शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:07 IST)

तालिबान म्हणतं, ‘महागाई’मुळे एकपेक्षा जास्त लग्न करू नका

-खुदाई नूर नासर
बहुपत्नित्वाची प्रथा बंद करावी, या प्रथेमुळे आपल्या विरोधकांना आपल्यावर टीका करण्याची संधी मिळते, अशा आशयाचा निर्णय एका तालिबान नेत्याने इतर सर्व नेत्यांना कळवला आहे.
 
मुस्लीम धर्मात एकाचवेळेस 4 पत्नींबरोबर राहाण्याची परवानगी आहे. ही बहुपत्नीत्व प्रथा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि काही मुस्लीम बहुसंख्य देशांमध्ये आजही कायदेशीर आहे.
 
तालिबानच्या सूत्रांनी या प्रथेमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती बीबीसीला दिली. तालिबानच्या नेत्यांकडून वधूदक्षिणेसाठी निधीची वाढती मागणी पाहाता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील पश्तुन टोळ्यांमध्ये विवाहाच्यावेळेस वधूच्या कुटुंबाला काही रक्कम द्यावी लागते.
 
मोठी कुटुंबं सांभाळण्यासाठी निधी उभारून भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सदस्यांविरोधात तालिबानने हे पाऊल उचलल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
तालिबानच्या उच्चपदस्थ नेत्यांपैकी बहुतांश नेत्यांना एकापेक्षा जास्त पत्नी आहेत. पण आधी विवाह केलेल्या नेत्यांना हा नवा निर्णय लागू होणार नाही.
 
हा निर्णय काय सांगतो?
दोन पानांचा हा निर्णय अफगाणिस्तानातील तालिबानचे नेते मुल्ला हिबातुल्ला यांच्या नावाने काढण्यात आला आहे. या निर्णयात दुसरे, तिसरे, चौथे लग्न करू नये असं म्हटलेलं नाही तर विवाहसमारंभावर मोठी रक्कम खर्च केल्यामुळे तालिबानच्या विरोधकांचा रोष ओढावला जातो याकडे लक्ष वेधलं आहे.
 
जर नेत्यांनी आणि कमांडर्सनी बहुपत्नित्व टाळले तर भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागणार नाही. ज्यांना अपत्य नाही, आधीच्या लग्नातून मुलगा नाही, विधवेशी विवाह करणारे, कौटुंबिक संपत्ती जास्त असल्यामुळे अनेक पत्नींशी विवाह करणे परवडणारे अशांना यातून वगळण्यात आलं आहे.
 
अशा स्थितीत आणखी एक विवाह करण्यासाठी संबंधित पुरुषाने थेट उच्चपदस्थांची परवानगी घेतली पाहिजे, असं या निर्णयात म्हटलं आहे.
 
बहुपत्नित्वाची प्रथा कोठे आहे?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील पश्तुन समुदायांमध्ये बहुपत्नित्व सर्वदूर पसरलं आहे. विवाहाच्यावेळेस मुलींचे वय अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना आपण कोणाशी आणि कधी लग्न करायचं या निर्णयात सहभागी होता येत नाही.
 
मुलगा पाहिजे
ग्रामिण आणि पश्तुन समुदायांमध्ये आधीच्या विवाहातून मुलगा न होणे हे कारण बहुपत्नित्वासाठी दिलं जातं. तसंच कौटुंबिक तंट्याचं कारणही दिलं जातं आणि त्याचा दोष पत्नीवर टाकला जातो. विधवेचा विवाह तिच्या दिराशी करून दिला जातो. हा विधवेचा आणि तिच्या कुटुंबाचा सन्मान समजला जातो.
 
दिराचं आधी लग्न झालं असलं तरी असा विवाह करून देण्यात येतो. ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्यांच्यासाठी तर अनेक पत्नी असणे श्रीमंत दर्जाचं लक्षण मानलं जातं.
 
