मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पंकजा मुंडे: तुमचा पराभव झाला की घडवून आणला यावर पंकजांनी दिलं हे उत्तर...

प्राजक्ता पोळ
गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी परळीत मेळावा घेतला. यावेळी एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. त्यांनी आपली नाराजी जाहीर केली.
 
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक गोष्टींची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी पंकजा मुंडे यांची मुलाखत घेतली.
 
भविष्याचं नियोजन, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, एकनाथ खडसेंची नाराजी आणि पंकजा मुंडेंची भवितव्याची पुढची वाटचाल या विषयावर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
 
गोपीनाथ गडावरून तुम्ही महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. हा दौरा नेमका कशासाठी आहे- स्वतःचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी की महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी?
 
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मी मुंबईला आले. त्यानंतर सरकार स्थापन होतंय की नाही होतंय यामध्येच मी व्यस्त राहिले. त्यामुळे माझे जे फॉलोअर्स आहेत, त्यांना वाटलं, की मी बाहेरच पडत नाहीये.
 
त्यामुळे त्यांना 'चीअर अप' करणं गरजेचं होतं, की मी बाहेर पडणार आहे, त्यांच्यापर्यंत येणार आहे. मी कोणताही विषय घेऊन येऊ शकते. सोशल असेल किंवा अन्य काही.
 
पण ही अस्तित्त्वाची लढाई आहे की महत्त्वाकांक्षेची?
 
माझ्या अस्तित्वाचा प्रश्नच नाहीये. आपण निवडणुकांचा विषय घेतला तर तिथे पराभूत झाल्यानंतर त्या रोलपुरतं माझं अस्तित्त्व नाहीये. पण मी तर आहेच.
 
म्हणजे हा दौरा तुम्ही गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली करणार आहात?
 
असं मी जाहीर केलं नाहीये. मी म्हटलं, की या पुढचं काम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहे. आतापर्यंत मी मंत्री होते. मंत्री असताना आपण अनेक गोष्टी आपल्या लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी करू शकतो. आता मी त्या गोष्टींची मागणी करू शकते. सोशल अँगल आहेत. मी बरीच कामं करते.
 
ऊसतोड कामगारांच्या मुलांचा इलाज आहे, कोणाची फी भरायची आहे, कोणाचं ऑपरेशन करायचंय, कोणाला उद्योग काढून द्यायचाय अशी अनेक कामं असतात. या कामांसाठी एनजीओ हे एक माध्यम आहे आणि मी हे काम आज करत नाहीये. मी जेव्हा मंत्री होते, तेव्हाही मी एनजीओच्याच माध्यमातून सोशल काम करत होते. कारण मंत्री म्हणून मी सोशल काम करू शकणार नाही.
 
मग पक्षाचं नाव का नको?
 
पक्षाचं नाव नाहीये, असं कुठे आहे? मी म्हणजे पक्षच आहे. मी भाजपचीच कार्यकर्ता आहे.
 
देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, की मी पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानऐवजी भाजपचं नाव वापरावं अशी विनंती करेन.
 
पंकजा मुंडे म्हणजे भाजप आहे. मी स्पष्ट सांगितलं आहे, की मी भाजप सोडणार नाही. माझा जन्म आणि राजकीय जन्मही भाजपमध्येच झाला आहे. भाजपच्या जन्माच्या आधीपासून मुंडेसाहेब भाजपच्या विचारांशी जोडले गेले आहेत. मुंडेसाहेबांची समाधी आम्ही कमळातच बांधली आहे. मी भाजप सोडणार नाहीये. मी हक्कानं म्हटलं होतं, की हा माझ्या बापाचा पक्ष आहे. हे ग्रामीण शब्द आहेत. हा हक्क आहे. ही माझी पार्टी आहे, हे समजून भाजपमध्ये काही चुकलं किंवा काही उत्तम झालं तर सगळे विषय आपुलकीनं हाताळत होते. भविष्यातही मी हाताळेन.
 
तुमच्या पराभवाची खूप चर्चा झाली. हा पराभव घडवून आणला गेला की घडला?
 
माझ्या पराभवाच्या चर्चेमध्ये विजयाच्या चर्चा कुठे गेल्या? लोकं सहसा विजयाची चर्चा करतात. माझ्या पराभवाची चर्चा का झाली, हा माझाच प्रश्नच आहे.
 
