बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (14:36 IST)

ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर : जेव्हा प्रेमाचं भूत मानसिक आजार बनतं तेव्हा...

सिंधुवासिनी
'तू हां कर या न कर तू है मेरी क...क...किरन'
 
'ठुकराके मेरा प्यार, मेरी मोहब्बत का इन्तक़ाम देखेगी…'
 
'तुमने मुझे ठुकराया तो मैं अपनी जान दे दूंगी'
 
कदाचित तुम्हाला ही फिल्मी डायलॉगबाजी किंवा ड्रामा वाटेल, पण थांबा..
 
पहिल्या नजरेत हा बॉलिवूडचा ड्रामाच वाटेल, पण तो आपल्या खऱ्या आयुष्यापासून फार दूर नाहीए. कारण प्रेमात आलेला नकार काही लोक पचवू शकत नाहीत. नकारानंतर ते चित्रविचित्र वागायला लागतात.
 
याची काही उदाहरणं पेपर आणि टीव्हीच्या हेडलाईन्समध्ये अशी बघायला मिळतात:
 
'काही महिने प्रेयसीचा पाठलाग करत राहिला माथेफिरु प्रियकर'
 
'प्रियकराचा पाठलाग करत करत ती घरापर्यंत पोहोचली'
 
अशीच एक घटना अमेरिकेत घडली होती. जिथं एका महिलेनं एका पुरुषाला सलग 65 हजार मेसेज पाठवले होते.
 
ते दोघे एका डेटिंग वेबसाईटवर भेटले होते, आणि ती महिला पुरुषाच्या प्रेमात पडली. कालांतराने पुरुषाने तिला नकार दिला. पण तो नकार ती पचवू शकली नाही. ती त्याला ब्लॅकमेल करु लागली.
 
इतकंच नाही तर तिने पुरुषाला तब्बल 65 हजार मेसेज पाठवले. त्यानंतर ती पुरुषाच्या घरापर्यंत पोहोचली. प्रकरण इतकं वाढलं की शेवटी पोलिसांना त्या महिलेला अटक करुन तुरुंगात टाकावं लागलं.
 
यूकेची वेबसाईट 'मेट्रो'च्या माहितीनुसार पोलिसांच्या चौकशीत महिलेनं सांगितलं की "त्याला भेटून मला असं वाटलं की मला माझा 'सोलमेट' भेटला आहे. तो खूपच सुंदर आहे. मला माहिती नव्हतं की माझ्या मेसेजेसमुळे तो इतका त्रासून जाईल"
या महिलेची वर्तणूक पाहता मनोवैज्ञानिकांना असं वाटतंय की ती 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर'ची शिकार झाली आहे.
 
खरंतर एखाद्याचा पाठलाग करणं, एखाद्याला ब्लॅकमेल करणं, सातत्यानं मेसेज करणं, कॉल करुन त्रास देणं याला 'स्टॉकिंग' म्हणतात. आणि कायद्याने तो अपराध आहे. पण बऱ्याचदा हे फक्त स्टॉकिंगपुरतं मर्यादीत नसतं. यामागे 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' हा आजार असतो.
 
काय आहे ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर?
आरोग्यविषयक माहिती देणारी अमेरिकन वेबसाईट 'हेल्थलाईन'च्या नुसार, "ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर (OLD) एका प्रकारची 'मानसिक स्थिती' आहे.
 
यात लोक एखाद्या व्यक्तीमध्ये इतके गुंतून जातात की त्यांना आपण प्रेमात पडलोय, असं वाटतं. त्यांना असं वाटतं की त्या व्यक्तीवर आपला हक्क आहे, आणि त्यानेही आपल्यावर प्रेम केलंच पाहिजे. समोरची व्यक्ती जर प्रेम करत नसेल तर हा नकार अशा व्यक्ती पचवू शकत नाहीत. ते समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा ताबा घेऊ इच्छित असतात."
 
ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरची लक्षणं
एखाद्याविषयी जबरदस्त आणि असाधारण आकर्षण
त्या व्यक्तीबद्दल मनात सतत विचार येणं आणि स्वत:वर नियंत्रण न राहणं
समोरच्या व्यक्तीचा नकार पचवण्याची क्षमता नसणं
इतर जणांशीही त्याच्याबद्दलच बोलणं, त्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी कारणं शोधणं
त्या व्यक्तीसाठी इतर नात्यांना विसरुन जाणं
वारंवार मेसेज करणं, कॉल करणं, पाठलाग करणं, सोशल मीडियावर स्टॉक करणं
ब्लॅकमेल करणं, कुठल्याही स्थितीत आपला प्रस्ताव मान्य करण्यासाठी प्रयत्न करणं
विमहंस (VIMHANS) मध्ये क्लिनिकल साइकॉलजिस्ट असलेल्या डॉ.नीतू राणा सांगतात की "खरंतर वर उल्लेख केलेल्या भावना काहीवेळा माणसं प्रेमात पडतात त्यावेळीही पाहायला मिळतात. पण अशा भावना जर अचानक वाढल्या आणि त्यावर नियंत्रण नसेल तर शक्य आहे की संबंधित व्यक्ती 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' ची शिकार झाली असावी.
 
ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर होण्याचं कारण काय?
व्यवसायानं मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या डॉ. शिखा यांच्या मते 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
 
त्या सांगतात की "लव्ह डिसऑर्डरसाठी कुठली एखादीच गोष्ट कारणीभूत असते असं नाही. बऱ्याचदा त्याचा संबंध दुसऱ्या मानसिक आजारांशीही असतो."
 
मानसिक स्वास्थ्याशी निगडीत अशा काही समस्या ज्या ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरसाठी कारणीभूत ठरु शकतात.
 
अटॅचमेंट डिसऑर्डर - यामुळे लोकांना आपल्या भावनांवर आणि एखाद्याशी असलेल्या संबंधांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. काहीवेळा असे लोक एखाद्यापासून गरजेपेक्षा जास्त दूर जातात, तर काहीवेळा गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहतात. यामागे बालवयात आणि तरुणवयात कुटुंबात आलेले कटू अनुभवही कारणीभूत असू शकतात.
बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर - याला 'इमोशनली अनस्टेबल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' सुद्धा म्हटलं जातं. यामुळे लोकांना आपल्या भावना समजून घेण्यात अडचणी येतात. त्यांच्यात नात्यांबाबत थोडी भीती आणि असुरक्षिततेची भावनाही असते. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरची शिकार झालेल्या लोकांना ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर होण्याचीही शक्यता असते.
इरोटोमेनिया - इरोटोमेनियाची शिकार झालेल्या व्यक्तीला असा भ्रम असतो की समोरची व्यक्ती आपल्या प्रेमात आहे. पण प्रत्यक्षात असं काही नसतं. इरोटोमेनियामुळे 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' होण्याचा धोका वाढत असतो.
डॉ. शिखा सांगतात की, "एखादी व्यक्ती आत्मविश्वासाचा अभाव आणि असुरक्षिततेची भावना यामुळेही 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' ची बळी ठरू शकते. काहीवेळा लहानपणी कुटुंबाचं प्रेम न मिळणं किंवा आपल्या जवळच्या लोकांपासून दुरावा निर्माण होणं यामुळेही ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर होऊ शकतो."
 
डॉ. नीतू राणा यांच्या मते आपण अनेकदा ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरला प्रेम समजण्याची चूक करतो. पण खरंतर असं नसतं.
 
त्यांच्या मते ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरने पीडित व्यक्ती फक्त स्वत:लाच नाही तर दुसऱ्यालाही त्रास देत असते.
 
डॉ. शिखा सांगतात की महिला किंवा पुरुष दोघेही ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरचे बळी ठरू शकतात.
 
त्यांच्या मते, "आपला सामाजिक पायाच असा आहे की ज्यात पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करताना फारशी अडचण येत नाही. पण महिलांसाठी हे खूप कठीण असतं. कदाचित त्यामुळेच पुरुष जर ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरची शिकार झाली तर ते खूप गंभीर प्रकरण होतं. ते मुलींचा पाठलाग करतात, त्यांना धमकावतात, मुलींना सोशल मीडियावर स्टॉक करतात. काही वेळा तर ते स्वत:ला इजाही करतात."
 
मदतीची गरज आहे, हे कसं कळणार?
डॉ. शिखा यांच्या मते काहीवेळा आपल्याला असं वाटलं की, एखादा व्यक्ती आपल्याला प्रमाणाबाहेर प्रभावित करत आहे, किंवा त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होतो आहे, तर जवळच्या व्यक्तीची मदत घ्यायला मागेपुढे पाहू नका.
डॉ. नीतू सांगतात की "जर तुमच्या खाण्या-पिण्यात, झोपण्यात किंवा कामात जर एखाद्या व्यक्तीमुळे फरक पडत असेल तर तुम्हाला मदतीची गरज आहे."
 
डॉ.नीतू आणि शिखा दोघीही सुरुवातीला आपल्या काही मित्रांची मदत घेण्याचा सल्ला देतात.
 
डॉ. नीतू सांगतात की, "अशावेळी एक गोष्ट खूप गरजेची असते, ती म्हणजे तुमच्या भावना आणि उर्जा दोन्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी खर्च करा. आणि त्यानंतरही तुमचं कामात मन लागत नसेल किंवा तुम्ही त्याच व्यक्तीचा सतत विचार करत असाल तर तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे"
 
काऊन्सिलिंग आणि थेरपीने ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरला बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणणं शक्य आहे. पाच-सहा सेशन्सनंतर त्याचा परिणाम जाणवू लागतो, आणि माणूस पहिल्यासारखा सामान्य होऊ लागतो.
 
डॉ.नीतू सांगतात "एखाद्यावर जीवापाड प्रेम करण्यात काही चूक नाहीये. पण आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की आपल्या प्रेमामुळे निदान दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला कुठलं गंभीर इजा होऊ नये."