शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (17:36 IST)

उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.
 
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत 13 पैकी 4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची झाली बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने जाहीर केले होते. आज त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल 14 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. 13 उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी 12 मे रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.
 
गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी), उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील आणि त्यात खुलासा होईल अशी बहुतेकांना कल्पना होती.
 
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता 24 कोटी 14 लाख इतकी आहे.
 
कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स - 21 कोटी 68 लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता 24 कोटी 14 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.
 
उद्धव यांची स्थावर मालमत्ता 52 कोटी 54 लाख आहे.
 
उद्धव यांनी 1986 ते 1988 दरम्यान रायगड जिल्ह्यात 5 प्लॉट्स घेतले होते त्याची किंमत 95,000 आहे.
 
एका जागेवर त्यांचं फॉर्महाऊस आहे त्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.
 
अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत - 4 कोटी 20 लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत - 13 कोटी 64 लाख इतकी आहे.
 
त्यांच्या बांद्रा इस्ट आणि बांद्रा वेस्ट या रहिवासी जागांची एकूण किंमत 33 कोटी 73 लाख इतकी आहे. उद्धव यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता 52 कोटी 44 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एचडीएफसी बॅंकेचं 4 कोटी रुपयाचं कर्ज आहे.
 
उद्धव यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 65 कोटींची आहे. रश्मी ठाकरे यांच्या उत्पन्नाचं साधन बिझनेस आहे. उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेतन, डिव्हिडंड फंड आणि कॅपिटल गेन हे आहेत.
 
उद्धव ठाकरेंविरुद्ध 23 केसेस पेंडिंग आहेत, पण दोषी एकातही नाही.
 
आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी शपथपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी रुपये इतकी आहे असं सांगितलं होतं.
 
आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे.
 
आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत साडे सहा लाख रुपये आहे.