1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (15:41 IST)

राहुल गांधींनी ओबीसी वर्गाची माफी मागावी: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग

modi rahul gandhi
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नसल्याचा आरोप केल्या प्रकरणी राष्ट्रीय मागास वर्गाने निवेदन जारी केले आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी वर्गाची माफी मागावी असे या निवेदनात म्हटले आहे.
 
राहुल गांधी यांच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे यावरुन दिसते, त्यांनी आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी लोकांच्या मनात भेदभावाच्या बिजांची पेरणी करू नये असे मागासवर्ग आयोगाने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी कोट्यवधी लोकांचा अपमान केला आहे तेव्हा त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष खासदार हंसराज अहिर यांनी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी म्हणाले होते, "मोदीजी जन्माने ओबीसी नसून ते कागदोपत्री ओबीसी आहेत. ते जन्मानंतर पाच दशकांपर्यंत ओबीसी नव्हते. माझ्या या सत्यकथनावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल भाजपा सरकारला धन्यवाद!"
 
याच्या आधी ओडिशामध्ये एका सभेतही राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातच्या भाजपा सरकारने ओबीसी बनवलं आहे असं म्हटलं होतं. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपानं टीका केली आहे. राहुल गांधींचा दावा निखालस खोटा असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जातीला मागास वर्गात सामिल करण्याची अधिसूचना 27 ऑक्टोबर 1999 ला काढली होती आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधी दोन वर्षं हे झालेलं आहे. राहुल गांधी ओडिशातील सभेत म्हणाले होते, सत्य ऐका, "नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नाहीत. त्यांना गुजरातच्या भाजपा सरकारने ओबीसी केलंय. ते कधीही मागास लोकांचे हक्क आणि त्यांचा वाटा याबद्दल न्याय करू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी जातनिहाय लोकसंख्यागणना करणार नाहीत. जातनिहाय गणना काँग्रेसच करुन दाखवेल."
 
भाजपाची प्रतिक्रिया
भाजपा आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्या कथनाला निखालस खोटं असं संबोधून भारत सरकारच्या गॅझेट अधिसुचनेचा स्क्रिनशॉट जाहीर केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मोढ घांची' जात मागासवर्गात सामिल करण्याची अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. या कागदपत्रानुसार मोढ घांची समुदाय 27 ऑक्टोबर 1999 रोजी मागासवर्गात सामिल करण्यात आला. याच तारखेला घांची (मुस्लीम), तेली आणि माळी समुदायालाही मागासवर्गात वर्ग करण्यात आलं. या निर्णयाच्यावेळेस गुजरातमध्ये भाजपाचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री केशुभाई पटेल होते. नरेंद्र मोदी यांनी गुजरात सरकारची सूत्र 7 ऑक्टोबर 2001 रोजी घेतली होती. "राहुल गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपर्यंत गांधी परिवार ओबीसींच्या विरोधात राहिलेला आहे", असा आरोप अमित मालवीय यांनी काँग्रेसवर केला आहे.
 
भारत सरकारच्या गॅझेटमध्ये काय नोंद आहे?
अमित मालवीय यांनी ट्वीट केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये पुढील माहिती दिसते. या गॅझेटमधील तिसऱ्या परिच्छेदात म्हटलं आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने आंध्र प्रदेश, दिल्ली, गोवा गुजरात, चंदिगढ, हरियाणा, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशच्या संबंधित मागासवर्गांना केंद्रीय सुचीत सामिल करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी जाती आणि समुदायांच्या नावांची शिफारस केली आहे. सरकारने आयोगाच्या शिफारसींचा स्वीकार केला आहे. आणि या राज्यं व केंद्रशासित प्रदेशातील इतर मागास वर्गीय समुदायांचा केंद्रीय सुचीत समावेश किंवा दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामिलीकरण किंवा दुरुस्ती या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून लागू होईल. या गॅझेट सूचनेवर 27 ऑक्टोबर 1999 तारीख आहे. या गॅझेटनोंदीत गुजरातराज्यातील यादीत मोध घांची, घांची (मुस्लीम) तेली, माळी यांचा समावेश आहे. याबरोबरच याचवेळी इतर राज्यांतील कोणत्या जातींचा समावेश करण्यात आला त्याचाही उल्लेख आहे. महाराष्ट्रासमोरील यादीत मांगेल, ख्रिश्चन कोळी, खार्वा, मोमिन, जुलाहा, माळी, फुलमाळी, लिंगायत माळी यासारख्या अनेक जातींची नोंद दिसते.
 
