शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:24 IST)

शिवानी कटारिया- समर कॅम्प ते समर ऑलिम्पिक

2016मध्ये शिवानी कटारियाने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल एक तपाच्या कालावधीनंतर स्विमिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणारी ती भारतीय जलतरणपटू ठरली.
 
टोकिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा सराव करण्यासाठी शिवानी सध्या थायलंडमधल्या फुकेट इथे आहे.
2016 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवानीने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम शिवानीच्या नाववर आहे. हरियाणातल्या गुरुग्राम इथे उन्हाळी सुट्यांमधील जलतरण शिबिरात तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली.
 
शिवानी सहा वर्षांची असताना तिचे बाबा तिला जलतरण शिबिरासाठी घेऊन गेले. जलतरणाचा कारकीर्द म्हणून तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा विचारही तिच्या गावी नव्हता.
गुरुग्राम इथल्या शिवानीच्या घराजवळ असणाऱ्या बाबा गंगनाथ स्विमिंग सेंटर इथे समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून शिवानीला तिथे पाठवण्यात आलं. शिवानीच्या कारकीर्दीला त्या कॅम्पने योग्य दिशा दिली. शिवानी स्थानिक जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लाली. काही महिन्यातच जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने पदक पटकावलं.
 
तिने जलतरणाचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तिने दिवसातून दोनदा सरावाला सुरुवात केली.
 
जलतरणातील वाटचालीत घरच्यांची साथ मोलाची असल्याचं शिवानी सांगते.
 
घरच्यांनी शिवानीला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. तिचा भाऊ ट्रेनिंग पार्टनर म्हणून तरणतलावात उतरला. भावाच्या रुपात दमदार सहकारी मिळाल्याने शिवानीचा सराव सोपा झाला.
 
तिच्या सरावाची फळं राष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांच्या रुपात दिसू लागली. वयोगट स्पर्धांमध्ये तिचं नाव चमकू लागलं. कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमधील कामगिरीचा फायदा वरिष्ठ गटात खेळताना झाल्याचं शिवानी सांगते.
 
खेळांमध्ये यशस्वी कारकीर्द घडवल्याची उदाहरणं फार कमी असतात. त्यासाठी त्याग आणि निष्ठा लागते. आव्हानांचा सामना करायची ताकद लागते. गुरुग्राममध्ये सरावादरम्यान शिवानीने अशी अनेक आव्हानं पार केली.
 
हरियाणात थंडीच्या हंगामातही सराव करता येईल असे स्वीमिंग पूल नव्हते नव्हते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सराव बंद होऊन जायचा. जलतरणासाठी आवश्यक स्टॅमिना सरावाविना वाया जात असे.
 
त्यामुळे शिवानीने 2013मध्ये बेंगळुरूला रवाना होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तिला वर्षभर सराव करता येईल आणि चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील.
 
घरापासून, घरच्यांपासून दूर राहण्याचा हा निर्णय सोपा नव्हता मात्र शिवानीच्या कारकीर्दीसाठी तो फलदायी ठरला. बेंगळुरूला स्थायिक झाल्यानंतर आशियाई वयोगट अजिंक्यपद स्पर्धेत शिवानीचा सहावा क्रमांक आला. आंतरराष्ट्रीय पातळीसाठी या स्पर्धेने कणखर केल्याचं शिवानी सांगते.
शिवानीने 2014 युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2016मध्ये गुवाहाटी इथं झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं.
 
रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या स्पर्धांमधील कामगिरीने प्रेरित केलं असं शिवानी सांगते. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शिवानीची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. मात्र तिला खूप काही शिकायला मिळालं.
 
2017मध्ये हरियाणा सरकारने शिवानीला भीम पुरस्काराने सन्मानित केलं. भारतासाठी पदकं जिंकण्याची आणि अर्जुन पुरस्कार पटकावण्याची इच्छा असल्याचं शिवानी सांगते.
 
देशात खेळांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाली आहे असं शिवानी सांगते मात्र महिला प्रशिक्षकांची संख्या वाढावी जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून देऊ शकतील अशा मुली घडू शकतील असं तिला वाटतं.
 
(हे प्रोफाईल बीबीसीने शिवानीला इमेलच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रश्नांवर आधारित आहे.)