शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:52 IST)

धनंजय मुंडे यांच्या ऐवजी महिला राजकारणी असती, तर समाजाने काय केलं असतं?

अनघा पाठक
बीबीसी मराठी
 
धनंजय मुंडेंवर एका महिलने बलात्काराचे आरोप केलेत. या आरोपांना उत्तर देताना त्यांनी त्या महिलेच्या बहिणीशी असणारे आपले विवाहबाह्य संबंध मान्य केले.
 
आपले संबंध पत्नी, घरचे व इतर सगळ्यांना माहिती होते. त्या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत ज्यांचा सांभाळ आपण करतोय हेही त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि लोक म्हणाले, "ठीक आहे की, त्यात काय!" कोणी म्हणालं, "हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे."
 
तसे आपण भारतीय भोचक चौकश्या करण्यासाठी जगात ओळखले जातो. इतकंच काय भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना "ते फारच खाजगी प्रश्न विचारतात, तुम्ही नका लक्ष देऊ," अशा सुचनाही दिलेल्या असतात.
 
असं असतानाही आपल्याकडची लोक एखाद्या नेत्याचं खाजगी आयुष्य त्याचा प्रश्न आहे, असं म्हणून विषय सोडून देत आहेत ही मला फार म्हणजे फारच कौतुकाची बाब वाटते.
 
धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांचं सत्य तपासा अंती बाहेर येईल, तो या लेखाचा मुद्दाही नाही. मला प्रश्न पडला तो वेगळाच. धनंजय मुंडेंच्या ठिकाणी एखादी महिला राजकारणी असती तर समाजाने इतकीच सहिष्णुता दाखवली असती का? राजकारणी सोडा नुसती एखादी महिला असती आणि तिने आपल्या विवाहेतर संबंधांची जगजाहीर कबुली दिली असती तर?
 
तर काय झालं असतं हा प्रश्न निरर्थकच म्हणावा. तरी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या बोलाव्याच लागतात म्हणून हा लेखनप्रपंच.
 
मुळात पहिलं लग्न झालं असताना विवाहेतर संबंध ठेवण हा एखाद्या महिला राजकारण्यासाठी आऊट ऑफ सिलॅबसच प्रश्न आहे. जर ती महिला कुठल्या मोठ्या राजकीय परिवाराशी संबंधित नसेल आणि तिला राजकारण वारस हक्काने मिळालेलं नसेल.
 
सेल्फमेड महिला राजकारणी, ज्यांनी मोठी पदं भूषवली पण ज्यांना काहीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, अशांची नावं काढून बघा. ममता बॅनर्जी, मायवती, जयललिता आणि अनेक... यांच्या वाटेला लग्न, संसार आलेले नव्हतेच.
 
लांब जायची काय गरज, 2019 साली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका कव्हर करताना मला अनेक तरूण, तिशीच्या आतबाहेरच्या महिला नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की लग्न सध्यातरी त्यांच्या डोळ्यासमोर नाही.
 
कारण राजकारण हा 9-5 जॉब नाही, त्यामुळे राजकीय परिवारातून न येणाऱ्या महिलेला घरच्यांकडून सपोर्ट मिळेलच असं नाही. संसार आणि राजकारण दोन्ही एकत्र करणं बाईला सोपं नाही. हा पहिला मुद्दा.
 
दुसरा मुद्दा संधीचा. जगभरातले गाजलेली या प्रकारची प्रकरणं घ्या. मग ते बिल क्लिंटन यांचे व्हाईट हाऊस मधल्या इंटर्नशी असणारे संबंध असोत, आरनॉल्ड श्वात्झनेगर यांचे घरातल्या मदनीस बाईशी असणार संबंध आणि त्यातून झालेलं मुलं असो किंवा अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे पॉर्नस्टार सोबत असलेले संबंध असो, सगळ्या प्रकरणात कमालीची सहिष्णुता समाजाने दाखवली आणि त्यांच्या बायकांनीही थोडी आदळ आपट करून प्रकरण सोडून दिलं.
 
आपण हे गृहित धरलेलं असतं का की सत्ता हाती असणारे पुरुष थोड्याअधिक प्रमाणात हे असलं काही करणारच?
 
द अटलांटिक या अमेरिकन वृत्तपत्रात 'महिला आणि पुरुषांच्या सेक्स स्कॅण्डल्स मधला फरक अशा शीषर्काचा एक लेख छापून आला होता. सत्ताधारी पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधाचं विश्लेषण करताना त्यात म्हटलं होतं की, 'यशाचं, सत्तेचं बक्षीस म्हणून पुरुष अशा संबंधांकडे बघतात. हे आजचं नाही, प्राचीन काळापासून जेते पराजितांच्या महिला युक्तीने किंवा शक्तीने जिंकायचे.'
 
