मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (17:35 IST)

सरदार पटेल : ज्यांनी राजांचं राजेपण कायम ठेवत राजेशाही संपुष्टात आणली

रेहान फझल
देशाचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्य भारताला एकतेच्या धाग्यात बांधणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज (31 ऑक्टोबर) जयंती आहे. पटेल यांच्यावर बीबीसीनं प्रकाशित केलेला हा विशेष लेख.
 
ऑल इंडिया रेडिओनं 29 मार्च, 1949 रोजी रात्री 9 वाजताच्या बातम्यांमध्ये सरदार पटेल यांच्या दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या विमानाशी संपर्क तुटल्याचं वृत्त दिलं.
 
मुलगी मणिबेन, जोधपूरचे महाराजा आणि सचिव व्ही शंकर यांच्यासह सरदार पटेल यांनी सायंकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी दिल्लीच्या पालम विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं.
 
जवळपास 158 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना एक तासापेक्षाही कमी वेळ लागायला हवा होता. वल्लभभाई पटेल यांच्या हृदयाची स्थिती पाहता पायलट फ्लाइट लेफ्टनंट भीम राव यांना विमान 3000 फुटांपेक्षा अधिक उंचावर न्यायचे नाही, अशा सूचना होत्या.
मात्र, सुमारे सहा वाजता जोधपूरच्या महाराजांनी पटेल यांना विमानाचं एक इंजिन बंद पडल्याचं सांगितलं. जोधपूरच्या महाराजांकडे फ्लाइंग लायसन्सही होतं. त्याचवेळी विमानातील रेडिओनंही काम करणं बंद केलं होतं. त्यामुळं विमान फार वेगानं खाली येऊ लागलं.
 
"पटेल यांच्यावर त्याचा काय परिणाम झाला हे तर सांगता येणार नाही. मात्र वर वर पाहता त्यांना फार काही फरक पडला नव्हता. जणू काहीच झालं नाही, अशा पद्धतीनं ते शांतपण बसून होते," असं सरदार पटेल यांचे सचिव राहिलेल्या व्ही शंकर यांनी 'रेमिनेंसेज' या आत्मचरित्रात सांगितलं आहे.
 
जयपूरजवळ क्रॅश लँडिंग
पायलटनं जयपूरपासून 30 मैल उत्तरेला विमानाचं क्रॅश लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. क्रॅश लँडिंग करताना विमानाचा दरवाजा अडकू शकतो, त्यामुळं प्रवाशांनी लवकरात लवकर वरच्या बाजुला असलेल्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडावं असं सांगण्यात आलं. कारण क्रॅश लँड करताच विमानात आग लागण्याची शक्यता होती.
सहा वाजून 20 मिनिटांनी पायलटनं सर्वांना सीट बेल्ट बांधायला सांगितलं. पाच मिनिटांनी पायलटनं विमान जमिनीवर उतरवलं. विमानात आग लागली नाही, किंवा दरवाजाही अडकला नाही.
 
गावकऱ्यांनी पटेल यांच्यासाठी पाणी आणि दूध आणलं
काही वेळातच जवळच्या गावातील लोक तिथं पोहोचले. विमानात सरदार पटेल आहेत, हे समजताच त्यांच्यासाठी पाणी आणि दूध मागवण्यात आलं. शिवाय त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली.
 
जोधपूरचे महाराज आणि विमानातील रेडिओ अधिकारी घटनास्थळापासून सर्वात जवळ कोणता रस्ता आहे हे शोधू लागले. पण तोपर्यंत अंधार पडलेला होता.
त्याठिकाणी सर्वात आधी पोहोचणारे अधिकारी होते, केबी लाल. "मी त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा, सरदार पटेल विमानातून बाहेर काढलेल्या खुर्चीवर बसलेले होते. मी त्यांना कारमध्ये बसण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी आधी माझ्याबरोबरचे लोक आणि जोधपूरचे महाराज यांना कारमध्ये बसवण्यास सांगितलं," असं त्यांनी नंतर लिहिलं.
 
पटेल सुरक्षित असल्याची बातमी
रात्री सुमारे 11 वाजता सरदार पटेल यांचा ताफा जयपूरला पोहोचला. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या जीवात जीव आला. कारण संपूर्ण देशवासियांना पेटल यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं असंच वाटत होतं.
 
