सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

रोहित शर्मा: भारत वि. दक्षिण आफ्रिका टेस्टमध्ये एका प्रस्थापिताची अस्तित्वासाठी लढाई

सहा वर्षांपूर्वी रोहित शर्माने कसोटी पदार्पण केलं. पदार्पणातच चमकदार कामगिरी केली. मात्र कामगिरीत सातत्य राखता न आल्याने रोहित सतत संघाच्या आतबाहेर होत राहिला. सहा वर्षांनंतर टेस्ट टीममध्ये स्थान पटकावण्यासाठी उत्सुक रोहित आता टीम इंडियाचा ओपनर झाला आहे. त्याच्या या संक्रमणाविषयी.
 
वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकारात रोहित भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जातं. रोहित आणि शिखर धवन ही भारतासाठी वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम जोडगोळींपैकी एक आहे.
वनडे ओपनर म्हणून भारतीय संघासाठी तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या दशकभरात दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या ओपनर्समध्ये रोहितचा समावेश होतो.
रोहितच्या नावावर वनडेत तीन द्विशतकं आहेत. असं करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा तो कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वामध्येच मुंबई इंडियन्सने आयपीएल जेतेपदावर दोनदा नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज म्हणून त्याने मोलाची कामगिरी बजावली आहे.
IPL स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी आहे.
कसोटी पदार्पणात शतकी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
एवढा सगळा नावलौकिक असला तरी टेस्ट टीममध्ये स्थान मिळावं यासाठी त्याची धडपड सुरू आहे. 32व्या वर्षी रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला उतरणार आहे. हे असं का होतंय, हे समजून घेण्यासाठी थोडं मागं जायला हवं.
 
6 ते 10 नोव्हेंबर 2013 या कालावधीत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता इथे कसोटी सामना रंगला. रोहित शर्माने या कसोटीत पदार्पण केलं.
 
तेव्हापासून बुधवारी विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या टेस्टपर्यंत सहा वर्षात भारतीय संघाने 62 कसोटी खेळल्या. यापैकी रोहित केवळ 27 कसोटी खेळला आहे. गणितीय शब्दांत सांगायचं तर रोहित फक्त 43 टक्के कसोटी खेळला. म्हणजे निम्यापेक्षाही कमी.
 
27 कसोटीत त्याचं अॅव्हरेज आहे 39.62. चाळिशीच्या घरात जाणारं हे अॅव्हरेज चांगलं मानलं जातं. घरच्या मैदानावर त्याचं अॅव्हरेज 85.44 असं भारीभक्कम आहे. मात्र त्याचवेळी विदेशातलं 26.32 अॅव्हरेज चिंताजनक आहे.
 
रोहितला सातत्याने खेळवलं जातं नाही तसंच एका मालिकेतल्या सगळ्या मॅचेस तो खेळत नाही, असंही आकडेवारीतून स्पष्ट होतं. असं का?
 
यासाठी टीम इंडियाची टेस्ट संघाची संरचना समजून घेणं आवश्यक आहे.
 
रोहित शर्माने पदार्पण केल्यापासून शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल आळीपाळीने ओपनर म्हणून खेळत आहेत. दुखापतींमुळे या त्रिकुटापैकी प्रत्येकाला संधी मिळते आहे. या तिघांमुळे ओपनिंग स्लॉटची समस्या टीम इंडिया जाणवली नाही.
 
विदेशात खेळताना या तिघांच्या कामगिरीत सातत्य नसल्याने पृथ्वी शॉ आणि त्यानंतर मयांक अगरवाल यांनी ओपनर म्हणून संधी पटकावली. परंतु कसोटी तसंच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळत असल्याने रोहितचा ओपनर म्हणून विचार झाला नाही.
 
रोहितच्या पदार्पणानंतर काही महिन्यांतच सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा केला. मात्र टेस्टच्या मधल्या फळीत मोठा बदल झाला नाही. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, टीम इंडियाची नवी वॉल चेतेश्वर पुजारा यांच्यामुळे 3-4-5 जागांची मधली फळी पक्की होती.
 
सहावा क्रमांक रोहितसाठी योग्य होता. त्याने पदार्पणाच्या लढतीत याच क्रमांकावर खेळताना शतकी खेळी साकारली होती. स्पेशलिस्ट फलंदाजांच्या यादीत सहावा क्रमांकावर खेळणारा फलंदाज निर्णायक ठरतो. त्याच्यानंतर तळाचे फलंदाज येणार असतात.
 
तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत धावसंख्या वाढवत नेणं, असं दुहेरी आव्हान सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजावर असते. माईक हसी, बेन स्टोक्स, अँड्यू फ्लिनटॉफ यासारख्या खेळाडूंनी हे आव्हान यशस्वीपणे पेललं. मात्र रोहितला या क्रमांकावर स्थिरावता आलं नाही.
 
