हिंदू, शीख, बुद्ध, जैनांना NRCमुळे देश सोडावा लागणार नाही: अमित शहा
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष NRCसंदर्भात जनतेची दिशाभूल करत आहे. मी सर्व हिंदू, बुद्ध, शीख, जैन स्थलांतरितांना हमी देतो की तुम्हाला देश सोडून जावं लागणार नाही. नागरिकत्व विधेयक संमत करण्यात येईल, त्यानुसार भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. मात्र घुसखोरांची गय केली जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.
NRCसंदर्भात एका सेमिनारमध्ये ते बोलत होते. "श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच आज पश्चिम बंगाल भारतीय प्रजासत्ताकाचा भाग आहे," असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, शहा यांच्या वक्तव्यावरून असउद्दीन ओवेसी यांनी शहा यांच्यावर टीका केली आहे. केवळ मुस्लिमांनाच या देशात स्थान मिळणार नाही असा शहा यांच्या वक्तव्याचा अर्थ होतो. तुम्हाला मुस्लिमांची अलर्जी आहे. मात्र संविधान सगळ्यांना समान मानतं. धार्मिक आधारे नागरिकत्व हे बेकायदेशीर आहे आणि ते टिकणार नाही असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.