शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

तिहेरी तलाक: शरद पवार ऐन मतदानावेळी राज्यसभेत गैरहजर का होते?

'तिहेरी तलाक'च्या महत्त्वाच्या विधेयकावर जेव्हा मतदान सुरू होतं, तेव्हा राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि त्यांचे विश्वासू सहकारी प्रफुल पटेल हे दोघेही अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीने बहुमताचा आकडा एकाने खाली आला आणि भाजपला अप्रत्यक्ष मदतच झाली.
 
राष्ट्रवादीचे राज्यसभेत 4 खासदार आहेत. त्यांपैकी माजिद मेमन आणि वंदना चव्हाण यांनी तिहेरी तलाकच्या विधेयकाविरोधात मतदान केलं. तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लीम पुरुषाला तीन वर्षं शिक्षा देण्याची गरज आहे का, याविषयी सखोल चर्चा व्हायला हवी, अशी मागणी माजिद मेमन यांनी केली. भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाहीये. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी अनेक सदस्यांनी गैरहजर राहणं किंवा ऐन मतदानाच्या वेळी सभात्याग करणं गरजेचं होतं.
 
भाजपचा मित्रपक्ष असलेले जनता दल(युनायटेड) आणि अण्णा द्रमुक यांच्या खासदारांनी सभात्याग करून बहुमताचा आकडा खाली आणला. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या.
 
पवारांची अनुपस्थिती नेमकी कशामुळे?
पवारांच्या अनुपस्थितीची तीन वेगवेगळी कारणं पुढे येत आहेत. आम्ही जेव्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "शरद पवार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना आज ट्रिपल तलाक विधेयकाच्या मतदानाला हजर राहता आलं नाही. शरद पवारांनी मला सांगितलं की माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मला दिल्लीला प्रवास करता येणार नाही. त्यामुळेच ते हजर नव्हते. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण नाही."
 
आम्ही भाजपला मदत केली नाही, असंही ते म्हणाले. "आमच्या पक्षातील दोन खासदारांनी विधेयकाविरोधातच मतदान केलं, त्यामुळे आमच्यामुळे कुणाला मदत झाली असं म्हणण्यात काही तथ्य नाही." दरम्यान मुंबईमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना "छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो. नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो असा समज झाला असता," असा टोला यावेळी शरद पवार यांनी हाणला.
 
राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, "तुम्हाला तर माहिती आहे, राज्यात काय चाललंय (राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी राजीनामा दिलाय). त्यामुळे पवार साहेब दिल्लीत येऊ शकले नाही." पुढे मेमन यांनी काँग्रेसवर खापर फोडलं. "काँग्रेसचेही खासदार उपस्थित नव्हते. काँग्रेसने नीट फ्लोअर मॅनेजमेंट केलं नाही. आम्ही भाजपला मदत करण्याचा प्रश्नच नाही. आमचा या विधेयकाला विरोध आहे." याविषयी आम्ही काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी याविषयावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या अनुपस्थितीमागे काही राजकीय गणितं असू शकतात का, असं विचारलं असता दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणाले, "तशी शक्यता यात दिसत नाही, कारण भाजपला इतर पक्षांची साथ मिळेल असं स्पष्ट दिसत होतं. जर राष्ट्रवादीला भाजपची मदत करायचीच असती तर इतर दोन खासदारांनी विधेयकाविरोधात का मतदान केलं असतं? त्यामुळे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गैरहजर राहण्यामागे काही राजकीय गणितं नसावीत."
 
2014 साली जेव्हा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नव्हतं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. नंतर काही काळ शरद पवार आणि मोदी एकमेकांची स्तुती करत होते. पण हळुहळू हे प्रेम आटलं, आणि पवार आणि मोदी एकमेकांवर टीका करू लागले.