वालवार नावाच्या प्रथेमुळे असे अनेक विवाह होतात. या प्रथेमुळे वधूच्या कुटुंबाला निधी मिळतो.
 
आर्थिक ताण आणि समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे बहुपत्नित्व कमी होत आहे. पण केवळ पुरुषांच्या अतिरेकी कामवासनेमुळे ती प्रथा जिवंत राहिली आहे, असं ऑस्ट्रेलियात राहाणाऱ्या अफगाण कार्यकर्त्या रिटा अन्वरी यांनी सांगितलं.
 
रिटा म्हणाल्या, अनेकपत्नीत्वाला इस्लामने काही ठराविक प्रसंगांमध्येच परवानगी दिली आहे. आधीची पत्नी आजारी असून तिला मूल होणं शक्य नसेल तर हा मार्ग वापरणं अपेक्षित आहे.
 
परंतु दुर्दैवाने अत्यंत मामुली कारणं देऊन केवळ कामवासनेपोटी आजचे पुरुष अनेक विवाह करतात असं त्या म्हणाल्या.
 
जर तुम्ही सर्व पत्नींना योग्य पद्धतीने आर्थिक, आरोग्य, मानसिक पातळीवर सारख्याच पद्धतीने वागवत नसाल तर ते चूक आहे, असं त्या सांगतात.
 
तालिबानच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी अनेक विवाह केल्याचं दिसतं. तालिबानचे संस्थापक मुल्ला मोहम्मद ओमर आणि त्यांचा वारसदार मुल्ला अख्तर मन्सूर दोघांनाही तीन पत्नी होत्या. सध्याचे प्रमुख मुल्ला हिबातुल्लाह यांना दोन पत्नी आहेत.
 
तालिबानचे दोहामधील वरिष्ठ अधिकारी मुल्ला अब्दुल घनी बारादार यांना तीन पत्नी आहेत. त्यातल्या तिसऱ्या पत्नीशी त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असताना विवाह केल्याचं सांगण्यात येतं.
 
दोहामधील बहुतांश नेत्यांनी एकापेक्षा जास्त विवाह केले असून त्यात अमेरिकेच्या ग्वांटानामो बे तुरुंगातून नुकत्याच सुटलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यातल्या काहींनी तुरुंगातून सुटल्यावर हे पुढचे विवाह केले असून त्यासाठी त्यांनी मुलीच्या कुटुंबाना भरपूर पैसेही दिले आहेत.
 
बीबीसीने जेव्हा तालिबानच्या कोणत्या नेत्याला एकापेक्षा जास्त पत्नी आहेत असा प्रश्न विचारला तेव्हा तालिबान सूत्राने कोणाला नाहीत? असा प्रतिप्रश्न विचारला.
 
बहुपत्नित्वाला आता का रोखलं जातंय?
अफगाणिस्तानातील अधिकाऱ्यांनी तालिबानमधील विसंगतीकडे गेली अनेक वर्षं बोट दाखवलेलं आहे. तालिबानी नेते श्रीमंत जीवनशैलीत जगत असले तरी सामान्य सैनिकाला मात्र कसंबसं पोट भरावं लागत आहे.
 
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी याचं उदाहरण दिलं होतं. तालिबानी सैनिकांना आता लढण्याबद्दल तिटकारा निर्माण झाला आहे कारण ते लढत असताना त्यांचे नेते मात्र चौथ्या-पाचव्या पत्नीबरोबर घरी राहून मजा करत असतात, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं.
 
सरकारशी बोलणं सुरू असताना बहुपत्नित्वाच्या दिशेने माध्यमांचं टिकास्त्र येऊ नये म्हणून तालिबानने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
 
तसंच विवाहाचा खर्चही नेत्यांना आता परवडत नाही. कमांडर्स आणि सैनिकांनी 20 ते 80 लाख अफगाणी रुपये तालिबानच्या निधीतून किंवा अघोषित आर्थिक स्रोतांकडून घेतल्याचं सांगण्यात येतं.