लढाई करा, जिंका, बाई मिळवा या मानसिकतेची मुळं आजही या ना त्या स्वरूपात रूजलेली आहेतच. सत्ताधारी पुरुषांनी महिलांचं शोषण केल्याच्या खर्व-निखर्व घटना सापडतील, मुद्दा तो नाही. मुद्दा आहे परस्परसंमतीने ठेवलेल्या विवाहेतर (आजकालच्या भाषेत सांगायचं तर एकीशी असणाऱ्या कमीटमेंट व्यतिरिक्त ठेवलेल्या) संबंधांविषयी.
 
जरासा चघळून झाला की हा विषय समाजही सोडून देतो कारण यशस्वी, सत्ताधारी पुरुषाने हे करणं अपेक्षितच असतं, किंबहुना ते त्याच्या यशस्वी असण्याचं मानक असतं.
 
मग यशस्वी किंवा सत्ताधारी स्त्रीचं काय? तिचं यशस्वी किंवा सत्ताधारी असणं हेच तिचं बक्षीस. अजूनही प्रामुख्याने पुरुषी असणाऱ्या या जगात स्त्रीचं अधिकारपदावर असणं आणि पुरुषांनी ते रडतखडत का होईना मान्य करणं हे तिचं बक्षीस असतं. या लेखात म्हटल्या प्रमाणे 'पुरुषांचं सौंदर्य त्यांची सत्ता असते तर स्त्रीचं सौंदर्य तिचं सौंदर्य (इथे स्त्रीसुलभ गुण म्हणूयात) असते. सत्ताधारी स्त्री अशीही नकोशीच असते.'
 
आपल्या आसपासच्या सत्ताधारी महिला आणि त्यांच्याविषयी काय बोललं जातं ते आठवून पाहा. आगाऊ, शहाणी, खडूस, आतातयी पासून 'शूर्पणखा' अशी सगळी विशेषणं लावली जातात.
 
राजकारणात किंवा समाजात इतर ठिकाणी सत्तास्थानावर असलेल्या महिलेला हातात तेलाने भरलेली, नुस्ती तेलाने नाही उकळत्या तेलाने भरलेली परात घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचं कसब अंगी बाणवावं लागतं. तरीही तिला पुरुषाइतका आदर मिळेलच असं नाही. इथेच येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा... चारित्र्यहननाचा.
 
गेल्या दीड-दोन वर्षांत ग्रामीण किंवा शहरी पातळीवरच्या जितक्या स्थानिक महिला राजकारण्यांशी माझं बोलणं झालं प्रत्येकीने हेच सांगितलं की चारित्र्यहनन केलं जातंच. ही गोष्ट आता या महिलांच्या अंगवळणी पडून गेली आहे. कित्येक स्थानिक पातळीवरच्या नेत्या गाडी चालवायला शिकल्या कारण कोणा पुरुष सहकाऱ्याबरोबर गेलं तर लोक चर्चा करतील.
 
"भारतीय मतदार मान्यच करणार नाहीत हे आणि नुसतं मान्य न करत थांबणार नाहीत, त्या महिलेची संपूर्ण कारकीर्द उलटीपालटी होईल," पत्रकार असलेल्या प्रियदर्शिनी हिंगे मला सांगत होत्या.
 
"धनंजय मुंडेंनी जे जाहीरपणे मान्य केलं, त्याला धैर्य लागत. इथेही आपण धैर्य हा शब्द वापरतो आहोत एका पुरुषाच्या बाबतीत. मग महिलेची अवस्था काय होईल? अजून एक, एखाद्या पुरुषाला एकापेक्षा जास्त बायका असणं, त्याचे विवाहेतर संबंध असणं हे मर्दानगीचं द्योतक समजलं जातं. त्यामुळे असं काही घडलं की त्याची चर्चा होते, पण म्हणून लोक त्याला आक्षेप घेत नाही. महिलांचं म्हणशील तर विवाहेतर संबंध लांबची गोष्ट, मी कित्येक अशा महिला मंत्री पाहिल्या आहेत ज्या रोजच्या आयुष्यातही गरज नसताना दडपणाखाली वावरत असतात. कारण उगाच कोणाला चर्चा करायला वाव नको.
 
"मी बघितलं आहे की महिला मंत्री कोणाला भेटायचं जरी असेल तरी विश्वासातल्या माणसाला, घरातल्या जेष्ठ व्यक्तीला सोबत ठेवतात. त्या घाबरतात, किंवा एकटीने काम करू शकत नाही असं नाही, पण फुकटच्या अफवा आणि वावड्या त्यांना वैताग देतात. राजकारणच कशाला, रोजच्या आयुष्यातही एखाद्या महिलेने अशी भूमिका घेणं शक्य नाही. तिचं जगणं मुश्कील होईल," त्या सविस्तर सांगतात.
 
सेक्स अँड करप्शन : हाऊ सेक्सिझम शेप्स व्होटर्स रिस्पॉन्सेस् टू स्कॅण्डल हा शोधनिबंध शोधायचा प्रयत्न करतो की, एखादी महिला राजकारणी अशा प्रकारच्या घटनेत सहभागी असली तर तिला समाज कशा प्रकारे वागवतो.
 