पराभवाची चर्चा झाली कारण त्यामागे कोणते अदृश्य हात होते, का असं बोललं जातंय.
 
असं कोण बोललं?
 
असं एकनाथ खडसे बोलले…
 
एकनाथ खडसे बोलले होते 4-5 डिसेंबरला. निकाल त्याच्या एक महिना आधी लागला आहे. आणि असं मी बोलले का?
 
पण त्यांनी असं म्हटलं, की रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपच्याच काही लोकांनी घडवून आणला. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते पुरावे मी प्रदेशाध्यक्षांना दिले आहेत. त्यांची त्यासंदर्भात तुमच्याशीही चर्चा झालीये...
 
त्यांची माझ्याशी चर्चा झाली, ती रोहिणी खडसेंच्या झालेल्या पराभवाबद्दल. त्यांनी त्याबद्दल जे पुरावे आहेत, ते दिले आहेत. मला वाटतं, की जळगावच्या बैठकीत त्यांची प्रदेशाध्यक्षांशी चर्चासुद्धा झाली आहे.
 
पण तुमच्या पराभवाचं काय? तुमचा पराभवही घडवून आणलाय असं तुम्हाला वाटतं?
 
माझा पराभव झाला, तेव्हा मी कितव्या मिनिटाला मीडियासमोर आले? मला वाटतं, मी एकमेव पराभूत उमेदवार आहे राज्यातली, जिनं मीडियासमोर जाऊन सांगितलं, की माझा पराभव झाला आहे. माझा पराभव मी स्वीकारते. ती सर्वस्वी माझी जबाबदारी आहे. सगळ्या जगानं ते बघितलं. त्यानंतर मी माझी भूमिका का बदलेन? ही चर्चा जरुर झाली, की पंकजाताईंचा पराभव कसा झाला?
 
माझ्या पराभवाचीच चर्चा झाली. कोणाच्या विजयाची झालीच नाही. मला असं वाटतं, की लोकांमध्ये असं काही perception झालं असेल तर मी त्याचा अभ्यास करेन. मलाही माझ्या पराभवाचा विचार करायला वेळ मिळाला नाही. मी यातच अडकली आहे. आता एक प्रॉपर एजन्सी नेमून मी पराभवाची चर्चा करेन.
 
तुमचा पराभव भाजपकडून घडवून आणला गेला, अशी चर्चा होतीये. याच दृष्टीनं तुम्ही अभ्यास करणार का?
 
पक्षाला दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण मोदी आले होते माझ्या इथं. मोदींपेक्षा भाजप काय मोठी आहे?
 
म्हणजेच हा पराभव घडवून आणला नाही, असं तुम्हाला वाटतं?
 
माझा पराभव घडवून आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे? कोण करेल असं? सगळेजण आपापली कामं सोडून मला पराभूत करायला का जातील? जी चर्चा आहे, ती अशी नाही, की माझा पराभव घडवून आणला गेला. तो रोहिणीच्या बाबतीतला विषय आहे.
 
माझ्या बाबतीत अशी चर्चा आहे, की पंकजा मुंडेंची लढाई ही Equal शक्तीनं झाली. धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आपली शक्ती वाढवली. ती सत्तेच्या माध्यमातून, आमच्या सरकारच्या माध्यमातूनच वाढवली. त्यांच्या पदामुळे त्यांनी एक वचक निर्माण केला. त्यामुळे माझ्यासाठी ही लढाई कठीण झाली, हे खरं आहे.
 
धनंजय मुंडेंनी तुमच्या सरकारच्या माध्यमातून स्वतःची शक्ती वाढवली असं तुम्ही म्हणताय...
 
सरकार आमचंच होतं ना!
 
पण मग पक्षाकडून तितकी साथ नाही मिळाली? पक्षानं आपल्या उमेदवारापेक्षा समोरच्या उमेदवाराला जास्त ताकद दिली का? ते शक्तिशाली कशामुळे झाले?
 
