सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

लोकसभा 2019: नरेंद्र मोदी - 'विजय माल्या यांच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती आम्ही जप्त केली'

नीरव मोदी आणि विजय माल्या हा देश सोडून पळून गेले कारण सरकारने कायदे कडक केले, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते.
 
"जेव्हा माझं सरकार आलं आणि देशाची आर्थिक परिस्थिती माझ्या समोर आली, तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की मी या लोकांनी नक्की किती पैसै कमवले, याबद्दल सगळी सत्य माहिती देशाला सांगणं. आणि दुसरा पर्याय होता की मी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवायचा प्रयत्न करणं.
 
"मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही. मी म्हटलं, मोदीची बदनामी होत असेल तर होऊ देत. आम्ही केलेल्या कारवाईमुळे हे लोक पळून गेले. मग आम्ही कायदा बनवला की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे लोक जाऊन बसले तरी त्यांची संपत्ती आम्ही जप्त करू शकू.
 
"आम्ही विजय माल्याच्या कर्जापेक्षा जास्त संपत्ती जप्त केली आहे. त्याचं कर्ज 9 हजार कोटी होतं, पण आम्ही जगभरातून त्याची 14 हजार कोटीची संपत्ती जप्त केली आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
"आधी घोटाळे करून लोक पळून जायचे आणि सरकार त्यांची नावं पण सांगत नव्हतं. आता आम्ही जी पावलं उचलत आहोत त्याने लोकांना पळून जावं लागत आहे," असंही ते यावेळी म्हणाले. 'रिपब्लिक भारत' वृत्तवाहिनीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही मुलाखत प्रसारित केली.
 
'पाकिस्तानच्या जाळ्यात अडकणार नाही'
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी 'रिपब्लिक भारत'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलताना भारतीय हवाई दलाची बालाकोट कारवाई, विंग कमांडर अभिनंदन आणि पाकिस्तान या विषयांवरही चर्चा केली.
 
"विरोधी पक्षांचे लोक आमच्या भूमिकेवर संशय घेत होते, पण अभिनंदनच्या बाबतीत ते कोणत्याही प्रकारचं राजकारण करू शकले नाहीत," ते म्हणाले.
 
पाकिस्तानच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, "जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या, मी पाकिस्तानशी चर्चा केली. दर वेळेस ते म्हणतात की ते मदत करतील, पण काहीच घडत होत नाही. आता मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही."
 
"पाकिस्तानला इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असलेल्या फरार आरोपींची यादी भारताने दिली आहे. तुम्ही (पाकिस्तान) त्यांना आमच्याकडे का सुपूर्द करत नाही? तुम्ही 26/11 नंतर काही कारवाईसुद्धा करत नाही. माझं पाकिस्तानशी काही भांडण नाही, माझी खरी लढाई तर दहशतवादाच्या विरोधात आहे," ते म्हणाले.
 
"मी इम्रान खान यांच्या विजयानंतर त्यांना फोन करून सांगितलं होतं की दहशतवाद संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू. मी आजही पंतप्रधान इम्रान खान यांना आवाहन करतो की तुम्ही दहशतवादाची कास सोडा मग, भले आमचं तोंडही नका पाहू," मोदी यांनी सांगितलं.
 
चौकीदारावरही बोलले मोदी
लोकसभेपूर्वी भाजपने पंतप्रधानांनी आपल्या प्रचाराची टॅगलाईन 'मैं भी चौकीदार' यावरही भाष्य केलं.
 
"मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तुम्ही माझ्या कुटुंबांबद्दल किंवा मी चहावाला असण्याबद्दल काही ऐकलं होतं का? मी जेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार झालो, तेव्हा लोकांनी माझं लहानपण धुंडाळायला सुरुवात केली. लोकांनी तर जाहीर केलं की तुम्ही मोदींच्या हाताचा चहा प्यायला असेल तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ."
 
मोदी पुढे म्हणाले, "जेव्हा माझ्या चहावाला असण्याला निवडणुकीचा मुद्दा बनवलं गेलं, तेव्हा मी म्हटलं 'हो, आहे मी चहावाला!' चौकीदार हा शब्द मी माझ्यासाठी वापरला होता. चौकीदार म्हणजे टोपी, शिट्टी असं काही नाही. ती एक भावना आहे, एक स्पिरिट. मी याच स्पिरिटला घेऊन वाटचाल करत होतो.
 
"पण नंतर जेव्हा लोक या शब्दाला घेऊन वाट्टेल ते बोलायला लागले तेव्हा मी म्हटलं की यांना माझ्या चौकीदार असण्याचा त्रास होतोय, म्हणूनच हे असं बोलत आहेत. पण मी चौकीदार आहेच."
 
आपल्यावर झालेल्या आरोपांविषयी बोलताना मोदी म्हणाले, "एका काँग्रेसच्या नेत्याने आरोप केला होता की मोदींकडे 250 कपड्यांचे जोड आहेत. त्या दिवशी मी एका सभेला जात होतो. मी लोकांना संबोधित करताना हे आरोप स्वीकारलेत, पण हेही म्हणालो, की तुम्ही इतरांच्या भ्रष्टाचाराविषयीही ऐकलं असेल. मग तुम्हीच ठरवा, तुम्हाला 250 कोटींचा घोटाळा करणारा पंतप्रधान हवाय की 250 जोड कपडे असलेला. सगळी जनता माझ्या बाजूने उभी राहिली आणि काँग्रेसचे सगळे आरोप बंद झाले."