अमेरिकेत गोळीबार, आशियाई महिलांना टार्गेट करण्याचा हेतू?
अमेरिकेच्या जॉर्जियामधल्या अॅटलांटा शहरात तीन वेगवेगळ्या स्पामध्ये झालेल्या गोळीबारात 8 जण मारले गेले आहेत. यामध्ये आशियाई वंशाच्या 6 महिलांचा समावेश आहे.
या गोळीबारात मारले गेलेल 4 जण कोरियन वंशाचे असल्याचं दक्षिण कोरियाने म्हटलंय.
अॅटलांटाच्या उत्तरेकडील अॅकवर्थ शहरामध्ये एका मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळाबारात 4 जण मारले गेले असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
अॅटलांटामधल्याच आणखी 2 स्पा मध्ये गोळीबार झाला असून तिथे आणखीन 4 जण मारले गेले आहेत.
या तीनही हल्ल्यांमध्ये हात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी 21 वर्षांच्या एका तरुणाला अटक केलीय. पण या गोळीबारामागचा हेतू अजून स्पष्ट नाही.
गेल्याच आठवड्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आशियन-अमेरिकन नागरिकांवर वंशद्वेषातून होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला होता.
अॅटलांटामधला पहिला गोळीबार अॅकवर्थमधल्या यंग्स एशियन मसाज पार्लरमध्ये झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इथे 2 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघांना हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये आशियाई वंशाच्या 2 महिला, एक श्वेतवर्णीय महिला आणि एका श्वेतवर्णीय पुरुषाचा समावेश आहे.
याच्या तासाभरातच पोलिसांना गोल्ड स्पा मध्ये दरोडा पडल्याचं सांगणारा फोन आला.
पण तिथे पोचल्यानंतर पोलिसांना गोळीबारामुळे मृत होऊन पडलेल्या 3 महिला आढळल्या.
हा स्पा ज्या रस्त्यावर आहे तिथे समोरच असणाऱ्या अरोमा थेरपी स्पा मध्ये आणखीन एक महिला गोळी लागून मृत झाल्याचं आढळलं.
अॅटलांटा पोलिस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत आहेत. या हल्ल्यांच्या संशयिताचं एक छायाचित्र पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे प्रसिद्ध केलं. यानंतर अॅटलांटाच्या दक्षिणेला 240 किलोमीटर्सवर असणाऱ्या क्रिस्प काऊंटीमधून रॉबर्ट अॅरन लाँग नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
हीच व्यक्ती तीनही गोळीबारांच्या मागे असल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
पण या सगळ्या लोकांवर त्यांच्या वांशिकतेमुळे हल्ला करण्यात आला का, हे आताच सांगणं कठीण असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.