पक्ष माझ्याबरोबरच राहिला. पक्ष म्हणजे मीच आहे ना! मी पक्षाच्या प्रमुख पाच लोकांमध्ये आहे. त्याच्यापेक्षा वरचे आम्हाला मग मोदी आणि अमित शाहच आहेत. त्यामुळे पक्ष माझ्याबरोबर राहिला नाही, असं मला नाही वाटत. पण पाच वर्षे सतत वेगवेगळ्या कारणांनी धनंजय चर्चेत राहिला. माझ्याविरुद्ध अॅटॅक करणं, आरोप करणं यामुळे प्रतिमा मलिन होते. या सगळ्या गोष्टी साचत आल्या असतील.
 
पण ते शक्तिशाली राहिले. त्यांची शक्ती कमी करण्यासाठी कुठेही प्रयत्न झाले नाहीत...
 
त्यांची शक्ती कमी करावी यासाठी लोकांनी प्रयत्न कशाला करावेत? ती माझ्यापुरती लढाई आहे. मी माझे प्रयत्न केले. मुळात त्याची शक्ती कमी करणे हे माझे प्रयत्न नव्हते. मी त्याच्यापेक्षा लोकांना जास्त सेवा देऊ शकते, हा प्रचार मी करायला हवा होता आणि मी तो केला.
 
पण याला जबाबदार कोण आहे, असं तुम्हाला वाटतं?
 
मी आहे. शेवटी मला तर वाटतं, की माझी लढाई ही धनंजयपेक्षा शरद पवारांसोबत होती. कारण पवार साहेब हे त्यांचे नेते होते. धनंजयच्या विजयामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर लढणं हा अनुभवाचा विषय आहे. याचा अर्थ आपण अगदीच झिरो आहोत, असा नाही होत.
 
तुमची लढत ही पवारांसोबत होती, कारण त्यांचा पाठिंबा धनंजय मुंडेंना होता. पण तुमच्या नेत्यांचाही पाठिंबा त्यांना होता का? त्यांची लढत तुमच्या मोठ्या नेत्यांसोबत झाली नाही?
 
शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. ते एक मोठी व्होट बँक आहेत. त्यांनी जे काम केलं त्याचा परिणाम चांगला झाला. त्यांचं पावसातलं भाषण या सगळ्या गोष्टींचा जनमानसावर त्यांच्या दृष्टिनं, पक्षाच्या दृष्टिनं चांगला परिणाम झाला. मतांवरही त्याचा परिणाम झाला.
 
एकनाथ खडसेंनी असं म्हटलं, की माझा यापुढे जो प्रवास असेल तो पंकजा मुंडेंसोबत असेल. पण पंकजा मुंडेंचा प्रवास एकनाथ खडसेंसोबत असेल?
 
हे प्रश्न ज्यावेळी तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी उत्तर द्यायचे आहेत. ते काय मार्ग निवडणार आहेत, हे जोपर्यंत मला नाही कळत, तोपर्यंत मी त्याच्यावर टिप्पणी नाही करू शकत.
 
एकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं तुम्हाला वाटतं?
 
खडसेंच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर ते कधी बोलले, कधी नाही बोलले. पण मला वाटतं जेव्हापासून त्यांना तिकीट नाकारलं गेलं, तेव्हापासून ते जास्त अस्वस्थ झाले. याला कोणत्या टर्ममध्ये फ्रेम करावं मला माहीत नाही, पण त्यांना लढावं लागलं.
 
विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, बावनकुळे असतील त्यांची तिकिटं केंद्रात कापली गेली की राज्यात कापली गेली? तुम्हाला हे पटलं का?
 
मला पटायचं की नाही हा विषय नाही. मी कोअर कमिटीमध्ये आहे. त्यांना तिकिटं नाहीयेत, हे जेव्हा जाहीर झालं, तेव्हा मी त्याचा भाग आहे. तो निर्णय मी नाही घेतला, असं मी कसं म्हणू शकते. मी त्या कोअर कमिटीचा भाग आहे. मला वाईट वाटलं नक्की हे खरं आहे.
 
गोपीनाथ गडावरच्या व्यासपीठावरून एकनाथ खडसेंनी असं म्हटलं होतं, की हा शेटजी-भटजींचा पक्ष होता, जो आम्ही सामान्यांपर्यंत पोहोचवला. आता तो पुन्हा शेटजी-भटजींचा पक्ष बनतोय. तुम्हाला हे विधान पटतंय का?
 
