रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (13:02 IST)

शाहरुख खानः 'माझी बायको हिंदू आहे, मी मुसलमान आणि माझी मुलं हिंदुस्तान'

"अनेकदा आमची मुलं आम्हाला सांगतात की शाळेत त्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला. ते मला विचारतात, की आपला धर्म कुठला? तेव्हा मी त्यांना सांगतो, की आपला कुठलाही धर्म नाही. आपण भारतीय आहोत," असं अभिनेता शाहरुख खानने एका डान्स Reality शोमध्ये सांगितलं.
 
आमच्या कुटुंबात आम्ही कधीही हिंदू-मुसलमान अशी चर्चा केली नाही. माझी बायको हिंदू आहे, मी मुसलमान आहे आणि माझी मुलं हिंदुस्तान आहेत. शनिवारी प्रसारित झाले्या या शोमध्ये शाहरुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता.
 
या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "अनेकदा, जेव्हा माझी मुलं शाळेत गेली. तेव्हा शाळेत तर आपल्याला धर्म सांगावा लागतो. माझी मुलगी लहान होती तेव्हा तिनं मला मी कोणत्या धर्माचा आहे असं विचारलं होतं. तेव्हा मी त्यात आम्ही भारतीय आहोत असं लिहिलं. कोणताही धर्म नाही आणि असता कामा नये."
 
त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर शाहरुख खानचं कौतुक होतंय, तर कुणी CAA-NRCवर आजवर त्याने मौन बाळगल्याबद्दल त्याच्यावर टीकाही होत आहे.
 
नरेश नावाचे ट्विटर युजर लिहितात, "आम्हाला अभिमान आहे, आम्ही भारतीय आहोत आणि याशिवाय अधिक गर्व असणारी दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही."
 
शैलव नावाचे एक युजर लिहितात. "शाहरुखने हिंदुस्तान चांगल्या पद्धतीने समजावला."
 
पूर्वी यांच्यामते शाहरुख यांचं वक्तव्य हृदयस्पर्शी होतं. भावविधी लिहितात, "आतापर्यंत मी जे ऐकलंय, त्यातलं हे सर्वात सुंदर वाक्य आहे."
 
मानसी शर्मा लिहितात, "आजच्या कठीण काळात इतकं काही होत आहे. त्या स्थितीत शाहरुख यांचं वक्तव्य सुखावणारं आहे. भारतीय असण्याशिवाय चांगलं काहीच नाही."
 
असं आहे तर मुलांची मुस्लिम नावं का ठेवली, असंही एका व्यक्तीनं विचारलं. त्याला उत्तर देताना एक ट्विटर युजर लिहितात, "सुहाना हे मुस्लीम नाव आहे. आर्यन हिंदू नाव आहे. आणि अबराम हे नाव अब्दुल्ला आणि राम यांना जोडून केलं आहे."
 
अंकुर अग्रवाल लिहितात, "शाहरुख खान भारताचं भूषण आहेत. मात्र CAA आणि NRCला विरोध होत असताना त्यांनी मौन बाळगलं."
 
इशान सिद्दिकी लिहितात, "काहीही नं बोलता तुम्ही NRCच्या मुद्द्यावर भाष्य करत आहात, हे चांगलं आहे. बोलणं न बोलणं तुमची इच्छा आहे. परंतु यामुळे फायदा होईल आणि लोकांच्या समोर CAA आणि NRCचं सत्य येईल."