या शोध निबंधाच्या लेखक बार्न्स, ब्युलिओ आणि सॅक्स्टन (2018) लिहितात की, 'राजकारणात महिला दिसणं आता दुर्मिळ राहिलेलं नाही, पण तरीही पितृसत्ता मानणाऱ्यांच्या पचनी हे पडत नाही. त्यामुळे जर सत्तास्थानावरच्या महिलेने पारंपारिक नियमांचा भंग केला तर तिला इतकी कठोर वागणूक दिली जाते, जी पुरुषाच्या वाटेला कधी येणार नाही.'
 
जगभरात महिलांना वेगळे आणि कठोर नियम लावले जातात. महिला राजकारणी अशा प्रकारच्या स्कॅडलमध्ये अडकली तर ती महिला पितृसत्तेच्या दोन्ही नियमांचा भंग करत असते, एक म्हणजे ती महिला असून तथाकथित नैतिकतेची मुल्यं पाळत नसते आणि दुसरं म्हणजे तिने राजकारणात स्थान निर्माण केलेलं असतं आणि पर्यायाने पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान दिलेलं असतं. त्यामुळे तिला दुप्पट शिक्षा देण्याकडे लोकांचा ओढा असतो.
 
"सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्यातून उठवतात," सामजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल सांगतात. सत्यभामांनी या सगळ्या प्रकरणावर कोपरखळी मारत भाष्य करणारे काही व्हीडिओही सोशल मीडियावर टाकले आहेत.
 
"मागे एका महिला राजकारण्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. लोकांनी चवीचवीने तो चघळला. त्या महिलेची इच्छा, आकांक्षा, कसब, कर्तृत्व कशाचाही विचार न करता लोक नाही नाही ते बोलले तिच्याबाबतीत. हे नेहमीच घडत आलंय. लोक अशा वेळेस तोंड काढायला जागा ठेवत नाहीत. राजकारणी लोक कशाला, उद्या माझ्या सारख्या सर्वसामान्य बाईने जरी हे म्हटलं, तरी लोक आत्महत्या करायला लावतील," सत्यभामा उद्वेगाने म्हणतात.
 
राजकारण्यांचे आदर्श
 
दिल्लीतले मानसशास्त्रज्ञ प्रवीण त्रिपाठी सांगतात की, अशा मोठ्या व्यक्तींनी केलेली विधानं किंवा कृती एखाद्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात.
 
"मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, इंट्रोजेक्शन नावाची. म्हणजे नकळत आपल्या नेत्यांच्या गोष्टी आपल्यात भिनायला लागतात. हाडाच्या समर्थकाला आपल्या नेत्यासारखं बनायचं असतं मग तो आपल्या नेत्यासारखं वागायला, बोलायला लागतो. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी मानून तसं जगायला लागतो.
 
"दुसरा मुद्दा अशा लोकांबद्दल आहे जे कुणाचेही समर्थक नसतात. अशा माणसांच्या विचारांना जर एखाद्या मोठ्या पदावरच्या माणसाने दुजोरा दिला तर त्यांना बळ मिळतं."
 
हा नेता फक्त राजकीय नेताच असेल असं नाही, तर आध्यात्मिक असू शकतो, खेळातला कोणी आदर्श असू शकतो किंवा अगदी फिल्मस्टारही. म्हणजे दोन्ही बाजूंनी वाहाणारा प्रवाह असतो. एक म्हणजे सर्वसामान्य लोक आपल्या पुरुष नेत्यांना महिला नेत्यांच्या तुलनेत सुट देतात आणि दुसरं म्हणजे मग याच नेत्यांच्या वागण्याचं अनुकरण करायला लागतात.
 
'सत्ता समाजाला विसरायला लावते'
 
अर्थात महिला आणि पुरुषांसाठी, विशेषतः राजकारण्यांसाठी समाज नियम वेगवेगळे लावत असला तरी महिला राजकारणी असं वागली तर तिला टोकाचा त्रास होईलच असं नाही, असंही मत काही जणांचं आहे.
 
सामजिक कार्यकर्त्या राजश्री साकळे म्हणतात, "आपण दोन गट वेगळे काढू. एखादी सर्व सामान्य बाई असेल, तिने तिच्या मर्जीने असे संबंधं ठेवले असतील किंवा तिच्यावर अत्याचार झाला असेल, तिला होणार त्रास वेगळाच आहे.
 
"त्यातून तिची सुटका नाही. राजकारण्याचं म्हणाल तर ज्या प्रमाणे धनंजय मुंडेंचं प्रकरण लोक 'त्यांचं खाजगी प्रकरण आहे' म्हणून काही दिवसांनी विसरून जातील, तसंच एखादी महिला राजकारणी असती तरी लोक विसरले असते. पुरुषापेक्षा महिलेचं प्रकरण विसरायला जास्त वेळ लागला असता, पण लक्षात घ्या, सत्ता समाजाला विसरायला लावते!"