तोपर्यंत जवाहरलाल नेहरू हेदेखील तणावात होते. खोलीत चकरा मारत ते पटेलांबाबत बातमी मिळण्याची वाट पाहत होते.
नेहरू यांना 11 वाजता जयपूरहून सरदार पटेल सुरक्षित असल्याची माहिती मिळाली. 31 मार्चला पटेल दिल्लीला पोहोचले, त्यावेळी पालम विमानतळावर प्रचंड गर्दीनं त्यांचं स्वागत केलं.
 
पटेलांकडे दुर्लक्ष
पटेल यांची उंची 5 फूट 5 इंच होती. नेहरू त्यांच्यापेक्षा 3 इंच उंच होते. "आज भारत जे काही आहे, त्यात सरदार पटेल यांचं मोठं योगदान आहे. तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, असं भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाल्याचं पटेलांचं आत्मचरित्र लिहिणारे राजमोहन गांधी यांनी सांगितलं.
 
"स्वतंत्र भारतात प्रशासनाची घडी बसवण्यात गांधी, नेहरू आणि पटेल या त्रिमूर्तीची मोठी भूमिका होती. मात्र भारतीय इतिहासात गांधी आणि नेहरूंचं योगदान स्वीकारलं जातं, मात्र पटेलांचं कौतुक करण्यात हात आखडता घेतला जातो," असं राजमोहन गांधी यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.
सुनील खिलनानी यांच्या 'द आयडिया ऑफ इंडिया' या पुस्तकात नेहरूंचा उल्लेख 65 वेळा तर पटेलांचा उल्लेख केवळ 8 वेळा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र गुहा यांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' मध्ये पटेल यांचा 48 वेळा उल्लेख आहे. तर नेहरुंचा त्यापेक्षा चारपट अधिक म्हणजे 185 वेळा उल्लेख आहे. यावरूनच तुम्हाला अंदाज लावता येऊ शकतो.
 
पटेल आणि नेहरूंची तुलना
हिंडोल सेनगुप्ता यांनी पटेल यांनी पटेलांवर आणखी एक पुस्तक लिहिलं आहे.
 
"गांधीजींची प्रतिमा एक अहिंसक, चरखा चालवणारे आणि मानवी भावनांनी ओतप्रोत असलेले व्यक्ती अशी राहिली आहे. नेहरू शेरवानीवर लाल गुलाब लावून चाचा नेहरू म्हणून समोर येतात, ज्यांना दुसऱ्याच्या पत्नीबरोबर रोमान्स करण्यातही काहीही गैर वाटत नाही. त्या तुलनेत सरदार पटेल यांच्या जीवनात काहीही रोमान्स नाही (त्यांच्या पत्नीचं खूप लवकर निधन झालं होतं. त्यांच्या जीवनात दुसऱ्या महिलेचा उल्लेखही नाही). पटेल त्यांच्या आणि त्यांच्या गरजांबाबत फार मोजकी माहिती देणाऱ्यांपैकी एक होते," असं सेनगुप्ता यांनी 'द मॅन व्हू सेव्ह्ड इंडिया' या पुस्तकात लिहिलं आहे.
वास्तववादी पटेल
सरदार पटेल यांच्या जीवनावर आणखी एक पुस्तक आहे. पीएन चोपडा यांनी 'सरदार ऑफ इंडिया' या पुस्तकात रशियाचे पंतप्रधान निकोलाई बुलगानिन यांचं वक्तव्य मांडलं आहे. "तुम्हा भारतीयांचं काय सांगावं. तुम्ही राजांचं राजेपण कायम ठेवत राजेशाही संपवता," असं ते म्हणाले होते.
 
बुलगानिन यांच्या दृष्टीनं पटेल यांचं हे यश बिस्मार्कच्या जर्मनीच्या एकत्रिकरणापेक्षा मोठं होतं.
"नेहरू यांना नव्या गृह मंत्रालयाची जबाबदारी दिली नाही ते बरं झालं, हे म्हणण्यात मला काही संकोच नाही. तसं झालं असतं तर सगळं काही विखुरलं असतं. पटेल यांनी जे केलं, ते वास्तववादी आहे. त्यांनी हे काम खूप चांगल्या पद्धतीनं केलं," असं लॉर्ड माऊंटबॅटन म्हणाल्याचं प्रसिद्ध लेखक एच व्ही हॉडसन यांनी म्हटलं आहे.
 
