1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (18:46 IST)

पुतीन यांच्या पक्षाच्या नेत्यांचा ओडिशात रहस्यमय मृत्यू, आत्महत्या की घातपात?

pavel
Author,संदीप साहू
ANI
गेल्या वर्षभरात रशियाने घेतलेल्या निर्णयांचा जगावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात घडलेल्या एका घटनेमुळे रशियातील राजकारण तापलं आहे. 
 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याच पक्षाच्या दोन नेत्यांचा ओडिशामधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे.
 
मृतांमध्ये रशियन खासदार आणि उद्योगपती पावेल अँटोव्ह आणि त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह यांचा समावेश आहे. 
 
उंचावरून पडल्यामुळे पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय. तर त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
दक्षिण ओडिशातील रायगडा शहरात झालेल्या या दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूंमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय. 
 
ओडिशा सरकारने या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत. त्याचबरोबर मानवाधिकार आयोगानेही याची दखल घेत गुन्हा दाखल केलाय. 
 
पावेल अँटोव्ह (65) आणि त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह (61) हे ओडिशाच्या रायगडा शहरातील साई इंटरनॅशनल हॉटेलमध्ये उतरले होते. 
 
22 डिसेंबरच्या सकाळी बेदेनोव्ह हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 
 
त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी रशियन खासदार पावेल अँटोव्ह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं. त्यांचाही मृत्यू झाला होता.
 
हॉटेलच्या खिडकीतून खाली पडल्याने पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण विशेष म्हणजे अँटोव्ह खाली पडल्याचा आवाज हॉटेलच्या एकाही कर्मचाऱ्याला आला नाही.
 
परदेशी पर्यटकांच्या मृत्यूशी संबंधित असलेलं हे प्रकरण, ओडिशा सरकारने राज्याच्या क्राईम ब्रांचकडे सुपूर्द केलं आहे.
 
क्राईम ब्रांचने बुधवारी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे.
 
आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा
या दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूची चर्चा केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुद्धा सुरू आहे. यामागे मोठं कारण म्हणजे अँटोव्ह यांनी युक्रेन युद्धावर टीका केली होती.
 
पावेल अँटोव्ह हे पुतिन यांचे उघड टीकाकार असल्याचं लंडनच्या डेली मेलने म्हटलंय.
 
तर दुसरीकडे अँटोव्ह यांनी युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला होता असं न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या एका आर्टिकल मध्ये म्हटलंय. 
 
मात्र कोलकाता स्थित रशियन कॉन्सुलेटच्या एका प्रवक्त्याने या दोन्ही रशियन नागरिकांच्या मृत्यूमागे कोणताही "फाऊल प्ले" झाल्याची शक्यता नाकारली आहे.
 
तपासात काय उघड झालं?
या नागरिकांसोबत तुरोव आणि नतालिया असं एक रशियन दाम्पत्य सुद्धा होतं.
 
या दोघांची आणि तसेच ट्रॅव्हल एजंट जितेंद्र सिंह यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू आहे.
 
 या तिघांनाही रायगडावरून भुवनेश्वरला आणण्यात आलंय. क्राइम ब्रांचचे आयजी अमितेंद्र नाथ सिंह यांनी रात्री उशिरापर्यंत या तिघांची चौकशी केली.
 
ट्रॅव्हल एजंटने कोणती माहिती दिली?
व्लादिमीर बेदेनोव्ह आणि पावेल अँटोव्ह त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत भारतात आले होते. यात मिखाईल तुरोव (63) आणि त्यांची पत्नी नतालिया पानासेन्को यांचा समावेश होता.
 
दक्षिण ओडिशाच्या आदिवासी भागाला भेट द्यायची म्हणून हे सगळेजण 19 डिसेंबरला दिल्लीतील एक ट्रॅव्हल एजंट सोबत भुवनेश्वरला पोहोचले.
 
ट्रॅव्हल एजंट जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सगळेजण कंधमाल जिल्ह्यातील दारिंगबाडी या हिल स्टेशनसाठी रवाना झाले.
 
दारिंगबाडीमध्ये फिरून झाल्यावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रायगडाला पोहोचून त्यांनी हॉटेल साई इंटरनॅशनलमध्ये चेक इन केलं.
 
पुढे ते सांगतात, "22 डिसेंबरला आम्ही कोरापुटला जायला निघणार होतो. पण निघायच्या आधीच सकाळी बातमी आली की बेदेनोव्ह त्यांच्या खोलीत बेशुद्ध पडलेत. आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेलो, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता."
 
बेदेनोव्ह ओडिशात आल्यापासून सतत दारू पीत होते. ते बेशुद्ध पडले असताना आम्ही त्यांच्या खोलीत गेलो होतो, तेव्हा तिथं रिकाम्या पडलेल्या बाटल्यांचा खच दिसल्याचं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
 
पोस्टमार्टमचा रिपोर्ट आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदेनोव्हचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियक अरेस्ट) झाला आहे.
 
