शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (16:36 IST)

सोलापुरातील पहिली कापड गिरणी बंद पडली आणि सोलापुरी चादरीचा जन्म झाला...

solapur
गरज ही शोधाची जननी असते,’ अशी म्हण मराठी भाषेत आहे.
 
ही म्हण तयार होण्याला कारणही तसंच आहे. आपल्या गरजेपोटीच मानवाने अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा शोध लावला.
 
त्याचप्रमाणे, एखादी बिकट परिस्थितीही मानवाला नवं काही तरी करण्याची प्रेरणा देत असते.
 
म्हणजे, वाईटातून चांगल्याच्या दिशेने जाणं, परिस्थितीला न जुमानता चांगल्या गोष्टींची सुरूवात करणं, असं संक्रमण मानवी जीवनात कायम सुरू राहणार आहे.
 
त्यामुळेच, सध्याच्या काळात जगभरात सर्वत्र मंदी, आर्थिक संकट, युद्ध, बेरोजगारी अशा गोष्टींची चर्चा सुरू असतानाही आपली उमेद कायम असण्याचं हेच कारण असावं.
 
या पार्श्वभूमीवर, आपण अशाच एका रंजक आणि तितक्याच प्रेरणादायी घटनेची माहिती घेणार आहोत.
 
चला तर मग, संक्रांतीच्या मुहूर्तावर जाणून घेऊ आपल्या सर्वांच्या आवडत्या सोलापुरी चादरीच्या जन्माची गोष्ट.
 
सोलापुरातील कापड गिरण्यांचा उदय आणि विकास
19 व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिशकालीन भारतात कापड गिरण्यांची उभारणी सुरू झाली. मुंबईत पहिली कापड गिरणी 1851 मध्ये सुरू झाली. त्यानंतर मुंबईसह गुजरात, पुणे, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूर परिसरात कापड उद्योग वाढीस लागला.
 
सोलापूरच्या वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय येथील इतिहास विषयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सोलापूरची गिरणी कामगार चळवळ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.
 
या पुस्तकात त्यांनी सोलापुरातील कापड गिरण्यांची स्थापना आणि त्यांच्या वाटचालीविषयी विवेचन केलेलं आहे.
 
ते लिहितात, “सोलापुरात कापड गिरण्यांचा विकास होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. सोलापूर कापड उद्योगामध्ये मध्ययुगापासूनच आघाडीवर होते. याठिकाणी तयार होणारे धोतर आणि साडी प्रसिद्ध होते. मुस्लीम राज्यकर्त्यांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर मोमीन हे मुस्लीम विणकर सोलापुरात येऊन राहिले. पेशवे काळात माधवराव पेशव्यांनी मध्यवर्ती भागात माधव पेठ ही बाजारपेठ वसवली. पुढे ती मंगळवार पेठ म्हणून प्रसिद्ध झाली."
 
"सोलापूर हे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (सध्याचा तेलंगण) या राज्यांच्या सीमेवर वसलेले आहे. तेलंगणमध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ, पक्क्या मालासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ यांमुळे तेथील तेलुगू समाजाचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर सोलापुरात झालं. स्थलांतर करताना तेलुगू भाषिक समाजाने चरितार्थ चालवण्यासाठी हातमागाचं साहित्यही आपल्यासोबत आणलं होतं. चरख्यावर वस्त्रे विणून ते आपला उदरनिर्वाह चालवायचे.”
 
सोलापूर परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडत असल्यामुळे बागायती शेतीचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे बेकार लोकाची संख्या जास्त असल्याने कमी वेतनावर राबणारा मजूर येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असे.
 
तसेच, सोलापुरातील जमिनीचा स्तर आणि येथील हवामान कापसाच्या लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त होते. त्यामुळे ब्रिटिश सरकार हे इंग्लंड आणि भारतातील कापड गिरण्यांना कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा, यासाठी सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांना कापूस लागवडीस प्रोत्साहन देत होते. त्याकरिता बियाणांचा पुरवठा करण्यासोबतच काही सवलतीही सरकारने दिल्या होत्या.
 
या कालावधीत मुंबई आणि चेन्नई रेल्वेमार्गावरील मोठं शहर म्हणून सोलापुरची ओळख निर्माण झाली. दळणवळणाची चांगली सोयही झाल्यामुळे कापड गिरण्यांच्या उभारणीसाठी अनुकूल ती सर्व परिस्थिती सोलापुरात होती.
 
