मुंबई महापालिका निवडणूक: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जवळ येत आहेत का?

devendra fadnavis raj
Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:32 IST)
शिववसेना, भाजप आणि मनसे दोन्ही पक्षांचा समान विरोधक आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जवळ येतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
वीजबिलाच्या मुद्यावरून भाजप आणि मनसेने राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. जनतेला दिलासा देण्यावरून ठाकरे सरकारने घूमजाव केल्यानंतर भाजप आणि मनसे आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय.

मनसेने सोमवारी (23 नोव्हेंबर) मुंबईत सरकारला धारेवर धरण्यासाठी 'एक पत्र मुख्यमंत्र्यांना' असं म्हणत पोस्ट कार्ड आंदोलन केलं. दुसरीकडे, भाजप नेत्यांनी राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
भाजप आणि मनसेचं आंदोलन सरकारविरोधात असलं, तरी, खरं टार्गेट आहेत, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून त्यांच लक्ष आहे 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांवर.

मनसे सुपारीबाज- अनिल परब
भाजप आणि मनसेने वीजबिलावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. दोन्ही पक्ष एकाच अजेंड्यावर मुंबईत शिवसेनेविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुंबईत भाजप-मनसे जवळ येऊ लागलेत का? असा प्रश्न विचारला जातोय.
यावर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री अनिल परब म्हणाले, "ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का माहित नाही. मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. त्यांच्या पक्षाचं अस्तित्व त्यावरच आहे. त्यामुळे कोणाची तरी सुपारी घ्यावी लागेल."

लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या 'लाव रे व्हीडिओ'ची चर्चा होती. त्यावेळी त्यांनी भाजपविरोधात प्रचार केला होता. या गोष्टीवर परब यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की ज्यांच्याविरोधात त्या काळात प्रचार केला आता त्यांच्यासोबतच गेल्यावर काय होतं हे पाहण्यासारखं राहील.
अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, "अशा वक्तव्यांवर आम्ही फारसं लक्ष देत नाही."

"सरकारने सामान्यांना दिलासा देऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. याबद्दल शिवसेनेला काय म्हणायचं आहे? त्यांच्या सरकारने वीज फुकट देऊ, वीजबिलात दिलासा देऊ असं आश्वासन दिलं होतं," असं ते पुढे म्हणाले.
मनसे भाजपच्या जवळ येत आहे का? यावर बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, "आम्ही विरोधीपक्ष आहोत. लोकांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. भाजपसोबत जाण्याबद्दल चर्चा अजिबात नाही. हा फार दूरचा विचार आहे."

ठाकरे सरकारचा प्रयत्न मुद्यावरून लक्ष हटवण्याचा-भाजप
शिवसेना नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे माजी खासदार आणि नेते किरिट सोमय्या म्हणाले, "भष्टाचार, घोटाळे, गोंधळ आणि सरकारची अकार्यक्षमता यांच्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळ मुद्यांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करणं ही ठाकरे सरकारची स्टाईल आहे."
"वीजबिलाप्रकरणी सरकारने घूमजाव केलं. आम्ही त्याविरोधात सरकारला जाब विचारत आहोत. त्याचं उत्तर ठाकरे सरकारने द्यावं," असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला.

समान शत्रू शिवसेना
शिवसेना वारंवार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करते. त्यामुळे भाजप नेते नाराज आहेत.

तर, 2017 च्या मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर, आपली सत्ता स्थिर राहावी यासाठी शिवसेनेने मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना फोडून आपल्या बाजूने केलं होतं. सत्तेसाठी शिवसेनेतर्फे करण्यात आलेली ही राजकीय कुरघोडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही विसरलेले नसतील.
2017 ची मुंबई महापालिका निवडणूक
राज्याच्या सत्तेत जरी एकत्र होते तरी, शिवसेना-भाजपने 2017 ची मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती. शिवसेनेच्या विजयी घोडदौडीवर भाजपने अंकुश लावत 82 नगरसेवक निवडून आणले. मुंबईची सत्ता आपल्या हाती ठेवताना शिवसेनेची पुरती दमछाक झाली.