त्या प्रोसेसमध्ये खडसे होते. जेव्हा पक्षाचा जन्म झाला, मुंडेसाहेबांनी सुरुवात केली, ती नांगरधारी शेतकरीवर निवडणूक लढले. जनसंघाचा दिवा हातात घेऊन चालले. मग भाजपचा जन्म झाला. तेव्हा हा पक्ष मूठभर लोकांचा आहे, अशी अनेकांची धारणा होती. त्या चळवळीतले खडसे साहेब आहेत. त्यामुळे त्यांनी जे म्हटलं ते त्यांच्या दृष्टीनं योग्यच आहे, की तेव्हा लोक असं बोलायचे आणि आम्ही पक्ष सामान्यांपर्यंत पोहोचवला.
 
आता तो जनसामान्यातला पक्ष जनसामान्यांचाच राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा.
 
म्हणजे तो आता राहिला नाहीये?
 
आहे ना...105 जागांवर आमचे उमेदवार निवडून आले आहेत. पण आता जे चॅलेंजेस आहेत, ते वेगळे आहेत. सत्तेमधला प्रवास वेगळा असतो आणि सत्तेशिवायचा प्रवास वेगळा असतो. नवीन लोक पक्षात आले आहेत. मुख्य काम करणारे लोक पराभूत झाले आहेत. हे सगळे चॅलेंजेस आहेत.
 
जे निवडून आलेत, ते पक्ष चालवू शकले पाहिजेत. जे पराभूत झाले आहेत, त्यांनी पक्षात योगदान दिलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय मोठा आहे. पक्षाच्या अंतर्गत चर्चेमध्ये हा विषय सोडवला जाईल.
 
पक्षामध्ये ओबीसींवर अन्याय होतोय, असं तुम्हाला वाटतंय?
 
मी कधीही माझ्या राजकीय जीवनात जातीचा उल्लेख करून काम केलं नाहीये. ओबीसींवर अन्याय होतो, असं तुम्ही म्हणताय. पण पुण्यात मेधा कुलकर्णी आमच्या आमदार होत्या. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली गेली. मग त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय होतो, असं म्हणायचं?
 
माझ्यासाठी भाजपचा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, मग तो ब्राह्मण असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, दलित असेल किंवा मुस्लिम असेल.
 
आमचा पक्ष ओबीसींसाठी तितकाच आहे आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
 
यात काय वाद आहे? देवेंद्र फडणवीस हे गटनेते आहेत.
 
पण अनेक नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनीही ओबीसींवर आमच्या पक्षात अन्याय होतो, असं म्हटलं आहे.
 
मी कधीही अन्याय हा शब्द वापरला नाही. तुम्ही माझी भाषणं काढून पाहा.
 
सरकार स्थापनेमध्ये राज्यातलं नेतृत्व कमी पडलं?
 
ज्याअर्थी आम्हाला अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाही, त्याअर्थी आम्ही सगळे कमी पडलो.
 
नाही, मी नेतृत्वाबद्दल विचारतीये...
 
नेतृत्व सामूदायिक आहे. आम्ही सगळे कोअर कमिटीमध्ये होतो. देवेंद्र फडणवीस एकटेच कमी पडले, असं म्हणणं चुकीचं आहे. मीच पडले तर मी त्यांच्याबद्दल काय म्हणावं?
 
तुम्ही असं म्हटलं होतं, की हा पक्ष कोणत्याही एका व्यक्तिचा नाही. हा सर्वांचा पक्ष आहे.
 
तेच माझं म्हणणं आहे. याला कोणताही उलटा अर्थ नाहीये...'मिरर इमेज' नाहीये. हे खरं आहे.
 
देवेंद्र फडणवीसांशी तुमचे संबंध कसे आहेत?
 
माझे संबंध चांगले आहेत. टाळी देऊन आम्ही हसू शकतो. मी त्यांना जे काही वाटतं माझ्या मनातलं ते बोलू शकते. मी त्यांना माझा मित्र मानते. मला मित्र हा शब्द बरा वाटतो, कारण त्याला अनेक पैलू असतात.
 
देवेंद्रजी आणि माझ्या नात्यावर पाच वर्षं इतकं चर्वण झालं आहे, की मला कधीकधी वाटतं आपलं देवेंद्रजींसोबत भांडण आहे की काय? देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हा विषय पाच वर्षे गाजतोय. कशामुळे गाजतोय, हा प्रश्न आहे माझ्यासाठी. आमच्या दोघांमध्ये मतभिन्नता असू शकते. पण आमच्या दोघांमध्ये वैयक्तिक वैर असण्याचं काही कारण नाही.
 
