शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

तीन ऑपरेशननंतर वेगळ्या झाल्या डोक्यापाशी चिकटलेल्या जुळ्या बहिणी

- रशेल बुकानन
ऑपरेशन थिएटरमध्ये एक वेगळीच गडबड सुरू होती. पाच-सहा जणांची टीम नाही तर तब्बल 20 हून अधिक तज्ज्ञ एक ऑपरेशन करत होते. त्यांचे हात एका लयीत चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना काही तणाव होता ना काही चिंता. कित्येक तास हे ऑपरेशन चाललं.
 
हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचा आनंद सर्वांनाच होता आपण एक अभूतपूर्व कामगिरी केली याचा अभिमान डॉक्टरांच्या डोळ्यांमध्ये दिसत होत. त्याबरोबरच दोन गोड मुलींना त्यांचं आयुष्य पुन्हा मिळाल्याचं समाधानही डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हतं. लंडनच्या ग्रेट ऑरमाँड स्ट्रीट या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
 
मेडिकल मिरॅकल किंवा वैद्यकीय चमत्कार म्हणावा अशीच ही घटना होती. पाकिस्तानात राहणाऱ्या जैनब बीबी यांना सफा आणि मारवा नावाच्या जुळ्या मुली झाल्या. पण जन्माच्या वेळी त्यांची डोकी एकमेकांना चिकटलेली होती. म्हणजेच त्या सयामी जुळ्या होत्या. वैद्यकीय परिभाषेत याला क्रेनियोपेगस ट्विन असं म्हटलं जातं. जैनब बीबी या आठव्यांदा गरोदर होत्या. याआधीच्या सर्व अपत्यांना त्यांनी घरीच जन्म दिला होता. पण सोनोग्राफीमध्ये त्यांना कळलं, की यावेळी जुळं आहे आणि ती अर्भकं एकमेकांशी जोडली गेली आहेत. हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलींच्या भवितव्याबद्दल त्यांना चिंता वाटू लागली. हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झालं तर तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला.
 
7 जानेवारी 2017 ला पेशावरच्या हयाताबाद हॉस्पिटलमध्ये या मुलींचा जन्म झाला. डॉक्टरांनी सांगितलं, की दोन्ही मुलींची प्रकृती उत्तम आहे. फक्त त्यांची डोकी एकमेकांना जोडलेली आहेत. जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी जैनब यांना आपल्या मुलींना पाहता आलं. एक आई म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या सांगतात, दोन्ही मुली खूप गोड दिसत होत्या. दोघींना जावळही चांगलं होतं. त्या इतर नॉर्मल बाळांपेक्षा वेगळ्या आहेत असं मला वाटलंही नाही. त्या 'अल्लाहची देन' होत्या. मुलींची नावं सफा आणि मारवा अशी ठेवली गेली. सौदी अरेबियामध्ये सफा आणि मारवा नावाच्या दोन टेकड्या आहेत. हज यात्रेमध्ये त्याचं विशेष महत्त्व आहे.
 
एका महिन्यानंतर आई आणि मुलींना हॉस्पिटलमधून घरी पाठवलं. मुलींचं ऑपरेशन करून त्यांना वेगळं करावं अशी सूचना त्यांना करण्यात आली. पण या ऑपरेशनमध्ये त्यांचा जीव जाऊ शकतो असा इशाराही हॉस्पिटलने दिला. त्यामुळेच ही जोखीम पत्करण्यास त्यांच्या आईने नकार दिला. त्यांच्या मनाची तयारीच होत नव्हती. जैनब बीबी यांनी इतरही पर्याय शोधून पाहिले. योगायोगाने त्या ओवैस जिलानी या डॉक्टरांच्या संपर्कात आल्या. जिलानी हे लंडनमध्ये न्यूरोसर्जन आहेत हे त्यांना कळलं. सफा-मारवाच्या कुटुंबियांशी त्यांची जवळीक वाढली. मुलींचं ऑपरेशन करावं असा सल्ला त्यांनी दिला.
 
मुली एक वर्षाच्या होण्याआधीच हे ऑपरेशन करावं अशी सूचना जिलानी यांनी केली होती. पण या ऑपरेशनसाठी खूप खर्च येणार होता. त्याचा भार उचलणं सफा-मारवाच्या कुटुंबियांना जवळपास अशक्यच होतं. जिलानी यांच्या ओळखीने काही सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला. तसंच इंग्लंडच्या आरोग्य खात्याकडूनही मदत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. ग्रेट ऑरमाँड स्ट्रीट हॉस्पिटलला जिलानींनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली. या सगळ्या गोष्टी होईपर्यंत मुली दीड वर्षांच्या झाल्या होत्या. इतक्या नाजूक अवस्थेतल्या मुलींच्या ऑपरेशनची जबाबदारी घेण्याची हॉस्पिटलची तयारी नव्हती पण जर आणखी उशीर झाला तर मुलींच्या जीवाला धोका आहे हे सर्वांना पटलं आणि हॉस्पिटलने ऑपरेशनच्या तयारीला सुरुवात केली.
 
जिलानींनी सफा आणि मारवाच्या कुटुंबियांना लंडनमध्ये बोलवलं. जिलानींनी त्यांची व्यवस्था रुग्णालयाच्या जवळच एका फ्लॅटमध्ये केली होती. एकदा डॉ. जिलानी आपल्या एका मित्राबरोबर जेवत होते. गप्पांच्या ओघात त्यांनी सफा आणि मारवाच्या ऑपरेशनबद्दल सांगितलं आणि या ऑपरेशनसाठी अंदाजे किती खर्च येईल हे देखील सांगितलं. त्यांच्या मित्राने लगेच एक फोन केला. तो फोन त्यांनी लावला होता पाकिस्तानचे एक बडे उद्योगपती मुर्तजा लखानी यांना. मुलींच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदार लखानी यांनी घेतली. दोन मुलींच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून मी हा निर्णय घेतला, असं लखानी सांगतात.
 
एकाच बीजांडपासून जुळ्यांची निर्मिती होते. हे बीजांड विकसित होतं आणि नंतर दोन्ही बाळं वेगळी होत जातात. पण काही परिस्थितीमध्ये मुलं पूर्णपणे वेगळी होत नाहीत आणि गर्भात मोठी होत असतानाही त्यांचे काही अवयव चिकटलेलेच असतात. सयामी जुळ्यांच्या बाबतीत सहसा असं असतं की त्यांची शरीरं जोडलेली असतात पण सफा आणि मारवांची गोष्ट वेगळी होती. त्यांची डोकी जोडलेली होती.
गुंतागुंत
दोघींच्या डोक्यांचं स्कॅन केल्यावर असं लक्षात आलं की त्यांचा मेंदू उजव्या बाजूला झुकलेला आहे. त्यामुळे त्या दोघींची डोकी एकमेकात घुसलेली होती. त्यांच्या मेंदूला काही इजा न होऊ देता त्यांना वेगळं कसं करायचं हे सर्जरी करणाऱ्या टीमसमोर सर्वांत मोठं आव्हान होतं. त्यांच्या रक्तवाहिन्या आणि नसा एकमेकांशी जोडलेल्या होत्या. एकीच्या शरीरातल्या रक्ताचा पुरवठा दुसरीच्या मेंदूला होत होता. जर छोटीशीही चूक झाली असती तर त्यांना ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता होती. असं म्हटलं जातं, की दर 25 लाख मुलांच्या जन्मामागे एका सयामी जुळ्याचा जन्म होतो. म्हणजे ही शक्यता 25 लाखांत एक इतकी दुर्मिळ आहे. जगात नेमकी अशी किती जुळी मुलं आहेत यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पण 1952 पासून आतापर्यंत केवळ 60 वेळा अशा सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे.
 
