शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (19:18 IST)

स्वाती मोहन : नासाचं रोव्हर मंगळावर उतरवण्यात मोलाची भूमिका निभावणारी भारतीय वंशाची महिला

नासाचं मार्स रोव्हर पर्सिवरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा त्याचं नियंत्रण आणि लँडिंगप्रणाली एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकानं हाताळली.
 
या वैज्ञानिकाचं नाव आहे डॉ. स्वाती मोहन. डॉ. स्वाती मोहन यांनी पर्सिवरन्स रोव्हरच्या नियंत्रण आणि लँडिंग सिस्टमचे नेतृत्व केलं.
डॉ. स्वाती गेल्या 8 वर्षांपासून नासाच्या मार्स रोव्हर पर्सिवरन्स प्रोजेक्टसाठी काम करत आहेत.
 
या पार्श्वभूमीवर बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी डॉ. स्वाती मोहन यांच्याशी संवाद साधला.
 
 
प्रश्न - इतकी वर्षं काम केल्यानंतर तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं आहे. तुमचे गेले काही तास कसे राहिले?
 
उत्तर - हे सगळं एका स्वप्नासारखं आहे. काल जे काही झालं ते आमच्या यशाचं प्रदर्शन होतं. काल सगळं ठीकच होणार होतं. ज्या हजारो लोकांनी या प्रोजेक्टवर काम केलं, त्यांनी आपलं सर्वस्व या प्रोजेक्टला दिलं होतं. सगळ्यांनाच आपलं बेस्ट द्यायचं होतं.
 
प्रश्न - शेवटच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या मनात काय विचार येत होते?
 
उत्तर - मिशन कमेंटेटर म्हणून मी काय होत आहे आणि त्याआधारावर मी काय करायला हवं, याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. त्या काही मिनिटांमध्ये खूप काही घडणार होतं आणि ते परफेक्टच असायला हवं होतं. एक गोष्ट झाली की पुढची गोष्ट कोणती होणार याकडे माझं लक्ष असायचं. असंच सुरू होतं. जे काही सुरू होतं ते समजून घेण्यासाठी माझ्यात मोठ्या प्रमाणावर ताकदही शिल्लक नव्हती.
 
जेव्हा मी टचडाऊनची घोषणा केली आणि लोकांनी जल्लोष सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही करून दाखवलं. आम्ही जमिनीवर पोहोचलो आणि जसं आम्ही ठरवलं होतं तसंच झालं होतं.
 
प्रश्न - तुम्ही 8 वर्षं या प्रोजेक्टवर काम केलं. खूप मोठा कालावधी होता...
 
उत्तर - मला याचा अभिमान वाटतो. आम्ही एका टीममध्ये एकत्र 8 वर्षं काम करत होतो. आम्ही एक कुटुंब झालो होतो. पुढच्या आठवड्यात आमचे रस्ते वेगळे होतील याचं मला दु:ख वाटतं, पण या प्रोजेक्टचा एक भाग असणं माझ्यासाठी सुदैवाची बाब आहे. या प्रोजेक्टसाठी मी सगळ्यात आधी माझ्या झोपेचा त्याग केला. ज्याक्षणी हार्डवेअर जोडण्याचं काम सुरू केलं, तेव्हापासून मी फोनवर राहिले कारण आम्ही नियमितपणे टेस्ट करत होतो.
 
माझा फोन नियमितपणे माझ्या सोबत होता. गरज पडल्यास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता यावं, यासाठी माझ्या फोनची बॅटरी नेहमीच चार्ज केलेली असायची. या प्रकारची ताकद कायम ठेवणं आव्हानात्मक होतं आणि थोडसं भीतीदायकही. माझ्या कुटुंबाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. मला कधीही ऑफिसला जावं लागत असे. माझ्या कुटुंबानं मला खूप मदत केली.
 
प्रश्न - नासामधील तुमचा प्रवास कसा होता आणि यामधील तुमचे सगळ्यात चांगले क्षण कोणते होते?
 
