रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जानेवारी 2020 (16:29 IST)

सातारा : विम्याच्या दीड कोटींसाठी केली मित्राची हत्या आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव

स्वाती पाटील
मित्राची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी गजाआड केलंय.
 
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील महिमानगडमध्ये राहणारा संशयित आरोपी सुमित मोरे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.
 
संशयित आरोपी सुमित मोरे हे व्यावसायिक आहेत. त्यांचा मुंबई येथे व्यवसाय आहे. व्यवसायात त्यांना मोठं नुकसान झालं होतं.
 
सुमित मोरे यांनी ICICI या खाजगी कंपनीचा दीड कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. सुमित यांच्या अपघाती मृत्यूनंतर विम्याची ही रक्कम कुटुंबियांना मिळणार होती.
 
दीड कोटीची विम्याची रक्कम मिळावी यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली त्यांनी दिल्याचं तपास अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
सध्या सुमित मोरे पोलीस कोठडीत आहेत.
 
गुन्हा कसा समोर आला?
21 जानेवारी रोजी पोलिसांना वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जळालेली गाडी आढळली. या गाडीत एक अर्धवट जळालेला मृतदेह होता. वाठार पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 302 आणि 201 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
 
पोलीसांनी गाडीवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार सुमित मोरे यांच्या कुटुंबियाना त्यांच्या मृत्यूबद्दल कळवण्यात आलं आणि मृतदेह मोरे कुटुंबियाना सोपवण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
 
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. मृत म्हणून जी व्यक्ती पोलिसांसमोर होती ती म्हणजे सुमित मोरे. त्यांची हत्या कशी झाली याचा तपास पोलिसांनी सुरू केला. सुमित मोरे यांच्या घरच्यांकडे चौकशी करत असताना मृत्युचं दुःख किंवा तणाव कुणाच्याही चेहऱ्यावर जाणवत नसल्याचं पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नजरेत आलं.
 
त्यानंतर सुमित यांच्या भावाकडे चौकशी करत असताना वेगळीच माहिती समोर आली. या चौकशीदरम्यान भावाने पोलिसांना सांगितलं, की मध्यरात्री 2 वाजता सुमित यांचा घरी फोन आला होता. आपला कोणीतरी पाठलाग करत आहे आणि त्यामुळे जवळच्या पोलीस स्टेशनला जात असल्याचं सुमित यांनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.
 
त्यावर पुढे काय केलं असं विचारल्यानंतर सुमित यांच्या भावाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला.
 
त्यांनतर साक्षीदारांनी दिलेल्या आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुमित मोरे जिवंत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानुसार 24 जानेवारी रोजी जेजुरी इथून सुमित मोरे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली. त्या चौकशीदरम्यान नेमका गुन्हा कसा घडला याचा उलगडा झाला.
 
हत्येचा कट कसा रचला?
तू जर जिवंत आहे तर मृत व्यक्ती कोण, असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यानंतर सुमित मोरेंनी हत्येचा कट कसा रचला आणि गुन्हा कसा अंमलात आणला याची सविस्तर कबुली दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,
 
गाडीत असलेला मृतदेह हा तानाजी आवळे यांचा असल्याचं सुमितने सांगितले. तानाजी आवळे महिमानगडपासून चार किमी अंतरावर असलेल्या उकिर्डे गावात राहत होते. उकिर्डे हे सुमित यांच्या मामाचे गाव आहे. मामाच्या घराशेजारी राहणारा तानाजी आणि सुमितची मैत्री झाली होती.
 
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सुमितचा अपघाती मृत्यू होण गरजेचं होतं. त्यासाठी सुमितने त्याच्यासारखी देहयष्टी असलेल्या तानाजीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार सुमितने तानाजीला फोन करून बोलावून घेतले.
 
'25 लाख रुपयांची रोख रक्कम मुंबईला पोहचावायची आहे. त्यासाठी सोबत ये,' असं सुमित यांनी तानाजीला सांगितले. या कामाचे 25 हजार रुपये मिळतील, असंही सुमित यांनी तानाजी यांना सांगितले. गाडीत बसल्यानंतर तुझे कपडे व्यवस्थित नसल्याचं सांगत सुमितने स्वतःचे कपडे तानाजीला घालायला दिले.
 
त्यानंतर प्रवासात लाकडी स्टंपने तानाजीच्या डोक्यात घाव घालत सुमितने त्यांची हत्या केली. तानाजीचा मृतदेह गाडीत ठेवून रॉकेल टाकून स्वतःची गाडी सुमित यांनी पेटवून दिली. गाडी जळाल्यानंतर सुमित यांनी तिथून पळ काढला.
 
याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुमित मोरे यांच्यासह त्यांचे दोन भाऊ, वडील आणि एका मित्राला अटक केली आहे. त्यांच्यावर हत्येच्या कटात सहभाग आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
 
गाडीच्या रजिस्ट्रेशनवरून गाडीत सापडलेला मृतदेह हा सुमित मोरेंचा असल्याचं पोलिसांना वाटलं होतं. त्यामुळे मोरेंच्या कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करत अंत्यविधी पार पाडले. विशेष म्हणजे यावेळी तानाजी यांचेही वडील हजर होते. पण त्यांना पुसटशी कल्पना नव्हती, की तो मृतदेह त्यांच्या मुलाचा आहे.
 
सध्या संशयित आरोपी सुमित मोरे आणि गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपी पोलीस कोठडीत आहेत. 31 जानेवारीपर्यत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आल्याचं पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांनी सांगितलं.