सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (11:23 IST)

निमित्त 'फ्रेंडशिप डे'चे...

'जीवन' हे नाटक आहे, आणि या नाटकाचा निर्माता-दिग्दर्शक परमेश्वर तर मानव हा कलाकार आहे. 'मानव' या कलाकाराला जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. 'जीवन' नावाच्या नाटकात प्रत्येक व्यक्ती कुठली ना कुठली भूमिका ही साकारत असतो तर निर्माता- दिग्दर्शक परमेश्वरही एकाच नाटकात विविध कथानके रंगवीत असतो. परमेश्वरालाही मान्य करावी लागेल, अशी महत्त्वाची भूमिका म्हणजे 'मित्र' नावाची आहे. आजपर्यंत 'बेस्ट परफॉर्मस'चा अवार्ड देखील 'मित्र' या पात्रालाच मिळाला आहे व भविष्यातही त्यालाच मिळावा, अशी माझीच काय तर तुमचीही मनीषा आहे ना?
 
जीवनातील 'मित्र' या पात्रावर दिग्दर्शक प्रकाशाचा कवडसा सोडून वेगवेगळ्या अंकात पडदा न टाकता विविध रंगाच्या स्लाईडस चेंज करत असतो. 'मित्र' नावाचे पात्र हे आताचं नाही तर परमेश्वराने आधीच तयार करून ठेवले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत त्याची अनेक दाखले आढळतात. परमेश्वर आणि भक्त यांच्यातील अतूट मैत्री ही संत तुकाराम व पांडुरंग, रामायणात श्रीराम व भक्त हनुमान तर महाभारतातील श्रीकृष्ण व सुदामा यांच्या रूपाने दाखविली आहे.
 
'मैत्री' करण्यासाठी 'फ्रेंडशिप डे'च पाहिजे, असे नाही तर 'मैत्री' जीवनाच्या बागेतील सुगंधित फूल आहे की, त्या फुलाचा कधीही आणि कुठेही गंध घेऊन आपण मंत्रमुग्ध होऊ शकतो... कारण, मित्र बनवायची बालघुटी आईनेच तर आपल्याला लहानपणी दिली आहे.
 
मुळात व्यक्ती हा समाजप्रिय प्राणी आहे. तो जेव्हा पृथ्वीवर अवतरला तेव्हापासूनच तो समूह करून राहायला लागला. त्यानंतर तर त्याने त्याच्या बुद्धीच्या जोरावर प्रगती साधली. आपण काय नवीन करतो आहे किंवा काय नवीन केले आहे, हे कुणाला तरी सांगावं व त्याच्या आनंदात त्याच्या मित्र मंडळींनी सहभागी व्हावं... ही प्रामाणिक अपेक्षा!
 
बालपणी आपण पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो, तेथे आलेल्या आपल्यासारखे इतरांना पाहतो. त्यांच्यातील ठराविक मुला-मुलींशी आपण बोलतो, शाळेच्या मधल्या सुटीत डबा खातो, मस्ती करतो, खिदळतो बस्स तेव्हापासून व्यक्तिच्या जीवनात 'मित्र' नावाच्या पात्राची 'इंट्री' होते. त्याच्या मनातील 'मित्र' नावची कळी फुलात रूपांतरित होते. तो थोडी 'फ्रेंडशिप डे' असतो. मानवी जीवनातील प्रत्येक दिवस हा 'फ्रेंडशिप डे'च असतो.
'मित्र' हा सुख-दु:ख वाटणारा... संकट प्रसंगी मदतीला धावणारा... विवाहाच्या दिवशी मिरवणुकीत खांद्यावर घेऊन नाचणारा... तर आयुष्याच्या संध्याकाळी तिरडीला खांदा देत स्मशानापर्यंत साथ देणारा..! 'प्रेमा' प्रमाणे मैत्रीला दहाही दिशा माफ असतात. मैत्री करायला वय, वेळ, स्थळ याच्या कशाच्याच मर्यादा येत नाहीत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्याला 'मैत्रीण' नाही, तो माणूसच नाही. अशी घोषणा तर कॉलेज कट्टयावरील टुकार कारट्यांनी करूनच टाकली आहे.
 
'मैत्रीण' ही देखील महत्त्वाचीच असते. कॉलेजात तासिका न चुकविता आपल्याला नियमित नोटस पुरविणारी... अबोध मनाच्या कप्प्यातील गाठ थोडी सैल करणारी... तर स्वतः:पेक्षा आपली काळजी घेणारी... जीवाभावाच्या मैत्रिणीमुळे ही व्यक्तीचे आयुष्य फुललेले असते.
 
आयुष्याच्या प्रवासात अशा मित्र, मैत्रिणींची तर पावलोपावली व्यक्तीला मित्राची गरज ही भासत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा 'फ्रेंडशिप डे' म्हणून साजरा करा. मित्र केले पाहिजे, मैत्रिणी केल्या पाहिजेत.
 
आपल्याला जागतिक मैत्री दिवसाच्या अंर्तमनातून शुभेच्छा..!
-संदीप पारोळेकर
-संदीप पारोळेकर