रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (22:51 IST)

शरद पवार पत्रकार परिषद: 'महाविकास आघाडीमध्ये बेबनाव नाही, सर्व काही सुरळीत'

सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण आणि राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नाकारले आहे.
"महाविकास आघाडीत कोणताही बेबनाव नाही. आम्ही एकमेकांसोबत काम करत आहोत. जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते चर्चेने सोडवतो," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी सांगितलं.
काँग्रेस नेते पी.सी. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी प्रवेश केला, त्या कार्यक्रमावेळी पवार बोलत होते.
"ज्यांनी अधिकाऱ्याचा गैरवापर केला, दुरुपयोग केला त्यांना शासन मिळेल. तपासात सहकार्य करू. राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे," असं पवार यांनी सचिन वाझेप्रकरणी सांगितलं.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली पण काय चर्चा केली हे, प्रसारमाध्यमांना का सांगावं? राज्यातील मुद्यांवर चर्चा झाली. केंद्राशी कोण बोलणी करणार यासंदर्भात चर्चा केली," असं पवार यांनी सांगितलं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून बाजूला केलं जाणार का? हा प्रश्न पवार यांनी निकाली काढला. "देशमुख यांनी चांगल्या पद्धतीने गृहखातं हाताळलं आहे. गृह मंत्रालयाने जबाबदारी सांभाळली आहे. चुकीचं काम करणाऱ्यांना समोर आणलं, निलंबित केलं," असं पवार म्हणाले.
"परमबीर सिंह यांना आयुक्तपदी राहणार की नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारा. कोणाची नियुक्ती करावी, कोणाची बदली करावी यासाठी आम्ही भेटत नाही," असं पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सुरळीत आहे. सरकारी व्यवस्थित काम करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.