यामुळे 'सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हींग मिल', 'नरसिंग गिरजी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड', 'लक्ष्मी-विष्णू कॉटन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड', आणि 'जामश्री रणजितसिंगजी स्पीनिंग अँड वीव्हींग मिल्स कंपनी लिमिटेड' या एकामागून एक अशा एकूण 4 कापडगिरण्या सोलापुरात सुरू झाल्या.
 
ऐतिहासिक जुनी गिरणी
‘सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’ या नावाने सोलापुरात पहिली कापड गिरणी उभारण्यात आली. ही मिल भारतातील जुन्या गिरण्यांपैकी एक मानली जाते. या मिलची नोंदणी डिसेंबर 1874 मध्ये झाली.
 
मुंबईतील प्रसिद्ध गिरणी मालक मोरारजी गोकुळदास आणि कंपनी हेच या मिलचे पहिले मॅनेजिंग एजंट होते.
 
फेब्रुवारी 1875 ला गिरणीचं बांधकाम सुरू होऊन डिसेंबर 1876 पर्यंत ते पूर्णही झाले. 1877 पासून गिरणीतील काम प्रत्यक्षात सुरू झालं. सोलापुरातील पहिलीच कापड गिरणी म्हणून या गिरणीचं नाव जुनी गिरणी असं प्रचलित झालं.
 
पहिल्या वर्षी जुन्या गिरणीत 350 कामगार कामास होते. ते वाढत वाढत एकेकाळी ही संख्या 20 हजारपर्यंत जाऊन पोहोचली होती. ए, बी आणि सी अशा तीन युनिटमध्ये गिरणीचं काम चाले. पुढे 1937 मध्ये जुनी गिरणी शेठ मोरारका यांच्या ताब्यात गेली.
 
इतिहास अभ्यासक आणि लेखक प्रा. डॉ. विलास बेत यांच्या ‘गिरणीतले दिवस या पुस्तकात गिरणी बंद पडण्याच्या घटनाक्रमाचा उल्लेख आहे.
 
आपल्या पुस्तकात डॉ. विलास बेत लिहितात, द्वितीय महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यासाठी कॅनव्हासचे शीट्स बनवण्याचं मोठं काम जुन्या गिरणीला मिळालं. या शीटसाठी सोळा धाग्यांचा एक धागा बनवायला लागायचा. त्यासाठी पाच रिळांचा हातमाग वापरायला लागायचा.
 
असं हे अशक्यप्राय काम करून गिरणीने अभूतपूर्व असा नफा मिळवला. मात्र, अतिरिक्त उत्पादनाचा ताण जुन्या यंत्रसामुग्रीला असह्य झाल्याने ती निकामी झाली. गिरणीने मिळवलेल्या नफ्यातून काही भाग त्यावर खर्च करून यंत्रे पूर्ववत करणं सहजशक्य होतं. मात्र, गिरणीमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
 
परिणामी, गिरणीतून निघणारी मालाची संख्या आणि दर्जा खाली घसरला. पुढील काळात कापडाला प्रचंड मागणी असतानाही जुन्या गिरणीतून त्याचा पुरवठा होऊ शकला नाही. आर्थिक उत्पन्न घटल्याने कामगारांचा पगारही देणे अवघड बनले. आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याच्या कारण देत शेठ मोरारका यांनी 27 ऑगस्ट 1949 रोजी गिरणी बेमुदत बंद केली. त्यावेळी गिरणीत कामावर असलेले 12 हजार 292 कामगार एका क्षणात बेकार झाले. काही काळ ही गिरणी सरकारनेही ताब्यात घेतली, मात्र कोर्टाच्या आदेशाने ती पुन्हा मोरारका यांच्याकडे देण्यात आली.
 
सरकारने मला जर 1 कोटी रुपये दिले, तरच जुनी गिरणी पुन्हा सुरू करता येईल, अशी भूमिका शेठ मोरारका यांनी त्यावेळी घेतली होती.
 
त्यामुळे, संप, आंदोलन, मोर्चे आणि इतर अनेक प्रयत्नांनंतरही जुनी गिरणी पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही. अखेरीस, 1957 मध्ये सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हींग मिल पूर्णपणे बंद पडली.
 
जुन्या गिरणीवर कर्जाचे प्रचंड ओझे होते. कामगारांची देय रक्कमही मोठी असल्याने न्यायालयाने जुनी गिरणी ‘लिक्विडेशन’मध्ये काढण्याचा निकाल दिला होता.
 
मात्र, मोरारका यांनी संपूर्ण गिरणी न विकता ती पाडून प्रत्येक विभागाचा स्वतंत्र लिलाव करण्याचे ठरवून कार्यवाहीदेखील सुरू केली. यामुळे येथील कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले.
 
सोलापुरी चादरीचे जनक किसनराव क्षीरसागर
जुनी गिरणी बंद पडल्यानंतर तेथील यंत्रांची लिलावातून भंगारात विक्री सुरू झाली. सर्वप्रथम किसनराव क्षीरसागर यांनी ही यंत्रे विकत घेऊन त्यामार्फत चादरीचं उत्पादन सुरू केलं. यामुळेच त्यांना सोलापुरी चादरीचे जनक म्हणून ओळखलं जातं.
 
किसनराव 4 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई जुन्या गिरणीत काम करायची. स्वतः किसनराव हे बालवयात एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हाताखाली घरकामाला होते. हा इंग्रज अधिकारी गिरणीतील कामगारांना प्रशिक्षण देणाऱ्या विभागाचा प्रमुख होता.
 
घरकाम करता करता छोट्या किसनला यंत्रमागाची ओळख झाली. इतरांचे काम पाहत किसनरावांनी विणकामाचे ज्ञान मिळवले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीकडील काम सोडले.
 
यानंतर किसनराव जुनी गिरणीच्या शेजारील लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये लाईन जॉबर म्हणून काम करू लागले. 1947 पर्यंत त्यांनी हे काम केले. दरम्यान, अधिकाऱ्याशी काही मतभेद झाल्यानंतर ते पुन्हा कामावर न जाण्याच्या निर्धारानेच घरी परतले.
 
त्यांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन खासगी स्वरुपात हातमाग व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते हातमागावर साडी तयार करायचे.
 
त्या काळात लोक पांघरूण म्हणून जुन्या कपड्यांचे ठिगळ जोडून तयार केलेल्या गोधडी किंवा वाकळ वापरायचे. नंतर-नंतर गिरण्यांमधून मिळणारे जाड कापड लोक पांघरण्यासाठी वापरायचे.
 
हळूहळू जुन्या गिरणीत चादरीचं उत्पादनही सुरू झालं होतं. मात्र, ते सर्वसामान्यांना सहज उपलब्ध नसत. खासगीरित्या हातमागावर तयार होणाऱ्या चादरींचं डिझाईन आणि फिनिशिंग इतकं सुबक नसायचं.
 
दरम्यान, जुन्या गिरणीची पडझड सुरू होताच हातमाग उत्पादनात स्थिरावलेल्या किसनराव क्षीरसागर यांनी जुने यंत्रमाग भंगारात विकत घेतले. 4 यंत्रमाग विकत घेण्यासाठीचा परवाना त्यांना एका परिचिताने मिळवून दिला होता.
 
किसनराव यांनी जुन्या गिरणीतील भंगार मालातून यंत्रमागाचे सुटे भाग विकत आणले. या यंत्रांची आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांनी आजच्या सोलापुरी जेकार्ड चादरीचं उत्पादन खासगीरित्या सुरू केलं.
 
त्यावेळी यंत्रमाग चालवण्यासाठी 'L' प्रकारचं लायसन्स आवश्यक असे. जुन्या गिरणीतील लूम्सना हे लाससन्स आधीच देण्यात आलेलं असल्याने नव्याने परवाना काढण्याची आवश्यकता नव्हती.
 
हातमागापेक्षा यंत्रमागावर तयार होणारी चादर लोकप्रिय ठरली, कारण या चादरीवर यंत्रांच्या साहाय्याने मोठे आणि आकर्षक डिझाईन करणं शक्य होतं. शिवाय चादरीची बांधणीही मजबूत असल्याने ती जास्त काळ टिकायची.
 
पुढे मर्दा, गांगजी, चिप्पा, राचेली यांच्यारख्या उद्योजकांनीही अशा प्रकारे यंत्रमागावर घरगुती कारखान्यात चादरीचे उत्पादन सुरू केलं.
 
पुढील काळात विशेषतः तेलुगू भाषिक समाज चादर उत्पादन व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरला. वस्त्रोद्योगात पारंगत असलेल्या कुशल विणकरांनी जेकार्ड चादरीच्या डिझाईन, रंगसंगती आणि मजबूती यामध्ये अनेक सुधारणा केल्या.
 
सोलापुरी चादरीची सद्यस्थिती
सोलापुरी चादर निर्मितीचा इतिहास प्रेरणादायी असला तरी सद्यस्थितीत हा व्यवसाय डबघाईला आल्याची स्थानिक उद्योजकांची तक्रार आहे.
 
गेल्या दोन वर्षांत कोरोना व्हायरसचा फटका चादर व्यवसायाला बसला. पण त्याच्याही आधीपासून विक्री कमी झाल्याने चादर व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.
 
