रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आयपीएल 2019: चेन्नईला त्यांच्याच होम ग्राऊंडवर नमवून मुंबई फायनलमध्ये

आयपीएलच्या 12 व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर नमवून फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. मुंबईने चेन्नईला सहा विकेट्सनं हरवलं.
 
मुंबईसमोर विजयासाठी केवळ 132 रनांचं उद्दिष्ट होतं. सूर्यकुमार यादवच्या 71 रनांच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य सहज गाठलं. 18.3 ओव्हरमध्ये चार विकेटसच्या मोबदल्यात मुंबईने आपलं फायनलमधलं स्थान निश्चित केलं. या व्यतिरिक्त ईशान किशनने 28 धावांची पण महत्त्वपूर्ण खेळी केली. 
 
दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हर्समध्ये त्यांना 130 रन काढता आले. जर आपल्याच होम ग्राऊंडवर इतका कमी स्कोअर एखादी टीम करत असेल तर त्या टीमची हारण्याची शक्यता आणखी वाढते यात काहीच शंका नाही आणि झालं तसंच. 
या खेळाचं वैशिष्ट्य असं होतं की या खेळात असे खेळाडू चमकले ज्यांच्यावर फारसं कुणाचं लक्ष्य नाही. रोहित शर्मा केवळ चार रन बनवून आउट झाला तेव्हा सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आला.
 
त्यानंतर दुसरा ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉक 8 रनांवर आउट झाला. त्यावेळी पूर्ण टीमचा स्कोअर 21 होता. त्यानंतर सूर्यकुमार यादवचा खेळपट्टीवर जम बसला आणि टीम जिंकल्यानंतरच तो परतला.
 
सूर्यकुमारला साथ मिळाली ती ईशान किशनची. 31 बॉलमध्ये त्याने 28 धावा काढल्या. या काळात ईशानने सातत्याने सूर्यकुमारला स्ट्राइक दिली. या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी 80 रनांची भागीदारी केली. जेव्हा ईशान किशन इम्रान ताहिरच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला तेव्हा मुंबईचा स्कोअर होता 101.
त्यानंतर कृणाल पांड्याही इम्रानच्या बॉलवर कॅचआउट झाला. एकापाठोपाठ दोन विकेट गेल्यानंतर असं वाटलं की चेन्नईच्या हातात पुन्हा मॅच येईल पण तसं काही घडलं नाही. हार्दिक पांड्याने 13 रन बनवले आणि मॅच संपेपर्यंत नाबाद राहिला. सूर्यकुमारने 54 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 71 रन बनवले आणि विजयश्री खेचून आणली.