मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (12:25 IST)

संजय राऊत-शरद पवार भेट, फडणवीस संघ मुख्यालयात – सत्तेस्थापनेचा तिढा सुटणार?

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, तर्क-वितर्कांचं सत्र सुरू आहे. या सगळ्याच्या केंद्रस्थानी सध्या शिवसेना असून शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
 
त्यातच बुधवारी (6 नोव्हेंबर) सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईमधील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी ही भेट झाली. अवघ्या दहा मिनिटांत ही भेट आटोपली.
 
पण या भेटीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस असं सत्ता समीकरण पहायला मिळणार का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही 'सदिच्छा भेट' असल्याचं सांगितलं.
 
"राज्यातील अस्थिर परिस्थितीबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, अशी इच्छा शरद पवार यांनी व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसण्याचा जनादेश आहे, या भूमिकेवर पवार ठाम आहेत," असंही राऊत यांनी सांगितलं.
 
मात्र शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार की भाजपसोबत, या मुद्द्यावर राऊत यांनी मौन बाळगलं.
 
काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत असून तेदेखील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, दिल्लीतही एक महत्त्वाची भेट घडून आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. अर्थात, या भेटीत आपण महाराष्ट्रातला 'म'देखील उच्चारला नसल्याचं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं. ही भेट रस्ते आणि शेतीच्या प्रश्नांसंदर्भात होती, असं पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.