पटेल आणि करिअप्पा यांची भेट
एकेकाळी भारतीय आर्मीचे उपप्रमुख असलेले आणि असम तसेच जम्मू-कश्मीरचे राज्यपाल राहिलेले एसके सिन्हा यांनी त्यांचं आत्मचरित्र 'चेंजिंग इंडिया- स्ट्रेट फ्रॉम हार्ट' मध्ये एक किस्सा सांगितला आहे. "एकदा जनरल करिअप्पा यांना सरदार पटेलांना त्यांना लगेचच भेटायचं आहे, अशी माहिती मिळाली. करिअप्पा तेव्हा काश्मीरमध्ये होते. ते लगेचच दिल्लीला आले आणि पालम विमानतळावरून थेट पटेल यांच्या औरंगजेब रोडवरील निवासस्थानी पोहोचले. तेव्ही मीही त्यांच्याबरोबर होतो."
"मी वऱ्हांड्यात त्यांची वाट पाहत होतो. करिअप्पा जवळपास पाच मनिटांत बाहेर आहे. नंतर त्यांनी मला सांगितलं की, पटेल यांनी मला अगदी साधा प्रश्न विचारला. आपल्या हैदराबाद मोहिमेनंतर पाकिस्तानं काही हालचाल केली तर तुम्ही अतिरिक्त मदतीशिवाय त्यांचा सामना करू शकाल का? करिअप्पा यांनी केवळ एका शब्दात हो असं उत्तर दिलं आणि बैठक संपली," असं त्यांनी सांगितलं.
 
"त्यावेळी, भारताचे लष्करप्रमुख जनरल रॉय बूचर काश्मीरमधील परिस्थिती पाहता हैदराबादेत कारवाई करण्याच्या विरोधात होते. जिन्नादेखील धमकी देत होते. भारतानं हैदराबादेत हस्तक्षेप केला तर सर्व मुस्लीम देश त्यांच्या विरोधात उभे राहतील, असं जिन्ना म्हणत होते. पण त्यानंतर लगेचच लोहपुरुष पटेल यांनी हैदराबादेत कारवाईचा आदेश दिला आणि आठवडभरात हैदराबाद भारताचा भाग बनला," असं ते सांगतात.
 
मोतीलाल नेहरूंच्या नजरेत 'हिरो'
सरदार पटेल सरकारमध्ये होते तेव्हा भारताचं क्षेत्रफळ पाकिस्तानची निर्मिती होऊनही समुद्रगुप्त (चौथे शतक), अशोक (250 वर्ष ईसवीसना पूर्वी) आणि अकबर (16वे शतक) च्या काळातील भारतीय क्षेत्रफळाच्या तुलनेत अधिक होतं. पटेल यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर नेहरू सहा वेळा काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तर पटेल यांना केवळ एकदा 1931 मध्ये काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. या दरम्यान, मौलाना आझाद आणि मदनमोहन मालवीय सारखे नेते दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा काँग्रेस अध्यक्ष बनले होते.
"1928 मध्ये बारडोलीमधील शेतकरी आंदोलनातील पटेल यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांनी गांधींना पत्र लिहिलं होतं. सध्याच्या काळातील हिरो पटेल आहेत, यात काहीही संशय नाही. आपण त्यांना काँग्रेस अध्यक्ष बनवायला हवं. काही कारणांनी तसं झालं नाही, तर जवाहरलाल हे आपली दुसरी पसंती असायला हवे, असं त्यांनी पत्रात लिहिलं होतं," राजमोहन गांधी यांनी पटेल यांच्या चरित्रात याचा उल्लेख केला आहे.
 
