे संस्थापकर जेनी त्साई सांगतात, “पुढे ही कमाई कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.”
 
डेव विस्कुल नेब्युलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. नेब्युला जगातला एक प्रीमियम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
 
एक्सवर एका इंप्रेशनचा हा अद्याप स्पष्ट नाही.
 
मात्र एक्स आता इन्फ्लुएन्सर्सला आणखी गांभीर्याने घेत आहे.
 
डेव विस्कुल म्हणतात, “जर तुम्ही युट्यूबसाठी आधीपासूनच व्हीडिओ तयार करत असाल तर तुम्ही एक्सवरही पोस्ट करू शकतात. यात काय वावगं आहे?”
 
जे लोक इंटरनेटवर प्रसिद्ध नाहीत त्यांना इंटरनेटवर खूप पैसा कमावणं फारसं शक्य नाही, असंही ते पुढे म्हणतात.
 
बीबीसी तंत्रज्ञान संपादक जोई क्लीनमेन यांचं विश्लेषण
मिस्टर बीस्ट जितके पैसे कमावतात त्याच्या आसपासही इंटरनेटवरील इतर क्रिएटर्स येऊ शकत नाही. इतकंच नाही तर जगभरातील मीडिया त्यांची दखलही घेत नाही.
 
मिस्टर बीस्टच स्वतःच सांगतात की त्यांनी जितकी कमाई केली आहे तितके इतर युजर्सची होईल असं नाही.
 
मात्र हा आकडा एक्सची सीईओ लिंडा याचारिनो यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट ठरणार आहे. जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर त्या मागच्या वर्षी एक्समध्ये आल्या.
 
वैयक्तिक पातळीवर त्यांना एक्सच्या प्रतिष्ठेशी झुंजावं लागत आहे. मात्र या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींना चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल.
 
कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी सोमवारी ऑश्विट्झ डेथ कँपचा दौरा केला होता.
 
एक्सवर ज्यू लोकांविरोधात जे कंटेट टाकलं जातं त्यावर नियंत्रण ठेवणे हे एक्ससाठी एक आव्हान ठरत आहे. या कंटेटविषयी एक्सची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना मस्क यांनी हा दौरा केला आहे.