उत्तर - मी शाळेत असतानाच अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेत अंतराळ म्हणजे नासा. त्यामुळे मग मी तेव्हा नासाविषयी रिसर्च केला. मी शाळेत असताना माझी पहिली इंटर्नशिप नासा गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये होती त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी कार्नेलला गेले आणि तिथं जेट प्रोपल्शन लॅबोरटरीमध्ये बराच वेळ घालवला. तिथं माझी अनेकांशी ओळख झाली.
 
त्यानंतर मी केनेडी स्पेस सेंटरमध्ये इंटर्नशिप केली. ग्रॅज्यूएट स्कूलमध्ये मला जॉन्सन स्पेस सेंटर, नासा मार्शल सेंटर सोबत काम करण्याची संधी मिळाली. या तऱ्हेनं मला अंतराळ क्षेत्राला वेगवेगळ्या दृष्टिनं पाहण्याची संधी मिळाली. यामुळे मला माझी जागा, अस्तित्व बनवण्यात मदत झाली.
 
प्रश्न- तुम्हाला कमी वयात स्टार ट्रेककडून प्रेरणा मिळाली?
 
उत्तर - हो. मी नऊ किंवा दहा वर्षांची असताना स्टार ट्रेकचा एक एपिसोड पाहिला. त्यात एंटरप्राईसला आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात फेकलं जातं आणि मग अंतराळाचं सुंदर चित्रं दिसतं. त्यावेळी मला वाटलं की, मी एंटरप्राईसवर असते तर किती बरं झालं असतं, जेणेकरून अंतराळातल्या नवनवीन गोष्टी मी शिकू शकले असते, त्यांच्याविषयी संशोधन करू शकले असते. त्यानंतर मी फोटोंच्या माध्यमातून हबल स्पेस टेलिस्कोपपर्यंत पोहोचले आणि हा घटनाक्रम पुढे चालू राहिला.
 
प्रश्न -तुम्ही अमेरिकेत आलात, तेव्हा फक्त एका वर्षाच्या होतात. भारतासोबतचं नातं तुम्ही कायम ठेवू शकला?
 
उत्तर - माझे नातेवाईक आजही भारतातल्या बंगळुरूमध्ये आहेत. माझे आजी-आजोबा बराच काळ तिथं राहिले. मी अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतात आले आहे.
 
प्रश्न - भारतातून तुमच्याशी कुणी संपर्क साधला का?
 
उत्तर - प्रत्येक ठिकाणी लोकांनी इतकं प्रेम दिलं की माझं मन भरून आलं. लोकांनी इतका सन्मान दिलाय की मी अजूनही आश्चर्यचकित आहे.
 
प्रश्न - मोहिमेदरम्यान तुम्हाला कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या आणि तुम्ही त्यांचा सामना कसा केला?
 
उत्तर - जेव्हा आम्ही पॅराशूटवर काम करत होतो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की, अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजत नाहीये. त्या समजून घेण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी आम्हाला टेस्ट कॅम्पेनची सुरुवात करावी लागली.
 
सफाईसाठी सुरुवातीलाच सॅम्पल कॅशिंग सिस्टिम ही एक नवी यंत्रणा तयार करावी लागली. या सॅम्पलला ट्यूबमध्ये टाकल्यानंतर त्याला सील कसं करायचं, त्यानंतर ट्यूबला मंगळ ग्रहावरून जमिनीवर वापस कसं आणायचं, या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागलं. तसंच एखादा किटाणू मंगळ ग्रहावर जाता कामा नये, याचंही ध्यान ठेवावं लागलं.
 
प्रश्न - भारतासारखे देशही मंगळ ग्रहावर रोव्हर पाठवू इच्छितात. तुम्ही एका यशस्वी टीमचा भाग आहात. काय सल्ला द्याल?
 
उत्तर - कोणत्याही ग्रहावर जाणं अतिशय अवघड काम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर व्यवस्थित काम करावं लागतं. तसंच ग्रहाचा प्रत्येक भाग, प्रत्येक दिवस यासंबंधी वेगवेगळी आव्हानं असतात. तसंच ही आव्हानं वेळोवेळी बदलतात. माझा सल्ला असेल की, नियमितपणे प्रयत्न करायला हवेत आणि इतरांच्या अनुभवातून शिकायला पाहिजे. कधीकधी तुम्ही यशस्वी मोहिमेएवजी अयशस्वी प्रयत्नांमधून जास्त शिकत असता.