पटेल विरुद्ध नेहरू
"पटेल विरुद्ध नेहरू चर्चेमध्ये नेहरूंच्या बाजुनं असा युक्तीवाद केला जात होता की, पटेल नेहरूंपेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. तरुणांमध्ये ते नेहरूंप्रमाणे प्रसिद्ध नव्हते. तसंच नेहरूंचा रंग गोरा होता. ते दिसायला आकर्षक होते. तर पटेल गुजराती शेतकरी कुटुंबातील, शांत बसणारे असे होते. लहानशा मिशा त्यांनी नंतर काढल्या होत्या. डोक्यावर लहान लहान केस, डोळे काहीसे लाल असायचे आणि चेहऱ्यावर कायम गंभीर भाव असायचे," असं राजमोहन गांधी लिहितात.
नेहरू आणि पटेल यांनी जवळपास सारख्याच काळात विदेशात वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. पण त्यादरम्यान त्यांची भेट झाली होती का, याबाबत काही पुरावे मिळत नाहीत.
 
पाश्चिमात्य पोशाखाला नकार
 
मृत्यूनंतर 55 वर्षांनीही नेहरूंना त्यांच्या शेरवानी आणि त्यावरील गुलाब यासाठी ओळखल जातं. त्याच्या अगदी विरुद्ध पटेल यांना लंडनमधील वास्तव्यादरम्यान पाश्चिमात्य कपड्यांची प्रचंड आवड निर्माण झाली.
 
"पटेल यांना हे पाश्चिमात्य कपडे एवढे आवडत होते की, अहमदाबादमध्ये चांगला ड्रायक्लिनर नसल्याने ते कपडे मुंबईला ड्राय क्लिन करण्यासाठी पाठवायचे," असं दुर्गा दास यांनी त्यांच्या 'सरदार पटेल्स कॉरस्पॉन्डन्स' मध्ये लिहिलं आहे.
पुढं ते गांधींच्या स्वदेशी आंदोलनानं एवढे प्रभावित झाले की, त्यांनी साधे भारतीय कपडे परिधान करायला सुरुवात केली.
 
कायम जमिनीवर पाय
ब्रिज या खेळात प्रवीण असूनही पटेल हे कायम ग्रामीण भागातून आल्यासारखे वाटायचे. त्यांच्यामध्ये शेतकऱ्यासारखी जिद्द, रुक्ष संकोच आणि मनाचा मोठेपणा होता.
 
"पटेल यांचे पाय कायम जमिनीवर राहायचे, तर नेहरूंचे कायम आकाशात," असं लॉर्ड माऊंटबॅटन म्हणाल्याचं दुर्गा दास सांगतात.
 
"नेहरुंचा गट त्यांचे नेते हे जागतिक नेते म्हणून ओळखले जावे असं वाटणारा होता. तर त्यांच्या दृष्टीने पटेल प्रादेशिक नेते किंवा जास्तीत जास्त एक असे 'स्ट्रॉन्ग मॅन' होते, जे बळाच्या जोरावर राजकीय विजय मिळवायचे. तर पटेलांचे समर्थक नेहरू हे चांगले कपडे परिधान करणारे कमकुवत नेते होते, असं म्हणतात. नेहरूंमध्ये राजकीय परिस्थिती सांभाळण्याची हिम्मत नव्हती आणि क्षमताही नव्हती, असा त्यांचा दावा होता," हिंडोल सेनगुप्ता यांनी तसं लिहिलं आहे.
मात्र नेहरू आणि पटेल यांच्या क्षमतांचं सर्वात सम्यक वर्णन राजमोहन गांधींनी त्यांच्या पटेल या पुस्तकात केलं आहे. "1947 मध्ये पटेल जर वयानं 10 किंवा 20 वर्षांनी लहान असते तर कदाचित खूप चांगले आणि शक्यतो नेहरूंपेक्षाही उत्तम पंतप्रधान ठरले असते. पण 1947 मध्ये पटेल नेहरूंपेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. तसंच पंतप्रधान पदाला न्याय देता येईल, एवढं त्यांचं आरोग्य चांगलं नव्हतं," असं त्यांनी म्हटलं आहे.
 
"1941 पासून पटेल यांना आतड्यांचा त्रास सुरू झाला होता. त्या वेदनांमुळं ते सकाळी तीन वाजता उठायचे. त्यांचा जवळपास एक तास टॉयलेटमध्ये जायचा. त्यानंतर ते सकाळी फिरायला निघायचे. मार्च 1948 मध्ये त्यांच्या आजारपणानंतर डॉक्टरांनी त्यांचं फिरणंही बंद केलं होतं. तसंच लोकांच्या भेटीगाठीही कमी केल्या होत्या," असं त्यांची मुलगी मणिबेन यांनी दुर्गा दास यांच्याशी बोलताना सांगितलं.
 