तंत्रज्ञानाची मदत
हे ऑपरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. नर्सची एक टीम सज्ज करण्यात आली. बायो इंजिनिअर, थ्रीडी मॉड्युलर आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी इंजिनिअर, भूलतज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ सगळे या ऑपरेशनची तयारी करू लागले. या सर्वांचं नेतृत्व ओवेस जिलानी करत होते. त्याबरोबर डॉ. डेव्हिड डनावे यांच्या नेतृत्वाखाली एक दुसरी टीम तयार होती. डनावे हे प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन आहेत. जेव्हा मुलींची डोकी एकमेकांपासून वेगळी केली जातील तेव्हा त्यांच्या डोक्याला नव्या कवट्या लावण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. या मुलींची तीन ऑपरेशन होणार असं ठरलं.
 
ऑपरेशनच्या आधी वातावरण कसं होतं याबद्दल डनावे सांगतात, "आम्ही एकमेकांशी चर्चा करून योजना आखली. त्या योजनेची उजळणी आम्ही मनामध्ये शेकडो वेळा केली असेल. या ऑपरेशनमध्ये असलेल्या संभाव्य धोक्यांबाबत काय सावधानता बाळगायची याची पूर्ण तयारी आम्ही आमच्या मनात केली होती." दोघी मुलींना एकसारखे गाऊन घालण्यात आले. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याची तयारी सुरू झाली. दोघीजणी मोठ्याने ओरडू लागल्या होत्या. त्या सतत या कुशीवरून त्या कुशीवर होण्याचा प्रयत्न करत होत्या.
 
पहिलं ऑपरेशन
डॉक्टरांचं पहिलं काम होतं ते म्हणजे मुलींच्या डोक्याचे तीन वेगळे भाग करणं. जिलानींनी सर्जरीसाठी असलेली मायक्रोस्कोपिक लेन्स घातली होती. आधी त्यांनी मुलींच्या डोक्यावर असलेले केस काढून टाकले. मग एक अत्याधुनिक उपकरण घेऊन अत्यंत सफाईने कवटीचा एक भाग वेगळा केला. नंतर लेन्स काढून त्यांनी दुसऱ्या एका आणखी शक्तिशाली यंत्राची मदत घेतली. 7 फुटांच्या उंचीवर हा मायक्रोस्कोप लावण्यात आलेला होता. या यंत्राच्या साहाय्याने मेंदूतली सूक्ष्माहून सूक्ष्म नस अगदी नीट पाहता येते. या मायक्रोस्कोपमध्ये पाहून सफाच्या मेंदूकडून मारवाच्या मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी कापून बंद केली गेली.
 
आता आपल्याला काही वेळ वाट पाहावी लागणार असं ते म्हणाले. ही पाच मिनिटं या दोघींच्या आयुष्यातली सगळ्यात निर्णायक पाच मिनिटं होती असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा एखादी रक्तवाहिनी बंद केली जाते तेव्हा अचानकपणे पूर्ण मेंदूचा रक्तपुरवठा थांबण्याची भीती असते. पण असं काही झालं नाही. त्यांचे मेंदू व्यवस्थितरीत्या काम करत आहेत असं समजल्यावर जिलानी पुन्हा जोमाने कामाला लागले. एकमेकींना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या त्यांनी कापून बंद केल्या.
 
त्याच वेळी डॉ. डनावे हे दुसऱ्या ऑपरेशनची तयारी करत होते. मुलींच्या कवटीच्या तुकड्यांना जोडून पुन्हा एकसंध करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. एका टीमने त्यांचे मेंदू वेगळे केले. त्यांचे मेंदू पुन्हा एकत्र होऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकचं आवरण लावण्यात आलं. त्यानंतर एकमेकींना जोडलेल्या वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या आणि कवटीचे तुकडे पुन्हा एकत्र करण्यात आले. हे ऑपरेशन 15 तास चाललं. मग त्यांना आयसीयुमध्ये नेलं आणि दोन दिवस तिथे ठेवलं.
 
