गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (15:14 IST)

CAA: उद्धव ठाकरे म्हणतात 'जामियात जे झालं ते जालियांवाला बाग हत्याकांडासारखं'

जामिया आंदोलन थांबवण्यासाठी जो बळाचा वापर करण्यात आला त्याची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियांवाला बाग हत्याकांडाबरोबर केली आहे.
 
या आंदोलनादरम्यान आपल्याला गोळ्या लागल्या असा दावा तीन जणांनी केला होता. पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.
 
'आजचा युवक हा एखाद्या बॉंबसारखा प्रज्वलनशील झाला आहे. तेव्हा मी केंद्र सरकारला ही विनंती करतो ते विद्यार्थ्यांबरोबर जे काही करत आहेत ते त्यांनी थांबवावं,' हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत पत्रकारांसोबत बोलत होते.
 
"आज आमच्या विरोधकांनी विधिमंडळात 'सामना' झळकवला. आम्ही सामना वाचत नाहीत असं म्हणणाऱ्या विरोधकांना आज 'सामना' विधिमंडळात आणावा लागला हा नियतीचा न्याय आहे असं ठाकरे म्हणाले. जर तुम्ही त्यावेळी सामना वाचला असता तर आज आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस:
हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये हमरी तुमरी झाली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार आक्रमक झाले.
 
देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव असलेले अभिमन्यू पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर झळकवलं. या गोष्टीचा राग आल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला आणि त्याचं पर्यावसन हमरी तुमरीत झालं. यामुळे विधानसभेचं कामकाज अर्ध्या-तासासाठी तहकूब करण्यात आलं. थोड्या वेळानंतर सत्र सुरू करण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनरबाजी करणं हे दुर्दैवी आहे असं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं.
 
मुख्यमंत्री तुमचं आश्वासन पूर्ण करा अथवा खुर्ची खाली करा अशा घोषणा विरोधी पक्षाने दिल्या.
 
अर्थमंत्री जयंत पाटील काय म्हणाले?
अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात बोलताना अर्थमंत्री जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, सत्तेत असताना तुमचे हात कुणी धरलेले होते? तुम्हाला हे करता आलं असतं, पण तुम्ही ते केलं नाहीत. आम्ही जे काम सुरू केलंय, ते सांगण्याची संधी सुद्धा तुम्ही सत्तारूढ पक्षाला देत नाहीत.
जयंत पाटील पुढे म्हणाले, "राज्य सरकारनं आतापर्यंत 6 हजार 600 कोटी रूपये अवकाळी पावसात नुकसान झालेल्यांना वाटप केलेलं आहे. त्यातले 2100 कोटी रूपये जिल्हाधिकारीअंतर्गत वितरित झालेले आहेत. पुरासाठी 7,400 कोटी रूपये आणि अवकाळी पावसासाठी 7,200 कोटी रूपये अशा 14,600 कोटी रूपयांची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे."  
 
राज्य सरकार अवकाळी पावसात कुठल्याही शेतकऱ्याला मोकळं सोडणार नाही, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.  
 
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं?
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, राहुल गांधी यांनी सावरकरांवरील वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज नागपूरमध्ये नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.
 
'जोपर्यंत या प्रकरणावर राहुल गांधी माफी मागत नाहीत तोपर्यंत देश त्यांना माफ करणार नाही,' असं फडणवीस म्हणाले.
 
सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजप आमदार 'मी सावरकर' अशा टोप्या घालून विधी मंडळात आले होते. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असं म्हणत शिवसेना सावरकरांचा हा अपमान कसं काय सहन करत आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
 
सभागृहात सावरकरांवरून भाजपने केलेल्या घोषणाबाजीला सत्ताधारी पक्षातील आमदारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी म्हटलं, "सरकारची सावरकरांबाबत भूमिका काय आहे, हे कालच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारला घेरण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. सावरकरांवर संपूर्ण देशाचं प्रेम आहे. भाजपला खरंच त्यांच्याबद्दल प्रेम होतं तर मागच्या पाच वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना करत असताना त्यांनी ते का दिलं नाही?"
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे.
 
ते म्हणाले, "आज सभागृहात भाजपने निरर्थक स्वरूपाची घोषणाबाजी केली. याचा निषेध करण्यासारखा आहे. राहुल गांधी महाराष्ट्राच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नाहीत. राहुल गांधी यांनी देशातल्या बलात्कारांच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते विधान केलं. त्यांचं वक्तव्य समजून घेण्याची गरज आहे. देशाच्या इतिहासात खोटा प्रचार करून देशाच्या महापुरुषांमध्ये वाद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींना वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. गोंधळ आणि गदारोळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला त्याला उत्तर देण्याचं काम काँग्रेसने केला आहे."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. "वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजप सभागृहात गदारोळ करत आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. त्यांच्याबाबत सभागृहात चर्चा होऊ शकत नाही," असं ते म्हणाले.
 
तर "वीर सावरकर यांच्यावरून काहीच वाद नाही. राहुल गांधी यांचं विधान त्यांच्याकडे. आमची भूमिका आमच्याकडे," असं थेट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
 
'अवकाळी पावसासाठी 23,000 कोटींची तरतूद करा'
शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून 23,000 कोटी रुपये द्यावेत. पण शेतकऱ्यांसाठी केवळ 750 कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की 25,000 रुपये हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. राज्यातील 93 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे.
शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
नव्यानेच स्थापन झालेल्या विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.
 
या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिलं आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं शिक्षण आणि वकिलीची कारकीर्द ही नागपूरमध्येच सुरू झाली याचा आपणास अभिमान वाटतो असं फडणवीस यांनी म्हटलं.
 
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपने प्रवीण दरेकर यांची निवड केली आहे.