शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

सचिन अहिर शिवसेनेतः 'राष्ट्रवादी तोडण्याचं काम करणार नाही'

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
"खरं तर खूप आनंद होतोय अशातला भाग नाही. एका विशिष्ट विचारानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारणात काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावं लागतात. ते निर्णय योग्य आहेत की नाही हे काळच ठरवतो", अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करताना व्यक्त केली.
 
"आदित्य तरूण आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवलं, की विकासाच्या वेगळ्या कल्पना त्यांच्या मनात आहेत. त्यामुळेच त्याला साथ देण्याची माझी जबाबदारी आहे," असंही अहिर यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना काय भावना आहेत, याबद्दल माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी सांगितलं, "शरद पवार माझ्या हृदयामध्ये आहेत. त्यांचं ते स्थान कायम राहील." मी त्यांना या निर्णयाबद्दल सांगण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट घेऊ शकली नसल्याचंही सचिन अहिर यांनी सांगितलं.
 
सचिन अहिर यांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या भावी वाटचालीची कल्पना कार्यकर्त्यांना दिली. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. आतापर्यंत जशी साथ दिलीत, तशी पुढेही द्या, असं आवाहन त्यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना केलं. त्यानंतर सचिन अहिर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाचं समर्थन करणारे बॅनर्सही कार्यकर्त्यांनी लावले होते. सचिन अहिर यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व अफवा असल्याचं सांगत शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलं.
 
'फोडाफोडीची संस्कृती आम्हाला मान्य नाही'
सचिन अहिर यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, "राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पण पक्ष फोडाफोडीची संस्कृती शिवसेनेला मान्य नाही. आम्ही माणसं जिंकत आहोत. आम्हाला फोडलेली माणसं नको आहेत, मनानं जिंकलेली माणसं हवी आहेत. "
 
"नवीन माणसं येत असताना आपण त्यांना का पक्षात घेत आहोत, त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याचा विचार करूनच आम्ही त्यांचं स्वागत करतो," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 
 
'सेनेची स्वप्नं साकार करायला अहिर यांची मदत होईल'
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणाले, "काही दिवसांपासून आमची चर्चा सुरू होती. वेगवेगळ्या विषयांवर बोलत होतो. तेव्हा लक्षात आलं, की आपण वेगवेगळ्या पक्षात आहोत. पण महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आमची स्वप्नं एक आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची महाराष्ट्रासाठी असलेली स्वप्नं साकार करायला त्यांची आम्हाला निश्चित मदत होईल."
 
सकाळी 11 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी, "शरद पवार ह्रदयात, पण आता शरीरात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं बळ घेऊन कार्यरत राहीन. राष्ट्रवादी तोडण्याचं काम आम्ही करणार नाही, पण शिवसेना वाढवण्यासाठी निश्चितच काम करू" अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर कोणत्या मतदारसंघातून याचीही चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रवेशाच्या वेळेस या प्रश्नाचं उत्तर देताना, "हा निर्णय आता पक्षाचं नेतृत्वच घेईल", असं उत्तर सचिन अहिर यांनी दिलं आहे
'शिवसेनेने आमचा पडणारा उमेदवार घेतला आहे'
एखाद्या व्यक्तिवर आपण विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तिनंच विश्वासघात केला तर निश्चितच दुःख होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अहिर यांच्या पक्षांतरानंतर दिली आहे.
 
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "15 वर्षे ते मंत्री होते, त्यांच्यावर पक्षाची मुंबईतील सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण तरीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कदाचित आपण स्वतःच्या जीवावर वरळीतून निवडून येऊ हा विश्वास अहिर यांना वाटत नसेल."
 
शिवसेनेनं आमचा पडणारा उमेदवार घेतला आहे, अशी उपरोधिक टिप्पणी नवाब मलिक यांनी केली. त्यांनी आमचा एक उमेदवार पाडला, आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू, असं आव्हानही मलिक यांनी शिवसेनेला दिलं. ज्यांच्यामध्ये जगण्याची उर्मी आहे, तेच प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात. ती उर्मीच नसलेले लोक पाण्यासोबत वाहत जातात, अशा आशयाचा शेरही नवाब मलिक यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ट्वीट केला होता.
 
राष्ट्रवादी काँग्रेससाठी फटका?
सचिन अहिर यांच्या सेना प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फटका बसणार नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं.  "सचिन अहिर हे गेल्या विधानसभा निवडणुकीत पडले होते. मतदारसंघातील कामांकडे त्यांचं लक्ष नव्हतं. त्यामुळे सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन लोकांना संधी देता येईल."
 
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर कोणत्या मतदारसंघातून लढणार याबद्दल बोलताना आसबे यांनी म्हटलं, की सचिन अहिर वरळीमधून लढण्याची शक्यता कमी आहे. सध्या शिवसेनेचे सुनील शिंदे हे वरळीचे आमदार आहेत. ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत आणि कामं करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे ते आपला मतदारसंघ सोडणार नाहीत. त्यामुळे अहिर यांच्यासाठी अन्य मतदारसंघाचा पर्याय अवलंबला जाईल. 
 
कोण आहेत सचिन अहिर?
सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सचिन अहिर छगन भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सचिन अहिर हे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे ते भाचे आहेत. वरळीच्या प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर, बीडीडी चाळींमध्ये अरूण गवळींच्या असलेल्या प्रभावाचा सचिन अहिर यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मामा अरुण गवळी यांची त्यांना मदत झाली होती.
 
अरुण गवळी यांनी स्वतः अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला होता. पण सचिन अहिर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केला नाही. अरुण गवळींच्या पाठिंब्याचा मात्र त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वापर करून घेतला. 2009 साली आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र या काळात बीडीडी चाळींचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आलं होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता.
 
सचिन अहिर यांना वरळी परिसरातून पाठिंबा आहे. सचिन अहिर यांची श्री संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईमधल्या प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक आहे.  सचिन अहिर यांचं बॉलिवूड कनेक्शनही आहे. त्यांची पत्नी संगीता अहिर या बॉलिवूड चित्रपट निर्मात्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांची भागीदारी आहे.
 
राजकीय अपरिहार्यतेतून घेतलेला निर्णय?
एकीकडे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या या अवस्थेबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत तसाही फारसा वाव नाहीये. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी चित्र फारसं आशादायक नाही. त्यामुळेच आपली राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठीच असे निर्णय घेतले जात आहेत.