बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (17:18 IST)

संजय राऊत: आमिर खान-किरण राव यांच्याप्रमाणे भाजप-शिवसेनेचं नातं

भाजप आणि शिवसेना यांचे संबंध आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणे असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
 
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की शिवसेनेशी आमचं शत्रूत्व नाही, मतभेद आहेत. आमच्यात मतभेद निश्चित आहेत. पण याचा अर्थ आम्ही शत्रू आहोत असा होत नाही. आम्ही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा-बैठका होत असतात. आमचे राजकीय मार्ग वेगवेगळे आहेत".
 
भाजप-शिवसेनेचे संबंध आमिर खान-किरण राव यांच्याप्रमाणे असल्याचं राऊत म्हणाले. काही दिवसांपूर्वीच आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या पंधरा वर्षानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त होत असलो तरी चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसं अन्य उपक्रमांसाठी एकत्रितपणे काम करत राहू. आम्ही एकमेकांसाठी कुटुंबासारखेच असू असंही त्या दोघांनी म्हटलं होतं.
 
विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याच्या 24 तासानंतर आमिर-किरण पाणी फाऊंडेशनच्या लाईव्हदरम्यान एकत्र दिसले. कारगिलहून हे दोघं बोलत होते. आमच्या निर्णयाने तुम्हाला धक्का बसला असेल, वाईट वाटलं असेल. आमचं नातं बदललं आहे पण आम्ही एकमेकांसाठी कुटुंबासारखेच आहोत असं दोघांनी सांगितलं. राऊत यांनी या जोडीचा संदर्भ देताना सांगितलं की, "भाजप-शिवसेनेने एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला. पण दोन्ही पक्षांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. आमिर-किरणप्रमाणेच आमचंही नातं असंच आहे". दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता मात्र राऊत यांनी फेटाळून लावली. मैत्रीचा अर्थ भाजप-शिवसेना एकत्र येतील असा नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.
 
राज्यात सध्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
 
काय म्हणाले होते आमिर-किरण?
आमिर आणि किरण यांनी पत्रामध्ये लिहिलं की, आमिर आणि किरण लिहितात, "या 15 सुंदर वर्षांत आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आमच्या आयुष्यात नव्या टप्प्याला सामोरं जायचं आहे.
 
या प्रवासात आम्ही नवरा-बायको नसू. आम्ही मुलांसाठी सहपालक असू. एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विचारपूर्वक विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. या भूमिकेला आम्ही न्याय देऊ.
 
चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसंच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आमच्या घरचे, मित्रमैत्रिणी यांचे आम्ही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला सदैव प्रेम आणि पाठिंबा दिला. आमचं नातं दृढ होताना त्यांची आम्हाला खंबीर साथ लाभली. त्यांच्या आधाराशिवाय एवढा मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो नसतो. हितचिंतकांच्या शुभेच्छांसाठी, नातलगांच्या आशीर्वादासाठी आम्ही ऋणी राहू. घटस्फोट हा नात्याचा शेवट नसेल तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल."
 
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान चित्रपटावेळी आमिर आणि किरण यांची पहिल्यांदा भेट झाली. किरण त्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिका होत्या. 28 डिसेंबर 2005 रोजी त्यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव आझाद आहे.
 
आमिरचं हे दुसरं लग्न होतं. याआधी आमिरने रीना दत्ता यांच्याशी 1986 मध्ये लग्न केलं. त्या दोघांनी 2002 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जुनैद खान आणि इरा खान ही या जोडप्याची दोन मुलं आहेत. आमिर-किरण दांपत्याला आझाद नावाचा मुलगा आहे.