बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (07:53 IST)

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागामध्ये गोळीबार

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर भागामध्ये असलेल्या किराणा दुकानदारावर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दोन टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून हवेत गोळीबार झाला होता तर आता गोळीबाराची घटना घडली असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
पंजाबी (वय 36, पूर्ण नाव अद्याप समजलेले नाही) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी यांचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातील शिवांजली चौकात किराणा दुकान आहे.
 
दरम्यान, अचानक आलेल्या काही हल्लेखोरांनी पंजाबी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार का झाला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा दुसरा गोळीबाराचा प्रकार आहे.