याची काही कारणं आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये संयम अतिशय महत्त्वाचा ठरतो. गोलंदाजांकडे भरपूर वेळ असतो. वाईट बॉल पडावा यासाठी प्रतीक्षा करावी लागते. फलंदाजीची कसोटी पाहणारा हा फॉरमॅट आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहितला जिवंत खेळपट्यांवर म्हणजेच चेंडू मोठ्या प्रमाणावर स्विंग होणाऱ्या खेळपट्यांवर खेळताना अडचण जाणवते. अनेकदा चांगल्या सुरुवातीनंतर रोहित संयम गमावल्यामुळे आऊट झाला आहे.
 
टीम इंडियाच्या बदलत्या धोरणाचाही रोहितला फटका बसला. सहाव्या स्थानावर अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा तसंच पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या निर्णयामुळे रोहितच्या संधी धूसर होत गेल्या. हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळाच्या बळावर स्थान पटकावलं. विराट कोहलीने भारताबाहेर होणाऱ्या मॅचेसमध्ये पाच गोलंदाजांना घेऊन खेळवण्याच्या धोरणामुळे सहाव्या क्रमांकावर रोहितला खेळवण्याचा प्रश्न निकाली निघाला.
 
इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांच्यापैकी तीन वेगवान गोलंदाज आणि जोडीला रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा अशी संरचना पक्की झाल्याने रोहितचं टेस्ट खेळणं कमी होत गेलं. जेव्हाही टीम इंडियाने हार्दिकला टेस्टमध्ये खेळवलं तेव्हा त्याने फलंदाजी किंवा गोलंदाजी अशा एका आघाडीवर तरी चांगली कामगिरी केली.
 
काही महिन्यांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्या नसल्याने हनुमा विहारीला संधी देण्यात आली. स्थानिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा हनुमा गोलंदाजीही करत असल्याने संघाला अतिरिक्त गोलंदाजही मिळाला. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात हनुमाने सातत्याने धावा करत संघातलं स्थान पक्कं केलं. वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहित संघाचा भाग होता. मात्र अंतिम संघात त्याला खेळवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
 
यंदा झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित 9 मॅचेसमध्ये 5 शतकांसह 648 धावांसह अग्रणी होता. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा तो मानकरी ठरला. वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकारात दादा अशा या फलंदाजाला टेस्ट संघात जागाच नसणं विचित्र झालं होतं.
 
वेस्ट इंडिज दौऱ्यात लोकेश राहुलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. फॉर्म नसल्याने शिखर धवन आणि मुरली विजय आता शर्यतीतून बाहेर पडलेत. पृथ्वी शॉ डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने तो निवडीसाठी उपलब्ध नाही. यामुळे मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी मयांक अगरवाल हा एकमेव खेळाडू उरला. नव्या खेळाडूला घेण्याऐवजी निवडसमितीने रोहितला सलामीवीर म्हणून संधी द्यायचं ठरवलं आहे.
 
स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध वीरेंद्र सेहवागने टेस्टची सुरुवात सहाव्या क्रमाकांवर केली. पदार्पणाच्या लढतीत सेहवागने शतकी खेळी साकारली. सेहवाग असताना, राहुल द्रविड-सचिन तेंडुलकर-व्हीव्हीएस लक्ष्मण-सौरव गांगुली हे फॅब फोर खेळत होते. त्यामुळे यांच्यापैकी कोणालाही वगळण्याचा विषयच नव्हता. त्यावेळी टीम इंडियाने सातव्याच सामन्यात सेहवागला सलामीला पाठवलं. टूक टूक खेळाच्या शैलीसाठी टेस्ट मॅचेस प्रसिद्ध होत्या. सेहवागने टेस्ट ओपनर या भूमिकेला नवा आयाम दिला. पुढे जे घडलं तो इतिहास सर्वश्रुत आहे. सेहवाग पॅटर्न रोहितच्या बाबतीत यशस्वी ठरेल असा टीम इंडियाला विश्वास आहे.
 
राहुल, धवन, शॉ हे पुढच्या मालिकेवेळी सलामीवीराच्या जागेसाठी दावेदार असतील. अयशस्वी झाल्यास रोहितच्या जागेसाठी बरेच पर्याय आहेत. रोहित यशस्वी झाला तर टीम इंडियाचं भलं होऊ शकतं. वनडेत रोहित मॅरेथॉन खेळींसाठी प्रसिद्ध आहे. तशा स्वरुपाच्या खेळी तो टेस्टमध्ये करू लागला तर टीम इंडियाचा फायदाच आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचं आव्हान सोपं नाही. कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, व्हरनॉन फिलँडर, डेन पीट, केशव महाराज, अँनरिच नॉटर्जे हा मारा शिस्तबद्ध आणि भेदक आक्रमणासाठी ओळखला जातो. त्यामुळे 32व्या वर्षी रोहितला नव्याने गार्ड घ्यावा लागेल.