'मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे म्हणजे सेनेचा मुख्यमंत्री होणार'
मुख्यमंत्रिपदाबाबत आज शिवसेना अधिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
"राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे म्हणजे सेनेचा मुख्यमंत्री होणार. आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो. शिवसेनेनं मनात आणलं तर सेना बहुमत दाखवू शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सरकार स्थापन करण्याच्या फंदात पडू नये." असं राऊतांनी म्हटलंय.
चर्चेत भाजपनं एवढा उशीर का केला आहे, आठ दिवस का लावले? असा सवालही राऊत यांनी केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेला उशीर झाला या राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की आता लवकरच शिवसेना - भाजप चर्चेला सुरुवात होईल. " चर्चेसाठी भाजप त्यासाठी पुढाकार घेईल. दिवाळीमुळे काही दिवस उशीर झालाय. काही दिवस तणावात गेल्यामुळेही उशीर झाला. पण आता चर्चा होऊन मार्ग निघेल."
दरम्यान काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर चालवलं जात आहे, पण त्यात कुठलंही तथ्य नाही, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसचे काही नेते दिल्लीत सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं. पण शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अद्याप काही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी म्हटलंय की काँग्रेसनं शिवसेना - भाजपच्या या नाट्यात पडू नये. निरुपम यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "हे सगळं ढोंग आहे. ते पुन्हा एकत्र येणार आणि आपल्यावर निशाणा साधत राहणार. काही काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचारच कसे करू शकतात?"
दरम्यान, या चर्चेला उधाण आलं जेव्हा संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट झाली असल्याचं राऊत यांनी सांगितलं पण ती राजकीय भेट नसल्याचं म्हटलंय. "राज्यात शेतीवर अवकाळी पावसाचे संकट आहे. त्याबाबत त्यांची भेट घेतली. ते ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी भेट घेतली. नरेंद्र मोदीही त्यांचे मार्गदर्शन घेतात." असं राऊत म्हणालेत.
त्याआधी गुरुवारी शिवसेनेच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर पक्षाचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.