1948 अखेरीस तब्येत अधिक बिघडली
1948 च्या अखेरीस पटेल गोष्टी विसरू लागले होते. त्यांना ऐकायलाही कमी येत असल्याचं त्यांची मुलगी मणिबेनच्या लक्षात आलं होतं. काही वेळातच त्यांना थकवा यायचा असं, पटेल यांचे सचिव व्ही शंकर यांनी रेमिनेंसेज मध्ये लिहिलं आहे.
21 नोव्हेंबर 1950 ला मणिबेन यांना त्यांच्या अंथरुणावर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर लगेचच 24 तास त्यांच्यासोबत नर्स राहतील अशी व्यवस्था करण्यात आली. काही काळ त्यांना ऑक्सिजनवरही ठेवण्यात आलं होतं.
 
थंडीपासून संरक्षणासाठी मुंबईला नेले
5 डिसेंबरपर्यंत पटेल यांना त्यांचा अंत जवळ आला आहे याची जाणीव झाली होती. 6 डिसेंबरला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्यांच्याजवळ येऊन 10 मिनिटं बसले. पण पटेल एवढे आजारी होते की, त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता.
 
बंगालचे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय, जे स्वतः चांगले डॉक्टर होते ते पटेल यांना भेटायला आले होते. पटेलांनी त्यांना "थांबणार की जाणार?" असं विचारलं.
 
त्यावर रॉय यांनी, "तुम्हाला जायचंच असतं, तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो,?" असं उत्तर दिलं.
त्यानंतर पुढचे दोन दिवस सरदार पटेल कबिराच्या "मन लागो मेरो यार फकीरी" गुणगुणत होते.
 
त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी पटेलांना मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. कदाचित तिथल्या वातावरणात त्यांना बरं वाटेल, असं डॉक्टरांना वाटत होतं.
 
नेहरू, प्रसाद अंत्ययात्रेत सहभागी
12 डिसेंबर 1950 ला सरदार पटेल यांना वेलिंग्टन येथील रनवेवर आणण्यात आलं. त्याठिकाणी भारतीय हवाईदलाचं डकोटा विमान त्यांना मुंबईला नेण्यासाठी सज्ज होतं, असं राजमोहन गांधी लिहितात.
 
विमानाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी आणि उद्योगपती घनश्यामदास बिर्ला उभे होते.
 
पटेलांनी हसत सर्वांचा निरोप घेतला. साडे चार तासांच्या विमान प्रवासानंतर पटेल मुंबईतील (तेव्हाचे बॉम्बे) जुहूच्या विमानतळावर उतरले. बॉम्बेचे पहिले मुख्यमंत्री बी जी खेर आणि मोरारजी देसाईंनी त्यांचं स्वागत केलं.
 
राज भवनाच्या कारनं त्यांना बिर्ला हाऊसला नेण्यात आलं. पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती.
15 डिसेंबर 1950 च्या पहाटे तीन वाजता पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले. चार तासांनी त्यांना थोडी शुद्ध आली. त्यांनी पाणी मागितलं. मणिबेन यांनी गंगा जल आणि मध एकत्र करून त्यांना पाजलं. 9 वाजून 37 मिनिटांनी पटेलांनी अखेरचा श्वास घेतला.
 
दुपारी नेहरू आणि राज गोपालाचारी दिल्लीहून बॉम्बेला पोहोचले. नेहरुंची इच्छा नसतानाही राष्ट्रपती राजेंद्र प्रसादही मुंबईला आले.
 
"राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्र्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होता कामा नये, त्यामुळं चुकीची परंपरा निर्माण होईल, असं नेहरूंचं मतं होतं," असा उल्लेख केएम मुंशी यांनी त्यांच्या 'पिलग्रिमेज' पुस्तकात केला आहे.
 
मात्र, अंत्य संस्काराच्या वेळी राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि सी राजगोपालचारी तिघांच्या डोळयात अश्रू होते. राजाजी आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पटेल यांच्या पार्थिवाजवळ भाषणही केलं.
 
"अग्नि सरदार पटेलांचं शरीर जाळत असला तरी, त्यांच्या लौकिकाला जगातील कोणताही अग्नी जाळू शकत नाही," असं राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते.