निवडणूक आयोग मृत झाला आहे - सामना
पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे.
आसाम आणि पश्चिम बंगालमधील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. बिहारात तेजस्वी यादव यांचा पराभव घडवून आणला गेला व मतमोजणीच्या त्या अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाने डोळे आणि कान बंद करून घेतले असं लोकांच्या मनात आहे. आपल्या देशाचा निवडणूक आयोग मृत झाला आहे किंवा राज्यकर्त्या पक्षाच्या हुकूमाचा विकलांग ताबेदार बनला आहे असं 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाची गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. ईव्हीएम नेण्यासाठी निवडणूक आयोगास दुसरी गाडी मिळू नये? या सर्व प्रकरणात निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपचा बुरखा फाटला आहे.
निवडणूक आयोग पक्षपाती आहेत हे सिद्ध करणाऱ्या घडामोडी दररोज घडत आहेत. हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरील 48 तासांची बंदी 24 तासांवर आणण्यात आली. निवडणूक आयोगाच्या इतिहासातील ही काळी पानं आहेत. टी.एन.शेषन यांची पदोपदी आठवण यावी असं दुवर्तन सध्याच्या आयोगाकडून होत आहे.
निवडणूक आयोगाने तरी चिखलात अडकू नये. जी आदर्श आचारसंहिता देशाच्या रक्षणासाठी जिवंत केली ती एखाद्याच्या राजकीय स्वार्थासाठी जाळू नका असं अग्रलेखात म्हटलं आहे.