बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (09:46 IST)

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू देवी देवतांची शक्ती हिरावून घेणारे' आहेत अशी टीका केली.
 
महिला काँग्रेसच्या 38 व्या वर्धापनदिनी दिल्लीमध्ये बोलताना भाजप 'धर्माची दलाली करतो' अशी टीका राहुल गांधी यांनी केली. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीप्पणी केली.
 
काय म्हणाले राहुल गांधी?
महिला काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "गांधीजींच्या फोटोमध्ये तुम्हाला तीन-चार महिला दिसतीलच दिसतील. आपण कधी मोहन भागवतांबरोबर एखाद्या महिलेचा फोटो पाहिलाय का? पाहिलेला नाही, कारण यांची संघटना महिला शक्तीचं दमन करतो आणि आमची संघटना महिला शक्तीला एक व्यासपीठ देतो."
 
ते म्हणाले, "हे (भाजपा) कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? हे खोटे हिंदू आहेत. हे हिंदू धर्माचा वापर करतात, हे धर्माची दलाली करतात; पण हे हिंदू नाहीत"
हिंदू देवींची शक्ती भाजपानं कमी केली आहे असंही राहुल गांधी म्हणाले.
 
ते म्हणाले, "आपण ज्यांना लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती म्हणतो त्यांची शक्ती नरेंद्र मोदींनी कमी केली आहे. त्या शक्तींवर आक्रमण केलं आहे."
 
'तीन-चार लोकांच्या हातात सोपवली शक्ती'
 
"लक्ष्मीची शक्ती- रोजगार, दुर्गेची शक्ती- धैर्य, सरस्वतीची शक्ती ज्ञान, या शक्ती भाजपा जनतेकडून हिसकावत आहे."
ते म्हणाले, "मोदींनी नोटबंदी केली तेव्हा आमच्या माता-बहिणींच्या घरातील लक्ष्मीची शक्ती त्यांनी वाढवली की कमी केली? जेव्हा शेतकऱ्यांसंदर्भात तीन काळे कायदे लागू केले तेव्हा त्यांनी शक्ती वाढवली की कमी केली?"
 
"नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघाने दुर्गेची शक्ती, लक्ष्मीची शक्ती शेतकरी, मजूर, लहान दुकानदारांच्या हातून तसेच महिलांच्या हातून हिसकावून तीन-चार लोकांच्या हातात दिली."
 
या शक्ती जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी लढा देऊ असा आपण महिला काँग्रेसच्या स्थापना दिनी संकल्प करत आहोत असं ते म्हणाले.
काँग्रेस हा सर्व धर्मांचा पक्ष आहे असं सांगताना राहुल गांधी म्हणाले, "हाताचं हे चिन्ह तुम्हाला सर्व धर्मांच्या फोटोंमध्ये दिसेल. सत्य गोष्टीला घाबरू नका असा या चिन्हाचा अर्थ आहे. भाजपाची घाबरा आणि घाबरवा ही विचारसरणी आहे. ही विचारधारा त्यांनी पूर्ण देशात पसरवली आहे."
 
"द्वेष करुन आपल्याला लढायचं नाहीये. द्वेष आपलं शस्त्र नाही. प्रेम हे आपलं शस्त्र आहे. ज्यादिवशी आपण द्वेषाचा आधार घेऊन लढायला सुरुवात केली, त्याचा अर्थ आपण घाबरलो असा होतो. द्वेष हे भीतीचंच एक रूप आहे. ज्या दिवशी आपण द्वेषाचं प्रदर्शन करू त्यावेळेस आपण काँग्रेसी राहाणार नाही."
 
राहुल गांधी म्हणाले, "भाजपा-रा.स्व.संघ आणि आमची विचारसरणी वेगळी आहे. मी इतर विचारसरणींशी कोणती ना कोणती तडजोड करू शकतो परंतु भाजपा आणि रा. स्व. संघाच्या विचारसरणीशी कधीही तडजोड करू शकत नाही, हे मी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने समजू शकतो."
योगी आदित्यनाथांचं उत्तर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी देवतांचा अपमान केला आहे.
 
योगी आदित्यनाथ म्हणाले, "राहुल आदिशक्तीचा अपमान करत आहेत. त्यामुळेच काही लोक आयुष्यभर पप्पू आणि बबुआच राहातात. त्यांच्या या वाईट अवस्थेचं तेच कारण आहे."
लोक त्यांना निवडणुकीत उत्तर देतील असंही ते म्हणाले.
 
ते म्हणाले, "संकटकाळात काँग्रेसला देशाच्या जनतेची आठवण येत नाही. राहुल गांधी आजही उत्तर प्रदेशाचा अपमान करत आहेत. आता देवी-देवतांविरोधात बोलत आहेत. देशाच्या जनतेने त्यांना प्रत्येक निवडणुकीत जनतेनं त्यांना उत्तर दिलं आहे."