बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (12:50 IST)

शरद पवारांचा विचार संकुचित : उदयनराजे भोसले

मी प्रश्नांवर आधारित समाजकारण करतो, राजकारण नाही. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय म्हणून मी हे बोलत नाहीये. पण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा एखादा पक्ष असेल तर तो भाजप आहे. जे डोळ्याला दिसतंय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी संवाद साधला. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
 
जर शरद पवार साताऱ्यातून निवडणूक लढवणार असतील तर मी लढणार नाही, असं तुम्ही का म्हणालात?
त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून बोललो, पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. शेवटी मी समाजाचं ऐकायचं ठरवलं.
 
महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकत नसतो, असं विधान शरद पवार करत आहेत. या विधानाचा संदर्भ तुम्ही दिल्लीत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला याच्याशी जोडायचा का?
हा फार संकुचित विचार आहे असं मी समजेन. यामुळे मी दुःखी झालो आहे. कारण कुठलीही पक्ष, संघटना असली तरी त्यांना शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने प्रेरणाच मिळते.
 
तुमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा कोणता पक्ष महाराष्ट्रात आहे?
मी प्रश्नांवर आधारित समाजकारण करतो, राजकारण नाही. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय म्हणून मी हे बोलत नाहीये, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा एखादा पक्ष असेल तर तो भाजप आहे. जे डोळ्याला दिसतंय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
तुमच्या भाजपप्रवेशानंतर भाजपला मराठा समाजाचा एक चेहरा लाभला आहे, पण मराठा समाज भाजपला स्वीकारेल?
का नाही स्वीकारणार? मी हा प्रश्न सगळ्या मराठा समाजाला विचारतो आहे. या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला खेळवलं, मराठा-मराठा म्हणत फक्त राजकारण केलं. पण आता या सरकारने त्यावर मार्ग काढला आहे. मग त्यांचे आभार मानायला नकोत का? तीस वर्षांपासून मराठ्यांचे प्रश्न का सुटले नाहीत? राजकीय इच्छाशक्ती नव्हती का? असे प्रश्न लोक विचारायला लागले आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी आरोप केला होता, की शिवाजी महाराजांच्या काही जमिनी विकता याव्यात म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात किती तथ्य आहे?
ज्या काही उरल्या सुरल्या जमिनी असतील त्या तुम्ही घेऊन टाका. नवाब मलिक साहेबांना इतकं तरी लक्षात आलं पाहिजे, की दात टोकरून खायची आमची सवय नाही. आजपर्यंत आम्ही दानच करत आलो आहोत. आमच्या आजींनी गोरगरीब मुलं शिकावी म्हणून रयत शिक्षण संस्था स्थापन केली.
 
त्याचा मोबदला आम्ही मागितला नव्हता. आमच्या आईच्या वडिलांनी आपली जमीन देऊन मराठा विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. ते असं का बोलले याच्या तपशिलात आम्हाला जायचं नाही, त्यांना चुकीची माहिती दिली असावी किंवा ते व्देषापोटी असं बोलले असतील.
 
ईडीच्या चौकशीत शरद पवारांचं नाव आलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आता कोणी काय केलंय, त्यांनी काय केलंय याचं उत्तर मी देऊ शकत नाही.
ते प्रकरण घडवून आणलंय की काय, ते मी सांगू शकत नाही. पण एवढं नक्कीच सांगतो की ते म्हणालेत की लोक ईडीच्या भीतीने पक्ष सोडून जात आहेत, पण मी काय ईडीबिडीच्या भीतीने कुठे जात नसतो. माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी जनता आहे. त्यांनीच मला सांगितलं, की आता बस झालं...आपल्याकडे जी कामं पेंडिग पडलीत ती करून घ्या. ईडी म्हणजे हे प्रेम. बाकी कुठल्या छाडमाड ईडीला मी मानत नाही.
 
अमोल कोल्हेंनी तुम्ही राष्ट्रवादी सोडू नये म्हणून तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याबद्दल काय सांगाल?
अमोल कोल्हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीपासून मी त्यांना ओळखतो. चांगला माणूस आहे, अभिनय सुंदर करतात. मला विचाराल तर अभिनय करणाऱ्या व्यक्तींनी त्यावरच फोकस करायला हवं होतं. त्यांना आधीच प्रसिध्दी मिळाली होती. ते अभिनयातच राहिले असते आणि पूर्ण झोकून दिलं असतं तर त्यांच्यादृष्टीने अधिक चांगलं झालं असतं.
 
शरद पवार तुम्हाला आत्ता भेटले तर तुम्ही त्यांना सांगाल?
शरद पवारांनी पक्षाकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर पक्षाची अशी अवस्था झाली नसती.