मुंबईतील या विजयाने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे शिवसेनेची मुंबईतील एकहाती सत्ता हिरावून घेऊ शकतो, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे.
दोघांना एकमेकांची गरज?
पण, मुंबईची सत्ता भाजप एकहाती जिंकू शकेल? सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला कोणा मित्राची गरज पडेल? भाजपचा नवा मित्र मनसे असेल?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी म्हणतात, "मुंबईत भाजपसोबत सद्यस्थितीत कोणीच नाही. एकटी भाजप सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. सत्तेजवळ पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या जातकुळीतला पक्ष म्हणजे 'मनसे'. त्यामुळे मनसेला चुचकारून आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करेल."
भाजपला मुंबईत पाय रोवण्यासाठी एका मित्राची गरज आहे. शिवसेनेला उत्तर देण्यासाठी सर्वांत जवळचा पक्ष म्हणजे मनसे. तर मनसेला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका मोठ्या पक्षाच्या आधाराची गरज लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईची सत्ता शिवसेनेकडे आणि राज्यातील सत्ता आपल्याकडे अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच खेळी राहिली आहे. "त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेला मदत करणार," असं कुलकर्णी पुढे म्हणतात.
त्यामुळे भाजपला मुंबईची सत्ता काबीज करायची असेल तर, त्यांना एका मित्राची गरज भासणार हे नक्की. कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधक असल्याने मनसे हा एक पर्याय भाजपकडे असू शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यावर नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती.
मनसे-भाजपसोबत जातील?
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेससोबत गेल्याने महाराष्ट्रात कट्टर हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी मनसेने भरून काढली. मनसेच्या मेळाव्यात व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यामुळे मनसे कट्टर हिंदुत्वाकडे जात असल्याचे संकेत मिळाले.

"मुंबईत मनसे भाजपसोबत गेल्यास भाजपला देशाच्या आर्थिक राजधानीत पाय पसरण्यासाठी फायदा होईल. राज ठाकरे भाजपचा होणारा फायदा नक्कीच जाणून आहेत. भाजप मोठी झाल्यास मनसेच्या दृष्टीनेही अडचणीच ठरेल. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत," असं अतुल कुलकर्णी पुढे म्हणतात.
मोदी-फडणवीसांवर टीका
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या प्रत्येक राजकीय सभेत 'ए लाव रे तो व्हिडिओ' असं म्हणत केंद्रीतील नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलं होतं. मनसे लोकसभा निवडणुक लढली नव्हती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
"मी मोदींना विरोध केला, टीकाही केली. पण, त्यांनी जे चांगलं काम केलं त्याची मी स्तुतीही केली. माझा विरोध केवळ वैचारिक असल्याचं," असं वक्तव्य राज ठाकरेंनी 23 जानेवारी 2020 ला मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं.

"कोरोना लॉकडाऊनमध्ये लोकांना मेणबत्त्या लावण्यास सांगण्यापेक्षा, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात सरकारने उचललेली पावलं, आर्थिक स्थिती कशी हाताळणार याबद्दल बोललं पाहिजे होतं," अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
मात्र, त्यानंतर गेल्या काही महिन्यांत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींविरोधात बोलणं टाळलं आहे. तर याच वर्षी जानेवारी महिन्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर मनसे-भाजप राजकीय सोयरीक होईल असे संकेत मिळणं सुरू झालं.

'मनसेने हिंदुत्व स्वीकारलं'

2006 मध्ये पक्ष स्थापन करताना मनसेच्या झेंड्यात भगवा, हिरवा, निळा आणि पांढरा असे रंग होतं. सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्याचा मनसेचा उद्देश होता. पण, 2020 येतायेता मनसेने कात टाकली आणि त्यांच्या झेंड्याचा रंग भगवा झाला. यातून राज ठाकरेंनी येणाऱ्या काळात मनसेची राजकीय भूमिका काय आहे सांगितलं.
ही राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का? हा प्रश्न तेव्हाही उपस्थित करण्यात आला होता.

भारतात अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात मनसेने केंद्र सरकारसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देताना, बांग्लादेशींविरोधात मोर्चा काढला. त्यामुळे मनसेने भाजपच्या दिशेने आणखी एक पाउल टाकलंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
शिवसेनेने हिंदुत्वावरून नरमाईची भूमिका घेतल्यानंतर, मनसेला एक राजकीय संधी मिळाली आहे, असंही राजकीय विश्लेषकांना वाटतं.

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...