सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (13:23 IST)

कोरोना लसीकरण : लशीबद्दलचे समज-गैरसमज, कोणते खरे, कोणते खोटे?

आजपासून (16 जानेवारी) भारतात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात 358 लसीकरण केंद्रांमध्ये 35 हजार पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहेत. राज्यात जवळपास आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी या पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी झाली आहे.
 
जगातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असताना, लोकांच्या मनात त्याविषयी काही शंकाही आहेत. त्याचबरोबर जगभरात आपण यापूर्वी बघितलं तसं कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत.
उदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी...या समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जाणून घेऊया लस घेताना घ्यायची काळजी.
कोरोना लसीकरण आणि गैरसमजुती
जगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहिमा नुकत्याच सुरू झाल्यात. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यात लस तयार झालीय. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा या शंका आहेत. मग 'रोग नको, उपचार आवर' म्हणण्याची वेळ लोकांवर येईल अशी भीती लोकांना वाटते. म्हणूनच लसीकरणाबरोबरच आवश्यक आहे लोकांचं समुपदेशन...
पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि 55 लाख डोस कोव्हॅक्सिनचे विकत घेतले आहेत. या दोन्ही व्हॅक्सिनविषयी सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. याशिवाय लोकांच्या मनातील गैरसमजुती पुसून टाकाव्या यासाठी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कालपासून ट्वीट्सची एक मालिकाच केली आहे.
 
कोरोना लशीमुळे नपुंसकत्व येतं का?
कोरोना लशीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशी एक समजूत फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. त्याला उत्तर देताना, हर्षवर्धन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,
 
'कोव्हिड 19च्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड 19 रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.'
 
कोविशिल्ड लशीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारण पणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो.
 
कोरोना लशीमुळे कोव्हिड 19 होतो का?
आणखी एक प्रश्न हर्षवर्धन यांना फेसबुक लाईव्ह दरम्यान सातत्याने विचारला गेला. लसच कोरोना व्हायरसवर प्रक्रिया करून बनलेली असल्यामुळे ती घेतल्यावर उलट कोव्हिड 19 आजार होऊ शकतो का?
याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणतात, 'कोव्हिडची लस घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड 19 होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो तुम्हाला झालेला असेल. पण, त्याची लक्षणं तुमच्यात दिसत नसतील. आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली.'
 
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्यात. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो.
 
नवीन कोरोनापासून या लशी बचाव करतील का?
202 हे वर्षं संपत असताना युके आणि मागोमाग दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाला. हा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याचंही दिसून आलं. या नवीन कोरोना व्हायरसवरही सध्याची लस काम करेल का हा प्रश्न सगळ्यांना आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतात,
 
'युके आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरसपासून सध्याच्या लसी बचाव करू शकणार नाहीत, असं कुठल्याही संशोधनात आढळलेलं नाही.'
 
फक्त वरिष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांचंच लसीकरण होणार का?
पहिल्या टप्प्यात वरिष्ठ नागरिक, आरोग्यसेवक अशा तीस कोटी लोकांचं लसीकरण होणार आहे. पण, मग इतरांचं लसीकरण होणारच नाही का, असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. किंवा लसीकरण कधी होणार हा प्रश्न आहे.
 
यावर डॉ. हर्षवर्धन म्हणतात, 'नाही. फक्त प्राधान्यक्रम ठरवताना सरकारने सगळ्यात आधी आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आधीपासून एखादा गंभीर आजार असलेले लोक यांना आधी लस देण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर ज्यांना गरज असेल अशा सगळ्यांना लस देण्यात येईल.'
लसीकरणाच्या वेळी घ्यायची काळजी
या व्यतिरिक्त, लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये यावरही आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला ते पाठवण्यात आलंय. त्यातलेही मुद्दे बघूया.
 
18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल.
दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी.
पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रिअॅक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.
गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेनं लस घेऊ नये. लशीच्या चाचण्या गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या अशा महिलांवर कसा परिणाम करतात हे माहीत नाही. म्हणून हा निर्णय झालाय.
ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेतायत अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.
कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारी वेबसाईट्सवर बरीच माहिती आतापर्यंत आलेली आहे. आरोग्यविभागाची वेबसाईट, पीआयबी वेबसाईट. अशा अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. मिळालेली माहिती पारखून घ्या.