तुम्ही ज्या व्यासपीठावरून बोलला, तिथे कोणाचं नाव घेतलं नाही. पण रोख सगळा देवेंद्र फडणवीसांवर होता?
 
सध्याच्या परिस्थितीत तिकडे रोख वळतोय, असं वाटतंय मला. सरकार स्थापन झालं नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात टीकेचा रोख त्यांच्यावर असू शकतो. मी पण पाच वर्षांत खूप टीका सहन केली. सेल्फीवरून, चप्पलवरून टीका झाली. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मला वाटतं, की त्या त्या काळात माणसाला त्यातून जावं लागतं.
 
मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री हे वक्तव्यं तुम्हाला भोवलं?
 
सोशल अँगलनं किंवा मीडियाच्या अँगलनं चर्चेतून किंवा काही लोकांनी असुरक्षित होऊन माझ्याविरुद्ध लिहिण्यामुळे हे वक्तव्यं मला भोवलं. पण माझ्या राजकीय जीवनात त्याचा काही परिणाम झालेला नाहीये. ती चर्चा मी केलीच नव्हती.
 
माझा प्रश्नच हा आहे, की 2014 च्या निवडणुकीवेळी शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत आम्ही सगळे सारखं काम करत असतो. पाच वाजल्यानंतर अचानक न्यूज येते, की पंकजा मुंडे मुख्यमंत्री होऊ इच्छितात. त्यानंतर मी प्रचंड ट्रोल झाले होते.
 
जिला प्रेम दिलं महाराष्ट्रानं, संघर्ष यात्रा काढली, वडिलांना मुखाग्नी दिल्यानंतर ही कन्या लढतीये असं चित्र होतं. आणि अचानक लोकांनी मला तिरस्कार दिला. ही मुख्यमंत्रिपदाची दावेदार होऊच कशी शकते? मला कळत नाही, या विधानाची एवढी अवहेलना का? ती कोणी केली? कोण असुरक्षित होतं? हा थोडा वेगळा विषय आहे.
 
महाराष्ट्रात अनेक लोकांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा झाली. त्यामुळे माझ्याबाबतीत अशी चर्चा व्हावी, हे दुर्दैव आहे. एका महिलेची पुरोगामी महाराष्ट्रात अशी अवहेलना करणं दुर्दैवी आहे.
 
तुमच्या दौऱ्यामध्ये तुम्ही भाजप नेत्यांना बोलावणार?
 
मीच जाऊन भेटेन एखादा विषय घडेल तेव्हा. दौरा म्हणजे मी काही यात्रा करणार नाहीये.
 
देवेंद्र फडणवीसांना तुमच्या उपोषणाच्या वेळी बोलावणार का?
 
मी अजून त्याचं फ्रेमिंग नाही केलं. जेव्हा करेन तेव्हा प्रेस घेऊन सांगेन.
 
एनसीपी आणि भाजपचं जे सरकार स्थापन झालं, त्याकडे तुम्ही कसं पाहता? हे तुम्हाला माहिती होतं?
 
मी त्याच्याकडे अतिशय तटस्थपणे पाहते. मला असं वाटलं, की राष्ट्रपति राजवट लागू झाली तर आपण राज्याचा कारभार नीट चालवू शकणार नाही. राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेना-भाजपचा विषय मार्गी लागत नाहीये तर हा विषय योग्य आहे.
 
पण तुमची प्रतिक्रिया काय होती?
 
काय??? अशीच होती. पण भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि राष्ट्रपती राजवट उठली याचा मला आनंद झाला.
 
धक्का बसला तुम्हाला?
 
हो. पण तो लगेच निवळला. कारण राजकारणात अशा शक्यता असतात.
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याकडे तुम्ही कसे पाहता?
 
पहिले ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी त्यांचं अभिनंदनही केलं होतं. मी त्यांना शुभेच्छा देऊ शकते. फार मोठी जबाबदारी आहे, तीन पक्षांचं सरकार आहे. त्यांनी महाराष्ट्राला चांगलं काम करून दाखवावं, ही शुभेच्छा .