गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:55 IST)

तांडव वेब सीरिज वाद: 'अर्णब गोस्वामींच्या चॅटवरून भाजपने तांडव सोडा, पण भांगडाही केला नाही' - शिवसेना

तांडव' या वेबसीरिजमधल्या दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या भाजपने अर्णब गोस्वामींच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून 'तांडव सोडा, पण भांगडाही केला नाही,' अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीय.
 
'तांडव' या वेबसीरिजमधली काही दृश्य आक्षेपार्ह असून त्यासाठी या वेबसीरिजच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केलेली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यासाठी आंदोलनही केलं होतं.
शिवसेनेचं मुखपत्रं असणाऱ्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपच्या या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.
 
'इथे तांडव का नाही?'
'इथे तांडव का नाही?' या शीर्षकाच्या अग्रलेखात म्हटलंय, "भारतीय जनता पक्षाने जे 'तांडव' सुरू केले आहे, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो 'तांडव' विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे?"
कथित टीआरपी घोटाळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पोलीस तपासात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्क अर्थात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेलं कथित व्हॉट्स अॅप चॅट उघड झाल्यामुळे अर्णब गोस्वामी नवीन वादांत घेरले गेले आहेत.
 
'भारतीय जनता पक्षाने यावर 'तांडव' सोडा, पण भांगडाही केला नाही'
कथित टीआरपी घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलीस करत असताना आपल्या चौकशी अहवालात मुंबई पोलिसांनी हे व्हॉट्स अॅप चॅट्स जोडले आहेत.
भारतीय वायूसेना बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करणार ही गोष्ट अर्णब गोस्वामी यांना 3 दिवस आधीच माहीत होती आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय गोस्वामींना माहिती होता अशा दोन गोष्टी या चॅट्समधून समोर येतायत.
 
याविषयी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलंय, "सरकारने या प्रकरणी जे काही सत्य आहे ते बाहेर आणायला हवे. एकतर 'पुलवामा'तील आमच्या सैनिकांची हत्या हा देशांतर्गत राजकीय कट होता आणि लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी या 40 जवानांचे रक्त सांडवले गेले असे आरोप त्यावेळीही झाले. आता अर्णब गोस्वामीच्या व्हॉट्सअॅपवरील जे काही संभाषण बाहेर आले आहे, ते या आरोपांना बळकटी देणारेच आहे असे म्हणायला जागा आहे. हे सगळे पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीरामही कपाळावर हात मारून घेत असतील. पुन्हा भारतीय जनता पक्षाने यावर 'तांडव' सोडा, पण भांगडाही केला नाही."
"भाजपातील काही शेंबड्यांनी आता अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, अर्णबचे गुप्त 'चॅट' उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबड्यांनो, मुळात तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला," असंही सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलंय.
 
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि त्यानंतरच्या वादावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतनेही 'तांडव' बाबत ट्वीटस केली होती.
पण यातली दोन ट्वीट्स आक्षेपार्ह असल्याचं म्हणत ट्विटरने बुधवारी (20 जानेवारी) कंगनाचा ट्विटर अकाऊंट 'रीड ओन्ली' केला होता. पण ही दोन ट्वीट डिलीट करण्यात आल्यानंतर कंगनाचा ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आला.
 
यानंतर ट्विटरवर #SuspendKanganaRanaut असा हॅशटॅगही ट्रेंड होत होता.
 
सामनाच्या अग्रलेखातून यावरही टीका करण्यात आली आहे. यात म्हटलंय, "एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे प्रकरणांवर चोवीस तास वखवखणाऱ्यांना अर्णबच्या देशद्रोही कृत्याची घृणा सोडा हो, पण संताप येऊ नये याचेच दुःख वाटते. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून 'तांडव' करणारा मीडिया अर्णबच्याच देशद्रोही कृत्यावर 'राष्ट्रीय बहस' करायला तयार नाही."