गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:53 IST)

यशवंत मनोहर: 'सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा का नाही?'

यशवंत मनोहर
 
प्रसिद्ध कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' पुरस्कार नाकारला आहे.
 
विदर्भ साहित्य संघाच्या 98 व्या वर्धापन दिना निमित्त 14 जानेवारीला हा पुरस्कार सोहळा नागपूर येथे पार पडला.
 
'जीवनव्रती' हा पुरस्कार यशवंत मनोहर यांना देण्याचा निर्णय विदर्भ साहित्य संघाच्या समितीने घेतला होता. यासंदर्भातील निमंत्रण साधारण महिन्याभरा पूर्वीच त्यांना देण्यात आले होते.
 
माझी मूल्यं नाकारून मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, असं म्हणत यशवंत मनोहर यांनी हा पुरस्कार स्वीकारायला विरोध केला आहे.
 
तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी डॉ. यशवंत मनोहर यांच्या तत्वां विषयी आम्हाला आदर आहे, पण त्यांनीबी आमच्या परंपरांचा आदर करावा, असं म्हटलं आहे.
 
पुरस्कार का नाकारला?
 
यशंवत मनोहर यांनी माध्यमां समोर आपली भूमिका मांडताना सांगितलें"माझी इहवादी भूमिका, माझी लेखक म्हणून भूमिका याची कल्पना साहित्य संघाला असेल असा माझा समज होता. व्यासपीठावर काय काय असेल अशी विचारणा मी केली होती. पण सरस्वतीची प्रतिमा असणार आहे असे त्यांनी मला सांगितले. तेव्हा माझी मूल्य नाकारून हा पुरस्कार स्वीकारणे मला शक्य नव्हते म्हणून मी तो नम्रपणे नाकारला."
 
"अशा समारंभां मध्ये सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुले, भारताची राज्य घटना यांच्या प्रतिमा का ठेवता येऊ शकत नाहीत? वाड:मयीन कार्यक्रमात साहित्यिक पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा लेखकांचे फोटो का लावले जात नाहीत?" असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
 
"आम्ही आमची परंपरा बदलणार नाही'
 
यशवंत मनोहर यांनी सरस्वतीच्या प्रतिमेला विरोध केला असला तरी आम्ही आमची परंपरा बदलणार नाही, असं मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं.
 
त्यांनी म्हटलं, "साधारण महिन्याभरापूर्वी जीवनव्रती हा पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना द्यावा असा निर्णय समितीने घेतला. त्यांच्या घरी जाऊन आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निमंत्रण दिले आणि त्यांनीही ते स्वीकारले. पण काल ते कार्यक्रमाला आले नाहीत.
 
"विदर्भ साहित्य संघाचा हा अत्यंत मानाचा पुरस्कार मानला जातो. कार्यक्रम संपत असताना त्यांचा निरोप आला की ते कार्यक्रमाला येणार नाहीत. त्यांना व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा असण्यावर आक्षेप होता. यशवंत मनोहर स्वत: सहा वर्ष विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर यापूर्वी होते. त्यांनी आमच्या विशेषांकासाठी लेखही लिहिला आहे. त्यांना आमच्या परंपरांची कल्पना आहे. समारंभ कसा पार पडतो याचीही त्यांना कल्पना आहे. तेव्हा त्यांची आताची भूमिका ही विसंगत आहे."
 
* तुम्ही काळी लक्ष्मी आणि काळी सरस्वती पाहिली आहे का?
 
* गणपतीला आवडणाऱ्या मोदकांबद्दल हे माहिती आहे का?
 
यशवंत मनोहर यांच्या या भूमिकेची तुम्हाला कल्पना होती का? या प्रश्नावर म्हैसाळकर म्हणाले, "माझे एकच म्हणणे आहे की आम्ही डॉ.यशवंत मनोहर यांच्या तत्त्वांचा आदर करतो. त्यांनी त्यांच्या तत्त्वाशी तडजोड करू नये. पण आमच्याही परंपरांचा त्यांनी आदर करावा. आमच्या साहित्य संघाच्या लोगोमध्ये 'विदर्भ सारस्वतांची भूमी आहे' असा संदेश आहे.
 
"सरस्वतीला आम्ही सारस्वतांचे प्रतिक मानतो. तेव्हा या ठिकाणी देव-देवतांचा प्रश्न येत नाही. आम्ही केवळ प्रतिमे समोर समयीची ज्योत पेटवतो आणि कार्यक्रमाला सुरूवात करतो."
 
या ठिकाणी सावीत्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, फातिमा शेख यांच्या प्रतिमा असणं त्यांना अपेक्षित होते. अशी काही मागणी त्यांनी केली होती का? या संदर्भात बोलताना ते म्हणाले, "माझ्या पर्यंत त्यांचे कोणतेही पत्र आलेले नाही किंवा अशी कोणतीही विनंती त्यांनी केलेली नव्हती. त्यांना सरस्वतीची प्रतिमा नको होती.
 
"आम्ही आमच्या परंपरेनुसार कार्यक्रम पार पडला. आम्ही काय वाईट केले ज्यात बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचा कुळाचार असतो जो पाळला जाईल ही आमची भूमिका आहे. हल्ली प्रसिद्धी साठी लोक आपल्या अंगावर आपल्याच माणसाला शाई देखील फेकायला सांगतात. स्टंट करणारे लोक असतात."