सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (09:51 IST)

कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही- मुख्यमंत्री

कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही. वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी नावं येतात. ते वाचून अमुक आपल्या पक्षात येणार आहेत हे कळतं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटा काढला.
 
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी कोपरखळ्या लगावल्या.  
 
दरम्यान छोटी शस्त्रक्रिया होऊनही कार्यक्रमाला आलो. नाहीतर गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो असा समज झाला असता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हाणला.
 
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, विनोद तावडे, दिवाकर रावते, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
 
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.