त्यांना तिथं दोन दिवस ठेवण्यात आलं. अद्यापही त्यांची डोकी वेगळी झालेली नव्हती. फक्त एकमेकींच्या मेंदूला ज्या रक्तवाहिन्यांनी रक्त पुरवठा केला जात होता त्या वेगळ्या करण्यात आल्या होत्या. एका महिन्यानंतर पुढचं ऑपरेशन होतं.
व्हर्च्युअल रिअॅलिटीची मदत
असं ऑपरेशन करायचं म्हणजे एक पक्की योजना हवी आणि योजनेसाठी सहकार्य केलं ते व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या टीमने. या टीममध्ये डोक्याचे प्लॅस्टिक सर्जन होते. त्यांचं नाव ज्युलियन ओंग. आपल्या काँप्युटरच्या स्क्रीनवर आलेल्या थ्रीडी मॉडलकडे बोट दाखवून ते सांगतात, की ही अशी केस आहे जी आम्हाला कधी आमच्या वर्गात शिकवली गेली नाही. त्यासाठी या सॉफ्टवेअरची खूप मदत होते. त्यांनी त्या मुलींच्या डोक्यांची वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार केली. ऑपरेशननंतर त्यांच्या डोक्याची रचना कशी असेल हे त्यांनी ठरवलं.
 
हे फक्त काँप्युटरवरच होतं असं नाही. थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने त्या मॉडेलला सजीव रूप दिलं गेलं. थ्रीडी टेक्निशियन कोक यीन चुई यांनी प्लॅस्टिकचं एक मॉडल तयार केलं आणि आम्हाला समजावून सांगितलं की ऑपरेशननंतर त्यांच्या डोक्यावर त्वचा कशी लावली जाईल. डनावे सांगतात, की मॉडल समजून घेण्यासाठी आम्ही बराच वेळ खर्च केला. पण फक्त आम्ही मॉडलवरच अवलंबून नव्हतो तर व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लावून मुलींच्या डोक्याचे स्कॅन अनेक वेळा पाहिले. या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलच्या इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर स्पेशालिस्टची विशेष मदत झाल्याचं जिलानी सांगतात.
 
दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळी दोघींच्या नसा वेगवेगळ्या करण्याचं काम डॉक्टरांना करायचं होतं. जेव्हा त्यांची डोकी सर्जरी करून उघडली आलं तेव्हा त्यांच्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. सफाच्या गळ्यात असलेल्या एका वाहिनीत रक्त गोठलं. त्यामुळे एकीचा रक्तदाब खूप वाढला तर दुसरीचा कमी झाला. हे ऑपरेशन 20 तास चाललं. यापुढचं ऑपरेशन एका महिन्याभरानंतर होतं.
 
आता तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन होतं. आता त्यांची डोकी पूर्णपणे वेगळी करायची होती. हा महिना त्यांच्यासाठी संघर्षमय होता. कधी त्यांना इन्फेक्शन होत असे तर कधी ताप येत असे. शेवटी तो क्षण आला. जेव्हा त्यांना एकमेकींपासून वेगळं केलं जाणार होतं. अतिशय कुशलतेनं जिलानींनी त्यांना वेगळं केलं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके डॉक्टरांनी नियंत्रित केले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या जास्तीच्या त्वचेचा वापर ऑपरेशननंतर त्यांची डोकी झाकण्यासाठी करण्यात येणार होता.
 
दोघींनी वेगवेगळ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं गेलं. त्यांच्याच कवटीचे तुकडे आणि त्वचेचा भाग वापरून त्यांची डोकी व्यवस्थितरीत्या झाकण्यात आली. या ऑपरेशनसाठी सतरा तास लागले. म्हणजेच एकूण 42 तासांचं ऑपरेशन झाल्यानंतर शेवटी त्या वेगळ्या झाल्या. जेव्हा हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा जैनब यांच्या आनंदाला पारवार उरला नाही. त्यांनी जिलानींची हात हातात घेऊन त्यांचे आभार मानले.
 
त्यांना वेगळं केल्यानंतर पाच महिन्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून जाताना सर्व स्टाफ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला होता. अजूनही लंडनमध्येच थांबा, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसंच फिजिओथेरपीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 2020मध्ये त्या पाकिस्तानला परत जातील. दोघींना सोबत घेऊन जैनब आणि मुलींचे आजोबा निघाले होते. यावेळी त्या एकमेकींशी जोडलेल्या नव्हत्या पण एकमेकींसोबत नक्कीच होत्या.