1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (09:26 IST)

युक्रेन : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉमेडियन झेलेन्स्की विजयाच्या उंबरठ्यावर - एक्झिट पोल

युक्रेनमधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉमेडियन झेलेन्स्की बहुमतानं निवडून येण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे.
 
एक्झिट पोलनुसार त्यांना तब्बल 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. तीन आठवड्यांपूर्वी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ते सर्वात आघाडीवर होते. त्यावेळी 39 उमेदवार मैदानात होते.
 
झेलेन्स्की यांनी सध्याचे राष्ट्रपती पेट्रो पोरोन्शेको यांना आव्हान दिलं होतं.
 
पोरोन्शेको यांनी आपला पराभव मान्य केला आहे. राजधानी कीवमध्ये आपल्या समर्थकांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राजकारण सोडणार नाही.
 
त्याचवेळी झेलेन्स्की यांनी आपल्या समर्थकांना, "मी आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." असं सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "मी अजूनही औपचारीपणे राष्ट्रपती म्हणून पदावर आलेलो नाही. मात्र युक्रेनचा एक नागरिक म्हणून सोव्हिएत संघाबाहेरील देशांना सांगू शकतो, की बघा.. सगळं काही शक्य आहे."
 
राष्ट्रपतीपदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ
एक्झिट पोलमधील अंदाज खरे ठरले तर झेलेन्स्की पुढची पाच वर्ष युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून काम करतील.
 
युक्रेनच्या राष्ट्रपतींचा देशाची सुरक्षा, संरक्षण विभाग आणि परराष्ट्र रणनीतीवर मोठा प्रभाव असतो.
 
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मावळते राष्ट्रपती पेट्रो पोरोन्शेको यांना 25 टक्के मतं मिळतील. ते 2014 पासून राष्ट्रपतीपदावर आहेत.
 
2014 च्या आधी रशियाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रपतींविरोधात युक्रेनमध्ये मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर उद्योजक आणि अरबोंची संपत्ती असलेले पेरोन्शेको राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले.
 
या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर पेरोन्शेको यांनी म्हटलं की, "या निवडणुकीचा निकाल आपल्याला अनिश्चितता आणि भ्रमाकडे घेऊन जातील."
 
ते म्हणाले की, "मी पद सोडतोय. पण मी हे ठामपणे सांगू इच्छितो की कुठल्याही स्थितीत मी राजकारण सोडणार नाही."
 
मालिकेत अपघातानं झेलेन्स्की राष्ट्रपती झाले तेव्हा..
41 वर्षांचे झेलेन्स्की राजकीय नर्मविनोदी नाटकातील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. 'सर्वंट ऑफ द पीपल' नावाच्या या मालिकेत एक व्यक्ती असा दाखवण्यात आला आहे, जो अपघातानं अचानकपणे युक्रेनचा राष्ट्रपती होतो.
 
त्यांनी आपल्या शोच्या नावावर बनवलेल्या राजकीय पक्षाकडूनच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली.
 
झेलेन्स्की यांच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नाहीए. आपण इतर उमेदवारांपेक्षा कसे वेगळे आहोत, हेच त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला पटवून दिलं.
 
कुठलीही ठोस रणनीती किंवा इतर गोष्टी त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात समोर आणल्या नाहीत.
 
त्याशिवायसुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये 30 टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेरोन्शेको यांना 15.95 टक्के मतं मिळाली.
 
युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचं नाव युरोपच्या सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत गणलं जाईल.