पण पावेल अँटोव्ह यांच्या मृत्यूबाबत सस्पेंस कायम आहे. 
 
मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांनी छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
 
तर दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की, जास्त दारू प्यायल्याने ते घसरून खाली पडले असावेत आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला असावा. पण हे केवळ अंदाज आहेत.
 
मृतदेहांवर केलेल्या अंत्यसंस्कारावरून प्रश्नचिन्ह
या दोन्ही रशियन नागरिकांच्या मृतदेहाला भडाग्नी देण्यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
रशियन राजकारणी पावेल अँटोव्ह यांच्या मृत्यूवर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केलेत.
 
पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं मनीष तिवारी यांनी म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला ही आत्महत्या किंवा अपघाती असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय.
 
मनीष तिवारी ट्विटरवर लिहितात की, "रशियन ओलिगार्क (कुलीन)... युद्धाचे टीकाकार... ऑफ बीट हॉटेल... सुविधाजनक खिडकी... तेच हॉटेल... पडून मृत्यू... दोन दिवसांपूर्वी सहकाऱ्याचा मृत्यू... तेच हॉटेल... दोघांचे ही अंत्यसंस्कार भारतात... ख्रिश्चन असूनही दफनविधी नाही... मृतदेह रशियाला पाठवले नाहीत. जर हे मृत्यू अनैसर्गिक नाहीत तर मग मी सुद्धा कधी लॉ स्कुलला गेलो नाही." 
 
पण डीआयजी राजेश पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे, दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांशी आणि रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मगच दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत या गोष्टी करण्यात आल्या आहेत. 
 
फोर्ब्सच्या यादीतही झळकले होते अँटोव्ह
रशियन राजधानी मॉस्कोच्या पूर्वेला असणाऱ्या व्लादिमीर शहरातील अब्जाधीश अशी अँटोव्ह यांची ओळख आहे. 
 
 पावेल अँटोव्ह यांना व्लादिमीरच्या प्रांतीय विधानसभेत महत्वाचं स्थान होतं. ते कृषी आणि पर्यावरणाशी संबंधित समितीचे अध्यक्ष होते.
 
 अत्यंत "दुःखद परिस्थितीत" त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रांतीय विधानसभेचे अध्यक्ष व्याचेस्लाव कार्तुखिन यांनी म्हटलंय.
 
 रायगडा शहरातील हॉटेलच्या खिडकीतून पडून पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या रशियन माध्यमांनी दिल्या आहेत.
 
 पावेल अँटोव्ह यांनी 2019 मध्ये व्लादिमीर स्टँडर्ड मांस प्रोसेसिंग प्लांट सुरू केला होता.
 
 पावेल अँटोव्ह यांच्याकडे जवळपास 140 मिलियन डॉलर इतकी संपत्ती असून फोर्ब्सने जाहीर केलेल्या रशियातील सर्वात श्रीमंत संसद सदस्यांच्या यादीत त्यांचा समावेश होता.
 
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अँटेव्ह यांचा विरोध होता का?
पॉल किर्बी
 
बीबीसी प्रतिनिधी
 
रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल अनेकांनी टीका केली होती. यातल्या बऱ्याच टीकाकरांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. अँटोव्ह यांनी देखील युक्रेन युद्धावर टीका केली होती. 
 
त्यामुळे त्यांचा मृत्यू या सिरीज मधील ताजं प्रकरण म्हणता येईल.
 
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अँटोव्ह यांनी पुतीन यांच्यावर टीका केली होती. पण नंतर अँटोव्ह यांच्यावरच टीका झाल्यावर त्यांनी माफी मागत आपलं लिखाण हटवलं होतं. 
 
रशियाने जूनमध्ये युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यावेळी कीव्ह मधील रहिवासी भागात हल्ल्यात बळी पडलेल्या एका मुलीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढत असल्याचं दिसत होतं. मुलीच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता.
 
यानंतर अँटोव्ह यांनी एक मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. यात त्या ढिगाऱ्याचा उल्लेख करताना अँटोव्ह म्हणाले होते की, "खरं सांगायचं तर याला अतिरेकी हल्ल्याखेरीज दुसरे काहीही म्हणणं कठीण आहे."  
 
त्यानंतर त्यांनी हा मेसेज डिलीट केला आणि आपण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहोत असं म्हटलं. तसेच त्यांनी या युद्धाचं देखील समर्थन केलं.
 
आपण टीका केली नसल्याचं सांगताना अँटोव्ह म्हणाले होते की, युक्रेनमध्ये जी लष्करी कारवाई सुरू आहे, त्याच्या विरोधात असणाऱ्या एकाने हा मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. हा प्रकार जाणूनबुजून केल्याचंही अँटोव्ह म्हणाले होते.
 
रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून बऱ्याच प्रसिद्ध रशियन उद्योगपतींचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
 
सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला रशियन तेल कंपनी लुकॉयलचे प्रमुख रविल मॅगानोव्ह यांचासुद्धा मॉस्कोमधील रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला होता.
Published By -Smita Joshi