काय म्हणाले होते राहुल गांधी?
गुरुवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ओडिशामध्ये होते. तिथे एका कार्यक्रमात ते म्हणाले," मोदीजी संसदेत सांगतात की ओबीसी वर्गाच्या हिस्सेदारीची काय गरज आहे? मी ओबीसी आहे. सर्वांत आधी मला तर तुम्हाला हे सांगायचं आहे की मोदी हे ओबीसी जन्मले नव्हते. पुन्हा ऐका....नरेंद्र मोदी जी तेली कास्ट.... अहो जरा ऐका, तर...मी खूप गंभीर विषय बोलतोय.. तुम्हाला सर्वांना मुर्खात काढलं जात आहे." पुढे ते म्हणाले, "मोदीजी हे ओबीसी जन्मले नव्हते. नरेंद्र मोदी हे तेली जातीत जन्मले होते. त्यांचा समुदाय हा 2000 पर्यंत ओबीसीमध्ये नव्हता. भाजपने 2000 मध्ये या समुदायाचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला. पंतप्रधान मोदी हे सर्वसाधारण प्रवर्गात जन्मले होते. मला कोणत्याही प्रकारच्या जन्म दाखल्याची गरज नाहीये." पंतप्रधान मोदी आणि उद्योजक गौतम अदानींच्या संबंधांवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, "तुम्हाला ठाऊक आहे का, मला कसं कळलं की आपले पंतप्रधान हे ओबीसी नाहीत जन्मले म्हणून? कारण ते कधीच ओबीसी व्यक्तीची गळाभेट घेत नाहीत. कधीच ते एखाद्या शेतकऱ्याचा हात हातात घेत नाहीत, कधीच ते एखाद्या मजुराचा हात हातात घेत नाहीत, ते केवळ अदानी यांचा हात धरतात." जातीय जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राहुल गांधी पुढे म्हणाले, "आणि हे पाहा, ते पूर्ण आयुष्यभर पण कधी जातीय जनगणना करणार नाहीत. कारण नरेंद्र मोदी हे खोटं बोलत आहेत. ते सर्वसाधारण जातीतील व्यक्ती आहेत. ते ओबीसी जनगणना कधीच होऊ देणार नाहीत. लिहून घ्या. जातीय जनगणनेचे काम काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी करुन दाखवेल. "
 
भाजप नेत्यांचे दावे
राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप खासदार नरहरी अमीन यांनी असं म्हटलं आहे की 25 जुलै 1994 ला मोढ आणि घांची समुदायाला अन्य मागास प्रवर्गात दाखल करण्यात आलं होतं. भाजपच्याच अमित मालवीय यांनी म्हटलं आहे की 1999 मध्ये तेली समुदाय हा ओबीसी प्रवर्गात आला तर नरहरी अमीन म्हणतात 1994 ला आहे. नरहरी अमीन पुढे म्हणतात की त्यावेळी 'गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा नरेंद्र मोदी हे ना तर पंतप्रधान होती ना की मुख्यमंत्री.' एएनआयशी बोलताना ते म्हणाले की "राहुल गांधी हे लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत... त्यांनी गुजरातच्या ओबीसी जनतेची माफी मागितली पाहिजे. ते चुकीची माहिती देत आहेत. ते अशी बाष्कळ बडबड करत राहतात. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान मोदींइतकी उंची ते कधीच गाठू शकणार नाहीत." गुजरातमध्ये भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र मोदींच्या मुद्द्यावरुन समाजाची दिशाभूल केली जात असल्याचं त्यांना वाटतं. पूर्णेश मोदी म्हणाले, पंतप्रधान मोदी ज्या तेली समाजातून येतात त्या समाजाला गुजरातच्या काँग्रेस सरकारनेच ओबीसी प्रवर्गात दाखल केलं आहे.