सोलापूर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम सांगतात, “"सोलापुरी चादर ही शंभर टक्के सुती कापडापासून बनवली जाते. स्वस्त दर, आकर्षक डिझाईल, रंगसंगती, टिकाऊपणा ही या चादरीची वैशिष्ट्ये आहेत. एकदा चादर घेतली की 15 ते 20 वर्षं खराब होत नाही. वर्षातील बाराही महिने सर्वच ऋतूंदरम्यान ही चादर वापरता येते. पॉलिस्टर चादरी घेतल्यानंतर होणाऱ्या समस्या म्हणजे अंगाला खाज सुटणं किंवा चिडचिड होणं अशा गोष्टी होत नाहीत. पण सगळं उत्तम असूनही सध्या या चादरींच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे."
 
ते सांगतात, "सोलापरी चादरीचा टिकाऊपणामुळेच तिचं नुकसान होत आहे. कारण, एकदा विकत घेतली की अनेक वर्षे ग्राहक पुन्हा येत नाहीत. सोलापूरच्या चादरींना जिओ टॅगिंग (GI Tag) मिळालेलं आहे. पण तरीही हरयाणा, तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी सोलापूरचं नाव देऊन चादर बनवली जाते. बाजारात सोलापुरी चादर म्हणून या बनावट चादरी धडाक्याने विकल्या जातात. या सर्वांचा फटका बसून विक्री थंडावल्याने सोलापुरातील चादर व्यावसायिक आता टेरी-टॉवेल निर्मितीकडे वळत आहेत."
‘चादरीला मरण नाही’
सोलापुरी चादरीला मरण नाही, असं मत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि अग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केलं.
 
बीबीसीशी बोलताना राठी म्हणाले, “सोलापुरी चादरीचा व्यवसाय घटतोय, म्हणत घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सोलापुरात येणारे पर्यटक हमखास सोलापुरी चादर विकत घेऊन जातात. पंढरपूरच्या आषाढी-कार्तिकी वारीतही सोलापुरी चादरीला मोठी मागणी असते. महागाईमुळे नक्कीच लोकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आहे. पाच विकत घेण्याऐवजी एक-दोन नग विकत घेतले जातात. त्यामुळे कुणी सोलापुरी चादरी विकतच घेत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे.”
 
मध्यंतरी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनास याने सोलापुरी चादर परिधान केल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता.
 
निक जोनासने सोलापुरी चादरीला प्रसिद्धी मिळवून दिल्याने चादर उद्योजकांनी त्यांचे आभारही मानले. मात्र, त्याचा खूप मोठा नाही मात्र काही अंशी परिणाम  झाला, असं राठी यांनी सांगितलं.
 
ते सांगतात, “निक जोनासचा फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट खूप जास्त विक्री वाढली असं म्हणता येणार नाही. परंतु, तशा प्रकारच्या जॅकेटसाठी अधूनमधून विचारणा होत असते. अनेक फॅशन डिझायनर्सनी चादरीच्या जॅकेटसाठी उत्सुकता दर्शवली आहे. असे जॅकेट बनण्यास सुरुवात झाली आहे. ही चांगलीच गोष्ट आहे.”
 
राठी यांच्या मते, “अनेक  मोठ्या रुग्णालयांमध्ये सोलापुरी चादरीचा वापर केला जातो. इतर राज्यांतील बनावट चादरींना कंटाळून ग्राहक खऱ्या सोलापुरी चादरीकडे पुन्हा वळण्यास सुरुवात झाली आहे. हा ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी योग्य प्रकारच्या मार्केटिंगची गरज आहे.”
 
केंद्र सरकारनेही सोलापुरी चादरीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पुढील काळात चादरीला चांगले दिवस येतील, असा विश्वास राजू राठी यांनी व्यक्त केला.
 
संदर्भ -
 
सोलापूरची गिरणी कामगार चळवळ : प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, आचार्य जंबूसागर ग्रंथमाला प्रकाशन, सोलापूर.
गिरणीतले दिवस : प्रा. डॉ. विलास बेत, परिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर.
जेकार्ड चादरीचे निर्माते क्षीरसागर : रंगाण्णा क्षीरसागर यांचा दैनिक सकाळ, सोलापूरमधील 1 नोव्हेंबर 2006 रोजीचा लेख
सोलापुरी चादरीचे जनक : संजीव पिंपरकर यांचा दैनिक सकाळ, सोलापूरमधील 7 नोव्हेंबर 2008 रोजीचा लेख