शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

सप-बसप आघाडी तुटली, दोन्ही पक्ष पोटनिवडणुका वेगवेगळ्या लढवणार

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत. या निवडणुकीसाठी आघाडी होणार का, यासंबंधी तर्क-वितर्क सुरू असतानाच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.
 
या पत्रकार परिषदेमध्ये मायावतींनी समाजवादी पक्षापासून काही काळासाठी 'ब्रेक' घेतला असल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे भविष्यात आघाडी करण्यासाठी समाजवादी पक्षासमोर काही अटीही ठेवल्या आहेत.
 
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मायावतींनी म्हटलं, "सप-बसप आघाडी झाल्यापासून अखिलेश आणि डिंपल यांनी माझा मनापासून आदर केला आहे. मीसुद्धा भूतकाळ विसरून वडिलकीच्या नात्यानं त्यांना कुटुंबाप्रमाणेच वागणूक दिली."
 
मात्र लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील निकाल समाधानकारक न लागल्यानं काही गोष्टींचा विचार करणं आपल्याला भाग पडल्याचं मायावती यांनी म्हटलं.
 
काय म्हणाल्या मायावती?
केवळ राजकीय स्वार्थासाठी आम्ही नातं जोडलेलं नाहीये. प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी आम्ही एकमेकांसाठी हजर असू. मात्र राजकीय अपरिहार्यतेकडेही दुर्लक्ष करता येत नाही.
लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. समाजवादी पक्षाला यादव बहुल जागांवरही मतं मिळालेली नाहीत. त्यांचे अनेक दिग्गज यादव बहुल जागांवर पराभूत झाले आहेत.
कनौजमधून डिंपल यादव आणि बदायूमधून धर्मेंद यादव यांच्या पराभवानं आम्हाला विचार करायला भाग पाडलं. निवडणुकीमध्ये EVM मधील घोटाळा लपून राहिलेला नाहीये. मात्र तरीही अशापद्धतीनं पराभव व्हायला नको होता. सपमध्ये अंतर्गत बंडाळी झाल्याचं यावरून स्पष्ट दिसतंय.
 
या गोष्टींमुळेच आम्ही विचार करण्यास प्रवृत्त झालो. सोमवारी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यात आलं. ज्या उद्देशानं आम्ही आघाडी केली होती, तो सफल झालाच नाही, असं आमच्या लक्षात आलं. समाजवादी पक्षात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
 
समाजवादी पक्ष आपल्याच कार्यकर्त्यांना एकत्र आणू शकले, तर आम्ही निश्चितच पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतो. पण जर अखिलेश यामध्ये यशस्वी झाले नाहीत, तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे.
 
आम्हीही स्वतंत्र लढू : अखिलेश
मायावतींच्या पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनीही माध्यमांशी संवाद साधला.
 
जर आमची आघाडी संपुष्टात आली आहे. त्यासंबंधी जी कारणं दिली गेली आहेत, त्याबद्दल मी निश्चितच विचार करेन. समाजवादी पक्ष आता विधानसभा पोटनिवडणुकीत 11 जागांवर स्वतंत्रपणे लढेल. आमच्यासाठी यावेळेस आघाडीपेक्षाही ज्या राजकीय हत्या झाल्या त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.
अखिलेश यादव यांनी सांगितलं, की जर आमचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत, तर ठीक आहे. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जावं.
 
वैचारिक आधार नसलेली मैत्री तुटणं अपरिहार्य
सप-बसपच्या या 'ब्रेकअप'बद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, की सप आणि बसप हे अनेक वर्षांपासून परस्परांचे विरोधक होते. भाजपला विरोध या एकमेव उद्दिष्टानं दोन्ही पक्ष एकत्र आले होते. या आघाडीला दुसरा कोणताही वैचारिक आधार नव्हता. त्यामुळे व्होट बँकव्यतिरिक्त अन्य मतदार त्यांच्यापासून दुरावले. विशेषतः समाजवादी पक्षापासून मतदार मोठ्या प्रमाणावर तुटले.
 
"भाजपविरोधात लढताना सप-बसपनं गणिताचा विचार केला. बसपची दलित व्होट बँक आणि सपचे यादव मतदार यांची संख्या मिळून अधिक होईल असा दोन्ही पक्षांचा अंदाज होता. मात्र भाजपनं या पारंपरिक व्होट बँकेलाच खिंडार पाडलं. देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदींनी स्वतःची प्रतिमा मागासवर्गातून आलेला, मागासांचा नेता अशी निर्माण केली. त्यामुळं दलित आणि यादवांची बरीचशी मतं भाजपकडे वळली. समाजवादी पक्षाकडे मोदींच्या या प्रचाराचं उत्तर नव्हतं. आगामी विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पक्षाला ही समस्या भेडसावणार आहे," असं रशीद किडवई यांनी म्हटलं.
 
उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीत सप-बसपच्या वेगळं होण्याचा फायदा हा भाजपला होईल, असा अंदाज किडवई यांनी व्यक्त केला.
 
किडवईंनी सांगितलं, की उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी सप, बसप, काँग्रेस आणि इतर छोटे-मोठे पक्ष स्वतंत्रपणे लढतील. त्यांच्यामधील मतविभागणीचा फायदा हा थेट भाजपला होईल.